विलास रकटे जुन्या काळातील एक प्रसिध्द अभिनेते.वाळवा तालुक्यातील कामेरी हे विलास बापूंचे गाव.काही वर्षांपूर्वी बापूनी प्रतिकार या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.हा चित्रपट निर्माण करताना बापूना कर्ज काढावे लागले.प्रतिकार गावोगावी गेला . त्या चित्रपटाची चर्चा झाली मात्र बापूंच्यावर मात्र कर्जाचा डोंगर वाढत गेला.चित्रपटाच्या माध्यमातून गावातील धनदांडग्यांच्या विरोधात प्रतिकार करणाऱ्या बापूना या चित्रपटासाठी स्वतःवर अनेक संकटे ओढवून घ्यावी लागली. बापू कर्जात अडकले..
सगळे चित्रपट शहरात निर्माण व्हायचे किंवा शहरी लोक चित्रपट बनवायचे पण बापूनी मात्र कामेरीत प्रतिकार बनवला.निळू फुले, श्रीराम लागू,अलका कुबल,राहुल सोलापूरकर हे मोठे अभिनेते कामेरीत आले होते.निशिगंधा वाड यांचा हा पहिला चित्रपट. खेड्यातील एका तरुणांने बनवलेली ही एक कलाकृती होती..प्रतिकार नंतर बापूचे प्रतिडाव,एक गाव बारा भानगडी, गाव तसं चांगलं हे चित्रपट आले.बापूंच्या अभिनयाची लोकांना भुरळ होती.खेड्यात आणि शहरात बापूंचा एक चाहता तयार झाला.रविवारी टीव्हीवर बापूंचे अनेक चित्रपट असायचे. विशेषतः त्यांचा रंगेल आणि रगेल खलनायक लोकांना भावायचा.
"सामना"या चित्रपटात त्यांनी साकारलेला सर्जेराव धोंडे पाटील आजही जशाचा तसा लक्षात आहे.सख्या रे घायाळ मी हरणी या गाण्यादरम्यान विलास रकटे बापू यांच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला दिसतात.त्यांचा त्या चित्रपटातील गावगुंड म्हणून असलेला बेदरकारपणा ठायी ठायी दिसतो.न बोलताही त्यांचा कृतिशील अभिनय आपल्याला भावतो.
मराठी चित्रपटाचा एक काळ विलास रकटे यांनी गाजवला.अतिशय कमी पैशात त्यांनी अभिनय केले.स्वतः चित्रपट निर्मिती केली.कलेच्या वेडात धावले पण आर्थिक गणित जमली नाहीत.मग त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. बापू एवढ्या अडचणीत आले.अनेक राजकारणी त्यांचे मित्र. पण बापूनी कधीही त्यांना आर्थिक अडचणी सांगितल्या नाहीत.माजी मंत्री डॉ पतंगराव कदम हे सुद्धा त्यांच्या जवळचे मित्र होते.त्यांनी अनेकदा बापुना सहकार्य करण्याबद्दल आपूलकीने विचारले होते पण बापूनी त्यांच्याशी निखळ मैत्री ठेवली.स्वार्थ आणला नाही.
शरद पवार यांनी जेव्हा समाजवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे असं म्हणत बापू त्यांच्याकडे गेले. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ अनेक सभा केल्या(तेव्हा बापुना बघायला लोक गोळा व्हायचे.एवढी त्यांची क्रेझ होती.)मला पवार यांच्याकडून काहीही अपेक्षा नव्हती फक्त त्यांच्या भूमिकेला मला पाठिंबा द्यायचा होता.प्रचार केला आणि बाजूला झालो"अस बापू सांगतात..
बापूंना मी बऱ्याचदा भेटलो.दोन दिवसांपूर्वी त्यांना भेटायला दवाखान्यात गेलो.त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेली.ज्या परिसरात बापूंची सगळं आयुष्य गेलेलं.त्या जयप्रभा स्टुडिओ परिसरात हे हॉस्पिटल आहे.मी गेलो.दरवाजा उघडला.बापू निवांत बसलेले.त्यांच्या गुडघ्याला पट्ट्या दिलेल्या,
"या संपतराव."आवाज तोच करारी.पण बापूंची ती अवस्था पाहून वाईट वाटलं.त्यांना तस जाणवलं.मग तेच म्हणाले."वाईट वाटून घेऊ नका.मला काहीही होत नाही.क्रांतीपर्व पडद्यावर आणल्याशिवाय मला काहीही होत नाही."मग त्यांनी गप्पा सुरु केल्या. त्या परिसरातील जुन्या आठवणी सांगू लागले.
"तुम्ही आला बर वाटल.."मग त्यांनी पत्नीला सांगितलं."चहा सांगा."
"अहो बापू, आपण काय घरी नाही आता.मला चहा नको."
"तस कस?"त्यांनी म्हटलं..
"मग बिस्कीट तरी द्या."काकीनी त्यांच्याकडं बिस्कीटचा पुडा दिला. बापूनी पुडा फोडून मला सहा बिस्कीट दिल.
"एवढी कशाला?
"खावा"आवाजात जरब.
"डॉक्टर चांगले आहेत. Raju Shetti राजू शेट्टी यांनी खूप मदत केलीय.रवींद्र पन्हाळकरांचा मुलगा रोज डबा आणतोय.ते माझे मित्र.ते गेलेत पण मुलांनी ओळख सोडलेली नाही.खूप जिव्हाळ्याने सगळं करतात."हे सांगताना मात्र सामना चित्रपटात मस्तवाल भूमिका करणारा रगेल सर्जेराव (बापू)गहिवरले.त्यांच्या पत्नी रडायला लागल्या. पण बापू लगेच सावरले.
पुन्हा बोलू लागले.तेवड्यात नर्स आली.तिला काल माहीत झालेलं होत. या खोलीतील हा धिप्पाड म्हातारा अभिनेता आहे.ती सामना बघून आलेली.
"अहो काका,तुम्ही किती तरुण होता तेव्हा."तिला बापूंच्या अभिनयाचं कौतुक असत.ती भरभरून बोलते.बापू मंद हसतात प्रतिकार मधील रणजितसारख..
खिडकीतून लक्षात येत आता दिवस मावळायला गेलाय.मी उठतो.अजून खूप पल्ला गाठायचा होता. बापूंचा निरोप घेतला.
"बापू पैशाच काय केलंय?"
"आहे,होईल जुळणी."ते सांगतात.मी पुन्हा पुन्हा विचारलं तरी ते सांगत नाहीत.दाद देत नाहीत. काहीही न मागण्याचा आणि स्वप्रतिमेच्या बळावर काही मिळवण्याचा त्यांचा स्वभाव नाही.मी निघालो. मला माहिती आहे ते कधीही त्यांच्या अडचणी सांगणार नाहीत.पण ते अडचणीत आहेत हे नक्की.आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे.
संपत मोरे
9422742925
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!