नशिब, नियती, दुर्भाग्य या माणसाला कमकुवत बनवणाऱ्या शब्दांवर खरंच विश्वास ठेवायचा का?
नशिब, नियती, दुर्भाग्य या माणसाला कमकुवत बनवणाऱ्या, हताश करून जिवनातील उमेद संपवणाऱ्या शब्दांवर खरंच विश्वास ठेवायचा की नाही? असा आज मला प्रश्न पडला. आणि हा प्रश्न पडण्याचं कारण आहेत या फोटोतील आजीबाई..
आज जोतिबा येथील एका शासकीय कार्यालयात एका अधिकाऱ्यांशी गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात हातात एक कापडी पिशवी अडकलेली, पायात तारेने तुटलेले चप्पल जोडलेली, कदाचित कुटुंबीयांचा आधार तुटल्यामुळे हातात आधारासाठी घेतलेली काठी आणि खपाटीला गेलेलं शरीर घेऊन एक आजीबाई त्या कार्यालयात आली. आमचं काही वेळ या आजीकडे लक्षच नव्हतं. "सायेब जरा माझ्याकडं बघता का?" असा प्रश्न कार्यालयाच्या दारातून आमच्याकडे आला तशा आमच्या माना दरवाजाच्या दिशेने वळल्या. दारात या आजीबाई होत्या. त्यांना पाहून त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय हवं आहे याची प्रेमाने चौकशी केली. यावर त्या आजीबाईने जे काही सांगितले ते ऐकूनच मला हा प्रश्न पडला. ही आजी जोतिबा डोंगरावर भिक्षा मागून आपलं उरलं सुरलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच जोतिबाची चैत्र यात्रा झाली आहे. या यात्रा काळात या आजीने उन्हा तान्हात बसून भिक मागून साठवलेले पैसे ठेवलेली पिशवी एका चोरट्याने डाव ठेऊन पळवून नेली होती.. आणि तो चोरटा कोण आहे हे सी सी टीव्ही कॅमेऱ्यात दिसतोय का बघा, अशी भाबडी आशा घेऊन ही आजी या कार्यालयात आली होती. गेली तीन दिवस झाले ही आजी त्या चोरट्याला शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे. हो निष्फळच प्रयत्न म्हणावे लागेल कारण कोण दखल घेणार आहे या उपेक्षित आजीची?.. मी सहज या आजींना विचारलं "आजी किती पैसे होते पिशवीत?" "अजून एक चार दोन दिसांची भुक भागल एवढं पैकं हुतं बघ लेकरा" आधीच उन्हाच्या तडाखा सुरू असताना या उत्तरच्या आगीचा गोळा माझ्या आणि त्या अधिकाऱ्यांच्या काळजावर येऊन धडकला. हे उत्तर ऐकून मी आणि ते अधिकारी काही काळ स्तब्धच बसलो. "सायेब बोला की हुईल का मदत मला?" या आजीच्या दुसऱ्या प्रश्नांनं आम्ही दोघं पुन्हा भानावर आलो. त्या अधिकाऱ्यांनी आजींना बसायला सांगून त्यांना सी सी टीव्हीचे कंट्रोल रूम मंदिरात असल्याचे सांगून तिथे चौकशी करायला सांगितले. यावर ती आजी बरं एवढंच हतबलता दाखवणारा एक शब्द बोलून निघून गेली...
कसलाही कौटुंबिक आधार नाही, समाज आपणाला एकरूप कअरुण घेईल याची अपेक्षा नाही, जगण्यापेक्षा मरणाची आस अधिक आहे पण मरत नाही या मानसिकतेत एक एकाकी पडलेली स्त्री उन्हा तान्हात बसून भिक मागून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करते आणि आलेले चार पैसे ही क्रूर नियती तिच्याकडून हिसकावून घेऊन पुन्हा तिच्याच पाठीमागे हतबल होऊन फिरायला लावते... मग सांगा नशिब, नियती आणि दुर्भाग्य या सारख्या नकारात्मक शब्दांवर आपण विश्वास ठेवायचा की नाही?
@अमोल शिंगे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!