जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कोरोनो नंतरचे जग ...!

युवाल नोह हरारीने फायनान्शिअल टाईम्समध्ये The world after coronavirus हा दीर्घ लेख लिहिला आहे. 
सोर्स : इंटरनेट फक्त प्रतीकातमक 

 अत्यंत तातडीने वाचला पाहिजे असा आहे.
Amey Tirodkar यांनी एक पोस्ट लिहिली होती आणि सोबत मूळ लेखाची लिंक दिली होती. या लेखाचा मराठी अनुवाद व्हावा, अशी मागणी होती. छायाताई या परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक। त्यांनी मराठी अनुवाद केला.
------------------------

[ ‘सेपियन्स’च्या लेखकाने मांडलेले विचारप्रवर्तक , बुद्धीला हादरा देणारे लेखन]
==================
कोरोना व्हायरसनंतरचे जग 
लेखक- युवल नूह हरारी
===================
हे वादळ निघून जाईल. परंतु आता आपण घेतलेल्या निर्णयांमुळे आपले आयुष्य /जीवन कायमचे बदलू शकते
.
मानवजातीला आता जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  कदाचित आमच्या पिढीपुढील हे  सर्वात मोठे संकट. पुढील काही आठवड्यांमध्ये लोक आणि सरकार घेत असलेले निर्णय कदाचित पुढच्या काही वर्षांसाठी जगाला वेगळा आकार देतील... केवळ आपल्या आरोग्य व्यवस्थांनाच नव्हे तर आपल्या अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती यांनादेखील. आपण वेगाने आणि निर्णायकपणे कृती केली पाहिजे. आम्ही आमच्या कृतीचे दीर्घकालीन परिणाम देखील विचारात घेतलेले पाहिजेत. अनेक पर्यायांमधील एक निवडताना केवळ तात्कालिक धोक्यावर कसा विजय मिळवायचा एवढाच विचार न करता आपण स्वतःला विचारले पाहिजे की हे  वादळ संपल्यानंतर आपण जगू ते जग कोणत्या प्रकारचे असेल. होय, वादळ संपुष्टात येईल, मानवजातीचे अस्तित्व टिकेल, आपल्यातील बरेच लोक अजूनही जिवंत राहतील - परंतु आपण एका वेगळ्या जगात राहत असू.
.
बरेच अल्प-मुदतीचे/तात्कालिक  आपातकालीन उपाय जीवनातील  एक नित्याची बाब बनतील. आणीबाणीचे हे वैशिष्ट्यच  आहे.  तिच्यामुळे  भविष्यात ऐतिहासिक महत्त्वाच्या ठरणाऱ्या प्रक्रिया जलदगतीने वर्तमानात येतात. एरव्ही अनेक वर्षे विचार-विमर्श केला जाईल असे निर्णय काही तासांत घेऊन अमलातही आणले जातात. अपरिपक्व/अपूर्ण आणि अगदी धोकादायक तंत्रज्ञानही  राबवले जाते कारण काहीही न करण्याची जोखीम त्याहून मोठी असते. संपूर्ण देश मोठ्या प्रमाणातील सामाजिक प्रयोगांमध्ये गिनिपिग म्हणून वापरले जातात. जेव्हा प्रत्येकजण घरून काम करतो आणि केवळ दूर अंतरावरून संवाद साधतो तेव्हा काय होते? जेव्हा संपूर्ण शाळा आणि विद्यापीठे ऑनलाइन जातात तेव्हा काय होते? एऱ्हवी सामान्य  काळात, सरकारे, व्यवसाय आणि शैक्षणिक मंडळे असे प्रयोग करण्यास सहमती दर्शवीत नाहीत. परंतु हा सामान्य काळ नव्हेच.
.
या संकटाच्या वेळी आपल्यासमोर दोन महत्त्वाच्या बाबींतील  निवडी आहेत. एक आहे, (जनतेवरील)   निरंकुश पाळत ठेवणे की  नागरिकांचे  सबलीकरण यांदरम्यानची आणि  दुसरी आहे  राष्ट्रांतील अलगपणा/  राष्ट्रवादी अलगाव (nationalist isolation)  की जागतिक एकता (global solidarity) यांतील.
.
सध्याची साथ  थांबविण्यासाठी, संपूर्ण लोकसंख्येस काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. लोकांवर देखरेख ठेवणे आणि नियम मोडणाऱ्यांना शिक्षा देणे ही सरकारची एक पद्धत आहे. आज, मानवी इतिहासामध्ये प्रथमच तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाचे सतत निरीक्षण करणे शक्य होत आहे. पन्नास वर्षांपूर्वी, केजीबी (रशियाची गुप्तहेर संघटना) २४ कोटी  सोव्हिएत नागरिकांवर  दिवसाचे २४ तास नजर ठेवू  शकत नव्हता, किंवा एकत्रित केलेल्या सर्व माहितीवर प्रभावीपणे प्रक्रियाही करू शकत नव्हता. केजीबी मानवी एजंट्स आणि विश्लेषकांवर विसंबून होता आणि प्रत्येक नागरिकावर नजर ठेवण्यासाठी मानवी एजंट ठेवूही शकत नव्हता. परंतु आता सरकार मानवी मदती ऐवजी सर्वव्यापी सेन्सर आणि शक्तिशाली अल्गोरिदमांवर अवलंबून राहू शकतात.
.
कोरोनव्हायरस साथीच्या विरूद्धच्या या लढाईत अनेक सरकारांनी पाळत ठेवण्याची नवीन साधने यापूर्वीच तैनात केली आहेत. सर्वात उल्लेखनीय प्रकरण चीनचे आहे. लोकांच्या स्मार्टफोनचे बारकाईने निरीक्षण करून, चेहरा-ओळखणारे कोट्यवधी कॅमेरे वापरणे आणि लोकांना त्यांचे शरीराचे तापमान आणि वैद्यकीय स्थिती तपासून अहवाल देण्यास भाग पाडणे. यांद्वारे चीनी अधिकारी केवळ संशयित कोरोनाव्हायरस वाहकच त्वरित ओळखू शकत नाहीत, तर त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतात आणि ज्याच्याशी ते संपर्कात आले त्यांचीहि  ओळख जाणतात. मोबाईल अ‍ॅप्सची एक श्रेणी नागरिकांना बाधित रुग्णांच्या निकटतेबद्दल सावध करते.
.
आता सरकार मानवी मदतीऐवजी सर्वव्यापक सेन्सर आणि शक्तिशाली अल्गोरिदमांवर अवलंबून राहू शकतात.
.
या प्रकारचे तंत्रज्ञान केवळ पूर्व आशियापुरते मर्यादित नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच इस्रायल सुरक्षा एजन्सीला कोरोना व्हायरसची लागण झालेल्या  रुग्णांचा मागोवा घेण्यासाठी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी राखून ठेवलेले पाळत ठेवण्याचे  तंत्रज्ञान अमलात आणण्यास मान्यता दिली. संबंधित संसदीय उपसमितीने हा उपाय मान्य करण्यास नकार दिला असता, नेतन्याहू यांनी आपत्कालीन डिक्रीद्वारे हा निर्णय घुसवला.
.
यावर तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टींमध्ये नवीन काही नाही. अलिकडच्या काळात  सरकारे आणि कॉर्पोरेशन्स, दोघेही  लोकांचा मागोवा घेण्यासाठी, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांना (सोयीस्करपणे) वळवण्यासाठी अधिकधिक प्रगत तंत्रज्ञान वापरत आहेत. अर्थात  आपण जर सावधगिरी बाळगली नाही, तर साथीच्या निमित्ताने ठेवलेली  पाळत ही पाळतीच्या इतिहासातील (surveilence history) एक महत्त्वाची घटना ठरेल.  यासाठी  नाही की ज्या देशानी  मोठ्या प्रमाणात पाळत ठेवण्याच्या साधनांचा वापर करणे आतापर्यंत  नाकारले होते, तिथे असा वापर यापुढे नियमित केल्या जाऊ शकतो. परंतु त्याहूनही अधिक  यासाठी की आजवर ही पाळत  “त्वचेच्या बाहेरुन” (म्हणजे हालचालींवर) असे ती आता  “त्वचेच्या खाली” (शरीर आणि मनात शिरणारी) ठेवली जाईल, हा  नाटकीय बदल आहे.
.
आतापर्यंत, जेव्हा आपण बोटाने आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श केला आणि एखाद्या दुव्यावर क्लिक केले की आपली बोट नेमके कशावर क्लिक करीत आहे हे सरकारला जाणून घ्यायचे असे. परंतु  आता, सरकारच्या  स्वारस्याचे केंद्र बदलले आहे.  आता सरकारांना जाणून घ्यायचे आहे आपल्या बोटाचे तपमान आणि त्याच्या त्वचेखालील रक्तदाब!
.
या पाळत ठेवण्याच्या व्यवस्थेत आपण कुठे आहोत हे शोधण्यात येणारी एक  समस्या म्हणजे आपणापैकी कुणालाच माहित नाही की आपल्यावर कशा प्रकारे पाळत ठेवली जातेय आणि भविष्यात काय वाढून ठेवले आहे! पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान भयंकर वेगाने विकसित होत आहे आणि दहा वर्षांपूर्वी ज्या  रम्य विज्ञानकथा मानल्या जात त्या गोष्टी  आज ‘शिळ्या बातम्या’ झाल्या आहेत. प्रयोग म्हणून एक विचार करू... एका काल्पनिक सरकारने  अशी मागणी केली की प्रत्येक नागरिकाने दिवसाचे २४ तास शरीराचे तपमान आणि हृदय गती मोजणारे बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे. मोजलेला डेटा एकत्रित केला जाईल आणि सरकारी अल्गोरिदमद्वारे त्याचे विश्लेषणही केले जाईल. आपण आजारी असल्याचे आपल्याला  समजण्यापूर्वीच अल्गोरिदमला समजेल, शिवाय आपण कोठे होता आणि कोणाला  भेटलात हे देखील त्यांना समजेल. संक्रमणाची साखळी अत्यंत तोकडी केली जाऊ शकेल आणि पूर्णपणे तोडलीही जाऊ शकेल. वादासाठी आपण असंहि म्हणू शकतो की अशी प्रणाली काही दिवसांतच महामारीला जागीच रोखू शकेल. ऐकायला छान वाटते, बरोबर ना?
.
या  पक्षाची नकारात्मक बाजू, अर्थातच आहे - यामुळे नवीन पाळत ठेवणाऱ्या भयानक यंत्रणेला कायदेशीरपणा मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला (सरकारला) कळले की मी सीएनएन दुव्याऐवजी फॉक्स न्यूज दुव्यावर क्लिक केले आहे, तर ही माहिती  माझा  राजकीय दृष्टिकोन आणि कदाचित माझे  व्यक्तिमत्त्व याबद्दल तुम्हाला काही शिकवेल. मी व्हिडिओ क्लिप पाहताना  माझ्या शरीराचे तपमान, रक्तदाब आणि हृदय गती यांच्यावर काय परिणाम होतो याचे तुम्ही निरीक्षण करू शकत असलात तर  मला कशाने हसू येते, कशाने रडू येते आणि मला खरोखर कशाने चीड येते  हेही तुम्ही जाणू  शकता.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ताप, खोकला यासारख्याच  राग, आनंद, कंटाळा आणि प्रेम ही  जैविक वास्तवं (natural फेनोमेना) आहेत. खोकला ओळखणारे  तंत्रज्ञानच  हसणे देखील ओळखू शकते. जर कॉर्पोरेशन आणि सरकारांनी आमचा बायोमेट्रिक डेटा काढणे सुरू केले तर आम्ही स्वतःला ओळखतो त्यापेक्षा कितीतरी चांगले ते आम्हाला ओळखू शकतील! मग ते केवळ आपल्या भावनांचा अंदाज लावू शकतील असं नव्हे तर ते आपल्या भावनांमध्ये बदलहि  घडवून आणू शकतील! आणि त्यांना  पाहिजे असलेली कोणतीही वस्तू विकू शकतील – मग ते एखादे  उत्पादन असेल किंवा एखादा राजकारणी ! या जैवमोजणी वरील (biometric monitoring) देखरेखीपुढे  केंब्रिज अॅनालिटिकाची डेटा हॅकिंगच्या युक्ती अश्मयुगातील हत्यारांसारख्या भासतील.  २०३० मधील उत्तर कोरियाची कल्पना करा... जेव्हा प्रत्येक नागरिकाला २४ तास बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे लागते. जर आपण ‘महान’ नेत्याचे भाषण ऐकले आणि ब्रेसलेटने  रागाची लक्षणे नोंदवली तर.... आपली कम्बक्ती भरली असं समजा!
.
अर्थात, आपत्कालीन परिस्थितीत करण्यात आलेली तात्पुरती उपाययोजना  म्हणून आपण निश्चितपणे बायोमेट्रिक पाळत ठेवणे योग्य ठरवू  शकता. आणीबाणी संपली की ती जाईल/थांबेल . परंतु अशा ‘तात्पुरत्या उपाययोजनां’ना  आपत्कालीन परिस्थिती संपल्यानंतरही सुरु राहण्याची वाईट  सवय असते, विशेषत: जवळच्या भविष्यात  नेहमीच एक नवीन आणीबाणी दबा धरून बसलेली असते! उदा. माझ्या इस्राईल देशाने, १९४८ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी आपत्कालीन स्थिती घोषित केली, ज्यामुळे प्रेस सेन्सॉरशिप आणि जमीन जप्त करण्यापासून ते पुडिंग बनविण्याच्या  विशेष नियमांपर्यंत (मी चेष्टा नाही करत) अनेक तात्पुरत्या उपाययोजनांना मान्यता दिली गेली.  स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यानंतर बराच काळ गेला आहे, परंतु इस्रायलने कधीही आपत्कालीन परिस्थिती संपल्याचे जाहीर केले नाही आणि १९४८ मधील अनेक "तात्पुरते" उपाय रद्द केले गेले नाहीत. (आणीबाणीतील पुडिंग डिक्री २०११ मध्ये एकदाची  दयाळूपणाने रद्द केली गेली).
.
कोरोना व्हायरसचे संक्रमण शून्यापर्यंत खाली आले तरीही, काही डेटा-भुकेली सरकारे युक्तिवाद करू शकतात की बायोमेट्रिक पाळत ठेवणारी (सर्व्हीएलन्स) प्रणाली सुरु  ठेवण्याची आवश्यकता आहे  कारण त्यांना कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेची भीती आहे किंवा मध्य आफ्रिकेत इबोलाचा  नवीन  वाण विकसित होत आहे किंवा... आणखी काही, कळलं ना  तुम्हाला?  आमच्या खाजगीपणा/गोपनीयते बद्दल अलिकडच्या काळात मोठी लढाई चालू आहे. कोरोनाव्हायरस संकट हा  लढाईचा निर्णायक मुद्दा (टिपिंग पॉईंट) असू शकतो. कारण जर  लोकांना गोपनीयता आणि आरोग्य या दोहोंमध्ये मध्ये निवड करावी लागेल तर ते साधारणपणे  आरोग्य निवडतात.
.
लोकांना गोपनीयता आणि आरोग्य यापैकी एक  निवडायला सांगणे हेच तर समस्येचे मूळ आहे. कारण ही निवडीची खरी संधी नाहीच! आम्ही गोपनीयता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींचा लाभ घेऊ शकतो, नव्हे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आपल्या आरोग्याचे रक्षण करणे आणि कोरोनाव्हायरसची  महामारी थांबविणे, हे दोन्ही  आम्ही मागू शकतो पण त्यासाठी  (सरकारने) निरंकुश पाळत ठेवण्याची यंत्रणा स्थापित करून नव्हे तर नागरिकांना सक्षम बनवून झाले पाहिजे. अलिकडच्या काही आठवड्यांत, कोरोनाव्हायरस ची साथ मर्यादेत ठेवण्यासाठी दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूर यांनी काही अतिशय यशस्वी उपाययोजना/प्रयत्नांचे आयोजन केले. या देशांनी ट्रॅकिंग अॅप्लिकेशन्सचा थोडा उपयोग केला  परंतु त्यांचा मोठा भर मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यावर, प्रामाणिकपणे अहवाल देण्यावर आणि योग्य माहिती  जाणणाऱ्या, इच्छुक/ उत्सुक जनतेच्या  सहकार्यावर अधिक अवलंबून होता.
हितकारक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हावे यासाठी  केंद्रीभूत देखरेख आणि कठोर शिक्षा हेच केवळ मार्ग नाहीत. उलट  जेव्हा लोकांना वैज्ञानिक तथ्ये सांगितली जातात आणि जेव्हा सार्वजनिक अधिकारी आपल्याला ही तथ्ये सांगतील असा विश्वास लोक ठेवतात तेव्हा ‘बिग ब्रदर’ने त्यांच्यावर लक्ष न ठेवताही नागरिक "योग्य" वर्तन करू शकतात. पोलिसांचा वचक असलेल्या, अज्ञानी लोकांपेक्षा  स्वयं-प्रेरित आणि योग्य  माहिती असणारी जनता सामान्यत: खूपच शक्तिशाली आणि प्रभावी असते.
.
उदाहरणार्थ साबणाने आपले हात धुण्यावर विचार करा. मानवी स्वच्छतेमध्ये ही आजपर्यंतची सर्वात मोठी प्रगती ठरली आहे. या साध्या क्रियेमुळे दरवर्षी लाखो लोकांचे जीव वाचतात. आम्ही त्याविषयी विचारही करत नाही पण लक्षात घ्या, अगदी अलीकडे, एकोणिसाव्या शतकातच शास्त्रज्ञांना साबणाने हात धुण्याचे महत्त्व कळले. पूर्वी, अगदी डॉक्टर आणि परिचारिका हात न धुता एका शस्त्रक्रियेच्या जागेवरून  दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी जात असत. आज दररोज कोट्यवधी लोक साबणाने हात धुतात.... ते ‘साबण पोलिसां’ना घाबरतात म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती समजल्यामुळे ते आपले हात धुतात. मी साबणाने माझे हात धुतो कारण मी विषाणू आणि बॅक्टेरियाविषयी ऐकले आहे, मला समजले आहे की या लहान जीवांमुळे आजार उद्भवतात आणि मला माहित आहे की साबण त्यांना नाहीसे करतो.
.
परंतु अशा स्तरांचे अनुपालन आणि सहकार्यासाठी आपल्याला विश्वास आवश्यक आहे. लोकांनी विज्ञानावर, सार्वजनिक अधिकाऱ्यांवर आणि माध्यमांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बेजबाबदार राजकारण्यांनी लोकांचा  विज्ञानावर, सार्वजनिक प्राधिकरणांवर आणि माध्यमांवर असलेला विश्वास जाणीवपूर्वक घटवला आहे. आता हेच बेजबाबदार राजकारणी जेव्हा हुकूमशाहीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आकर्षित  होऊ शकतात, तेव्हा ते युक्तिवाद करतात की ‘जनता  योग्य गोष्टी करेल, असा  विश्वास आपण  ठेवू शकत नाही,’ 
.
साधारणपणे, वर्षानुवर्षे नष्ट झालेला विश्वास एका रात्रीत पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. परंतु हा  सामान्य काल नाही. अशा संकटकाळी, आपली मनेसुद्धा पटकन बदलू शकतात. आपण  वर्षानुवर्षे आपल्या भावंडांशी कटु मतभेद बाळगता परंतु जेव्हा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा आपल्याला अचानक विश्वास आणि प्रेमळपणाचा लपलेला साठा सापडतो आणि आपण एकमेकांना मदत करण्यासाठी धावतो. त्याच प्रमाणे, सरकारांनी पाळत ठेवण्याची व्यवस्था तयार करण्याऐवजी विज्ञानावर, सार्वजनिक अधिकार्‍यांवर आणि माध्यमांवर लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आपण नवीन तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग केला पाहिजे, पण तो  केवळ  या तंत्रज्ञानाने नागरिकांना सक्षम बनवण्यासाठीच. माझ्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब यांवर सरकारने देखरेख ठेवण्याच्या बाजूने मी आहे, परंतु त्या डेटाचा वापर सर्व-शक्तिशाली सरकार तयार करण्यासाठी केला जाऊ  नये. त्याऐवजी त्या डेटामुळे  मला अधिक माहिती मिळून योग्य  वैयक्तिक निवडी करण्यास सक्षम केले पाहिजे; तसेच  सरकारलाही  त्याच्या निर्णयांसाठी जबाबदार धरले पाहिजे.
.
जर मी २४ तास माझ्या स्वत: च्या वैद्यकीय स्थितीचा मागोवा घेऊ शकलो तर मला समजेल की मी इतर लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरलो आहे की नाही आणि हेही कळेल की कोणत्या सवयी माझ्या आरोग्यास मदतगार आहेत. आणि जर मला कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबद्दल  विश्वसनीय आकडेवारी आणि तिचे  विश्लेषण मिळू शकले  तर सरकार मला सत्य सांगत आहे की नाही आणि साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी योग्य धोरणे अवलंबत आहेत की नाही हे मी ठरवू शकेन. लोक जेव्हा पाळत ठेवण्याबद्दल बोलतात तेव्हा लक्षात ठेवा की पाळत ठेवण्याचे जे तंत्रज्ञान सामान्यत: सरकार व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी वापरते तेच तंत्रज्ञान सरकारचे निरीक्षण करण्यासाठी व्यक्ती देखील वापरू शकतात.
.
अशा प्रकारे, सध्याची कोरोनाव्हायरस महामारी ही नागरिकतेची एक मोठी चाचणी आहे. पुढील दिवसांमध्ये, आपल्यापैकी प्रत्येकाने कारस्थानांच्या निराधार भाकडकथांवर (conspiracy theories)  आणि राजकारण्यांच्या स्वार्थी/स्वकेंद्री वागण्याच्या कहाण्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी  वैज्ञानिक डेटा आणि आरोग्य-तज्ञ यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अशी  योग्य निवड करण्यात जर आपण अयशस्वी झालो तर कदाचित आपण आपले  आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे मूल्यवान स्वातंत्र्य स्वत:च्या हाताने गमावू. आणि या भ्रमात राहू की आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
 .
आपल्याला सामना करावा लागत असलेली दुसरी महत्वाची निवड म्हणजे राष्ट्रवादी अलगाव आणि जागतिक एकता. या रोगाची साथ आणि परिणामी उभं राहिलेलं आर्थिक संकट या दोन्ही जागतिक समस्या आहेत. केवळ जागतिक सहकार्याद्वारेच त्यांचे निराकरण प्रभावीपणे केले जाऊ शकते.
.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हायरसचा पराभव करण्यासाठी आपल्याला जागतिक स्तरावर माहिती सामायिक करणे आवश्यक आहे.  (असं शेअरिंग करू शकणे)  हा व्हायरसकडे नसलेला  पण मनुष्यांकडे असलेला गुण आहे. चीनमधील कोरोनाव्हायरस आणि अमेरिकेतील कोरोनाव्हायरस ‘मानवांत संसर्ग कसा करावा’ याबद्दल एकमेकांना टिप्स देऊ  शकत नाहीत. परंतु कोरोनाव्हायरस आणि त्याला कसे सामोरे जावे याबद्दल अनेक मौल्यवान धडे चीन अमेरिकेला शिकवू शकतो. एका इटालियन डॉक्टरला पहाटे मिलानमध्ये जे ज्ञान मिळाले ते कदाचित संध्याकाळपर्यंत तेहरानमध्ये काही  जीव वाचवू शकेल. जेव्हा यूके सरकार काही धोरणांमध्ये निर्णय घेण्यास काचकूच करते, तेव्हा ज्यांनी एका महिन्यापूर्वी अशाच कोंडीचा सामना केला आहे अशा कोरीयावासीयांकडून सल्लामसलत मिळू शकते. परंतु असे घडण्यासाठी, जागतिक सहकार्याच्या आणि विश्वासाच्या भावनेची आपल्याला गरज आहे.
.
येणाऱ्या दिवसांमध्ये, आपल्यापैकी प्रत्येकाने कारस्थानांच्या निराधार भाकडकथांवर आणि स्वकेन्द्री  राजकारण्यांच्या कहाण्यांऐवजी  वैज्ञानिक डेटा आणि आरोग्य-तज्ञ यांच्यावर विश्वास ठेवला  पाहिजे.
.
देशांनी उघडपणे माहिती सामायिक करण्यास आणि नम्रपणे सल्ला घेण्यास उत्सुक राहिले पाहिजे आणि आपल्याला मिळालेल्या डेटावर आणि अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी आणि वितरणासाठी जागतिक प्रयत्नांची देखील आवश्यकता आहे, विशेषत: तपासणी  किट आणि श्वसन यंत्रे. प्रत्येक देशाने ते स्थानिक पातळीवर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि जेवढी  मिळतील त्या उपकरणांचा साठा करण्याऐवजी एका समन्वयित जागतिक प्रयत्नाद्वारे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवायला हवे. ती  जीवनरक्षक उपकरणे अधिक प्रामाणिकपणे व न्याय्यपणे  वितरित केल्या जाऊ शकतात. एखाद्या युद्धाच्या वेळी देश जसे  प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करतात, त्याचप्रमाणे कोरोनाव्हायरस विरूद्ध सुरु असलेल्या मानवी युद्धासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण उत्पादनांचे ‘मानवीयीकरण’  करण्याची आवश्यकता भासू शकते. कोरोनाव्हायरसची थोडीच लागण  असणारा  श्रीमंत देश, मोठ्या प्रमाणात लागण झालेल्या  गरीब देशाला जरुरी उपकरणे पाठवेल, हा विश्वास बाळगून की भविष्यात त्या देशाला गरज पडल्यास इतर देश मदतीला येतील.
.
याच धर्तीवर आपण जगातील वैद्यकीय कर्मचार्‍यांचाही एकत्रित विचार करू शकतो, त्यासाठी प्रयत्न करू शकतो. सध्या कमी प्रभावित झालेले देश, त्यांच्या देशातील वैद्यकीय कर्मचार्‍यांना इतरांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी आणि बहुमोल अनुभव मिळविण्यासाठी जगातील सर्वात अधिक लागण  असलेल्या प्रदेशात पाठवू शकतात. त्यामुळे त्या देशांना मदत तर होईलच पण वैद्यकीय कर्मचार्‍यांना अनुभवही मिळेल. पुढे जर साथीचे केंद्र बदलले तर मदत उलट दिशेने वाहू शकते.
.
आर्थिक आघाडीवरही जागतिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळ्यांचे जागतिक स्वरूप पाहता, जर प्रत्येक सरकार इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वत:चे काम करत असेल तर त्याचा परिणाम अनागोंदीत आणि एका गंभीर संकटात होईल. आपल्याला जागतिक कृती योजनेची आवश्यकता आहे आणि ती वेगाने करण्याची गरज आहे. 
.
आणखी एक आवश्यकता आहे प्रवासाच्या जागतिक करारावर सहमती होणे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास महिनोनमहिने  थांबविणे प्रचंड त्रासदायक होईल आणि कोरोनाव्हायरसच्या विरोधातील युद्धात अडथळा आणेल. आवश्यकता असलेल्या कमीतकमी प्रवाशांना जसे  वैज्ञानिक, डॉक्टर, पत्रकार, राजकारणी, व्यावसायिक. सीमा ओलांडण्याची संमती देण्यासाठी देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे; मूळ देशाद्वारे प्रवाशाच्या पूर्व-तपासणीसाठी एक जागतिक करार करून  हे केले जाऊ शकते. जर आपल्याला खात्री असेल की केवळ काळजीपूर्वक स्क्रीनिंग केलेल्या प्रवाशांनाच  विमानात प्रवासाची परवानगी दिलेली आहे, तर आपण त्यांना आपल्या देशात स्वीकारण्यास अधिक तयार असाल.
,.
दुर्दैवाने, सध्या देश कठोरपणे यापैकी काहीही करत नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायाला जणू एकाच वेळी एका सामूहिक पक्षाघाताने ग्रासले आहे. (खोलीत प्रौढ नसल्याचे दिसत आहे) उपस्थितात कोणी शहाणे प्रौढ नाहीत की काय असेच वाटत आहे.  कुणाला वाटेल, एव्हाना  जागतिक नेत्यांची आणीबाणी बैठक होऊन सर्वसाधारण कृती योजना तयार झालेली असेल. सत्य हे आहे की जी७ नेत्यांनी या आठवड्यात केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती पण त्यातूनही अशी काही योजना तयार झाली नाही.
.
 मागील जागतिक संकटांमध्ये - जसे की २००८ चे आर्थिक संकट आणि २०१४ ची इबोला साथ - अमेरिकेने जागतिक नेत्याची भूमिका स्वीकारली. परंतु सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने आपली  नेत्याची ‘नोकरी’ सोडलेली आहे. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की मानवतेच्या भवितव्यापेक्षाही अमेरिकेच्या महानतेची त्यांना जास्त काळजी आहे.
.
या प्रशासनाने आपले अगदी जवळचे मित्रपक्षही सोडले आहेत. जेव्हा त्याने EU मधून सर्व प्रवासावर बंदी घातली, तेव्हा EU ला काही  आगाऊ सूचना देण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही – अशा  कठोर उपायांविषयी  EU शी बातचीत करणे तर सोडाच.  नवीन कोविड -१९  लसीवरील मक्तेदारी हक्क विकत घेण्यासाठी जर्मन औषधनिर्माण कंपनीला एक अब्ज डॉलरची तथाकथित ऑफर देत त्यांनी जर्मनीची बदनामी केली आहे. जरी कदाचित सध्याचे प्रशासन आपल्या वर्तनात बदल घडवून  जागतिक कृती योजना तयार करील  तरीही जो नेता कधीच जबाबदारी स्वीकारत नाही, केलेल्या चुकांची कबुली देत नाही आणि इतरांकडे सर्व दोष ढकलून  सर्व श्रेय मात्र सहजपणे स्वत:कडे घेतो, अशा नेत्याचे अनुसरण कुणी करणार नाही.
.
जर अमेरिकेने सोडलेली रिकामी जागा इतर कुणा देशांनी भरली नाही तर त्यामुळे सध्याच्या साथीची रोकथाम करणे फार कठीण तर होईलच पण  त्याचे जहर पुढची अनेक वर्षे  आंतरराष्ट्रीय संबंधांत भिनून राहील.
.
 तरीही प्रत्येक संकट ही एक संधी आहे. आपण आशा बाळगली पाहिजे की सध्याच्या रोगाच्या साथीमुळे मानवजातीस जागतिक मतभेदांमुळे उद्भवणार्‍या तीव्र धोक्याची जाणीव होईल.
.
आता मानवतेने निवड करण्याची आवश्यकता आहे. आपण मतभेदांच्या मार्गावरुन प्रवास करायचा  की आपण जागतिक एकतेचा मार्ग स्वीकारावा? आपण मतभेद निवडला तर आताचे  संकट  लांबत तर जाईलच पण  भविष्यात कदाचित आणखी वाईट आपत्तींना सामोरे जावे लागेल. पण त्याऐवजी आपण जागतिक एकता निवडली तर ते केवळ कोरोनाव्हायरसच नव्हे तर भविष्यातील सर्व साथीच्या आणि एकविसाव्या शतकातील मानवजातीला त्रास देणार्‍या संकटांविरुद्धही विजय ठरेल.
.
युवल नूह हरारी हे ‘सेपियन्स’, ‘होमो ड्यूस’ आणि ‘२१ व्या शतकातील ‘२१ धडे’ या पुस्तकांचे  लेखक आहेत.
अनुवाद: छाया देव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!