अभिनेते किरणजी माने सलाम तुमच्या धैर्याला !
अभिनेते किरणजी माने सलाम तुमच्या धैर्याला !
दत्तकुमार खंडागळे
संपादक वज्रधारी,
मो. 9561551006
आज अभिनेते किरणजी माने त्यांच्या फेसबुक वॉलवरती डी शिवकुमार यांच्या निमित्ताने जे व्यत्त झालेत ते खरच कौतुकास्पद आहे. खरेतर गेले अनेक दिवस पाहतोय अभिनेते किरण माने बेधडकपणे व्यक्त होतायत. सरकारवर टिकेचे आसूड ओढतायत. सरकारचा ढोंगी चेहरा दाखवतायत. सरकारचा बुरखा फाडतायत. आपल्या लेखणी आणि वाणीतून सरकारी मस्तवालपणाला ते खुले आव्हान देतायत. खरच किरणजी तुम्ही साता-याच्या मातीची शान राखलीत. शिवरायांच्या गादीचे वारस कुणीही असो पण तुम्ही शिवरायांच्या विचारांचे सच्चे वारस शोभलात. साता-याच्या मातीचे स्वत्व आणि सत्व जपलेत. त्या मातीतली रग, धग तुमच्या नसानसात दिसून येते. तुमच्यासारखी हिम्मत आणि धमक इतर कलाकारांनी दाखवायला हवी. पण ते ही इडीला घाबरून सत्तेच्या वळचणीला जाणा-या नेत्यांसारखे बांडगुळे आहेत. नेहमी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिध्द असणारे नाना पाटेकर यांच्यासारखे स्टार आज चिडीचुप आहेत. हे सगळे काँग्रेसच्या काळात धडाधड बोलत होते. व्यक्त होत होते. आता त्यांची जीभ आता निर्जीव झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा, होय रे अजीत, काय रे अजीत वगैरे वगैरे बोलले जात होते. आता होय रे देवेंद्र, काय रे देवेंद्र असं नाही कुणी बोलत. किरणजी तुम्ही ज्या हिंमतीने बोलता, व्यक्त होता, तुमचे विचार बेडरपणे मांडता त्याचा अभिमान वाटतो. तुमचं व्यक्त होणं, सत्याला सोमारं जाणं कौतुकास्पद आहे. तुम्ही जीवंत काळजाचे आहात. महाराष्ट्रातले अनेक कलाकार सत्तेच्या वळचणीला जाऊन शेपूट घालून बसलेत. अनेक राजकारणी जसे सत्तेच्या वळचणीला जाऊन बसलेत तसे हे कलाकारही चिडीचुप आहेत. समाजाच्या कुठल्याच प्रश्नावर ते सरकारला बोट करत नाहीत. सरकारला जाब विचारत नाहीत. सरकार नावाच्या व्यवस्थेला दोष द्यायला तयार नाहीत.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मात्तबर कलाकार चिडीचुप आहेत. साहित्यिक मंडळींनी तर कधीच शेपट्या घातल्या आहेत. या पुस्तकी डरपोकांनी शेपट्या इतक्या आत घातल्या आहेत की त्या शेपटीचा साधा गोंडाही बाहेर दिसत नाही. साहित्यिकांची ही अवस्था असताना सिनेजगतातले कलाकारही भ्याड असल्याचे दिसून येते आहे. हे कान, डोळे नसल्यासारखे जगत आहेत. कॉंग्रेसच्या सत्ता काळात टिवटिवणारी ही मंडळी वाचा गेल्यासारखी गप्प आहे. सगळे आपल्याच विश्वात मश्गुल आहेत. त्यांची चंदेरी दुनिया सोडून त्यांना सध्या बाहेरच्या जगातलं काही दिसत नाही. देशातला शेतकरी अडचणीत आहे. तो त्याच्या हक्कासाठी आंदोलन करतो आहे. तो सरकारकडे आपले हक्क मागतो आहे. इथले सरकार सीमेपलिकडच्या शत्रूशी जसं वागायला हव तसं आपल्याच शेतक-याशी वागत आहे. जो पोशिंदा आहे, जो बळीराजा आहे त्याच्याच वाटेत खिळे ठोकले जात आहेत. त्याच्याच वाटेत क्रॉंक्रीटच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. त्याला प्लास्टिकच्या गोळ्या घातल्या जात आहेत. त्याला हवेतून अश्रधूरांच्या नळकांड्यांचा मारा करत बेजार केले जात आहे. शेतक-यांच्या वाटेत ठोकलेला एखादा खिळा कुठल्यातरी कलाकाराच्या काळजात का रूतला नाही ? का एखाद्या कलाकाराच्या छातीत कळ आली नाही ? का एखादा कलाकार सरकारला जाब विचारायला पुढे आला नाही ? कलाकार हे इतरांच्यापेक्षा जास्त संवेदनशील असतात असं म्हंटल जातं. असे असताना ही कलाकार मंडळी गप्प का ? मराठी चित्रपट सृष्टीतलंही कुणीच जीवंत असल्याच दिसत नाही. तिथही चेलेचपाट्यांची गर्दी व्हावी का ? हे चित्र विदारक आहे. अस्वस्थ करणारं आहे. ज्या समाजातली माणसं पराकोटीची लाचार, भित्री आणि स्वार्थी होतात तो समाज रसातळाला जातो. आमच्या साहित्य, कला व क्रिडा विश्वाची आजची अवस्था पाहिली तर आम्ही त्याच दिशेने निघालोय याची खात्री पटते.
देशात लोकशाहीला घोडा लागला आहे. सत्ताधा-यांनी बेमालूपणे लोकांना मुर्ख ठरवण्याचा सपाटा लावला आहे. जनता महागाईने त्रस्त आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. सरकार जुमल्यावर जुमले करत आहे. अशा स्थितीत कुठलाच कलाकार व्यक्त होताना दिसत नाही. ना तो व्यक्त होतोय ना त्याची कलाकृती बोलताना दिसतेय. त्याला त्याच्या तोंडाने बोलायची हिंम्मत नसेल तर त्याने त्याच्या कलाकृतीतून तरी व्यक्त व्हावे पण असे घडत नाही. बहूतेक कलाकार जातीयवादी. आपआपले हितसंबंध जोपासत आहेत, सत्तेची तळी उचलत आहेत. नसेल तर आम्ही त्या गावचे नाहीच या अविर्भावात जगत आहेत. एखादे संकट आल्यावर शहामृग मातीत तोंड खुपसून बसतो म्हणे. त्याप्रमाणेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बिळात व्यस्त आहेत. देशाच्या स्थितीवर चकार शब्द काढत नाहीत. अशावेळी अभिनेते किरण माने परिणामांची पर्वा न करता ज्या ताकदीने, तडफेने भिडत आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे. भले त्यांना सरकार दरबारी किंमत नाही मिळणार, त्यांना सरकारी पुरस्काराच्या फुसकुळ्या नाहीत मिळणार, कदाचित तुम्हाला त्रास वाट्याला येईल, तसेतर यापुर्वीही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झालाच होता. तसा अजूनही होवू शकतो. पण यातल्या कुठल्याच गोष्टीची तमा न करता ते व्यक्त होतायत. अस व्यक्त व्हायला धमक लागते. ख-या अर्थाने किरण मानेंची छाती फौलादी आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यात ख-या-खु-या मर्दाचे जिगर आहे. केवळ छप्पन इंचाची छाती म्हणून छाती पिटणारे भंगड गेल्या आठ वर्षात एक पत्रकार परिषद घेवू शकत नाहीत. छाती किती इंचाची आहे त्या पेक्षा त्या छातीतले जीगर कसे आहे ? हे महत्वाचे असते. बाकी भल्या मोठ्या छाताडाचे पिंजरे रेड्यालाही असतात. माने सर तुम्ही साता-याच्या मातीचा अभिमान आहात. केवळ साता-याच्या मातीचाच नव्हे तर या मराठी मातीचा अभिमान आहात. हिच ओळख या मराठी मातीची आहे. हिच परंपरा छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांची आहे. "रणफंदीची जात आमूची कोण आम्हा भयभीत करी !" हा विश्वास मावळ्यांच्या रक्तात भरलेला असतो. त्यांच्यासमोर औरंगजेब आला, अफझलखान आला काय आणि इंग्रज आला काय तो कुणालाच डरत नाही. दिल्लीत बसलेले 'कॉपीपेस्ट हिटलर' या सच्चा मावळ्यांना भिती घालू शकत नाही. निडर आणि बेडर वृत्ती हिच खरी ओळख या मावळ्यांची आहे. माने सर तुम्ही जगदगुरू तुकोबारायांच्या गाथेचे अभ्यासक आहात. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहूमता ।' हा संत तुकोबारायांचा विचार प्रत्यक्ष जगता आहात. बाकी गाथेची घोकंपटट्टी करणारे, गाथा पाठ असणारे पायलीला पाचशे आहेत. पण त्यातलं सार जर आचरणात नसेल तर त्याला काय अर्थ ? माने सर तुम्ही तुकोबारायांचे सच्चे पाईक आहात. तुम्ही कलाकार म्हणून अस्सल आहातच पण सच्चे मावळे आहात. सच्चे भारतीय आहात. सलाम तुम्हाला व तुमच्या धैर्याला...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!