अबकी बार चारशे पार...
असा आक्रमक प्रचार भाजपच्या दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंतच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. हा जो सगळा जोर दिसतो आहे तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर! पक्षाच्या नावावर मतं मागुन ' चारशे पार ' ची शक्यता धूसर आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव, आक्रमक, पण शिस्तबद्ध प्रचार, कार्यकर्त्यांची मेहनत या जोरावर भाजपला यश मिळूही शकते.
पण एक शंका मनात कायम येते ती म्हणजे आक्रमक प्रचाराला जनता खरंच सकारात्मक प्रतिसाद देईल की याचा उलट परिणामही होऊ शकतो; असं वाटण्याचं कारण म्हणजे 2004 मध्येही प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून ' शायनिंग इंडिया ' चा आक्रमक प्रचार भाजपने केला होता, मात्र त्याचा उलटा परिणाम होऊन अटलजींची सत्ता पुन्हा येऊ शकली नाही. शायनिंग इंडियाच्या झगमगाटात विरोधी पक्ष विशेषकरून काँग्रेस झाकोळून गेली होती आणि भाजपचे (एन डी ए )सरकार येणारच असे वातावरण तयार झाले होते.
भाजपला तर प्रचंड आत्मविश्वास होता. मात्र जनतेच्या मनात वेगळेच होते. मतदारांनी त्यांना जमिनीवर आणले.कोणी कसा, किती आणि कशाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा भाग आहे मात्र फाजील आत्मविश्वास आणि जनतेला गृहीत धरण्याची भूमिका यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. मतदार हा राजा असतो हे अनेकदा, अनेकांच्या बाबतीत सिद्ध झालेले आहे.
विरोधकांनीही केवळ मोदी विरोध करून काही होणार नाही. त्यांना समर्थ पर्याय द्यावा लागेल, स्वतःची धोरणं स्पष्टपणे, प्रभाविपणे लोकांसमोर मांडली पाहिजेत. लोकशाहीसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मजबूत हवेत. एखाद्याची निरंकुश सत्ता उपयोगी नाही. देशात विरोधी पक्षांचे अस्तित्व राहणार नाही अशी परिस्थिती असू नये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षानी, नेत्यांनी जबाबदारीने, प्रामाणिक भूमिका घेऊन जनतेसमोर जावे. काय निर्णय घ्यायचा, कोणाला सत्ता द्यायची, कोणाला विरोधात बसवायचे याचा निर्णय घेण्याइतका भारतीय मतदार नक्कीच सक्षम आहे.
मकरंद भागवत, चिपळूण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!