स्मृती चिन्हांचे करायचे काय?
स्मृती चिन्हांचे करायचे काय?
मी एकदा सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू म्हणून डॉ एस. आय. पाटील यांची नियुक्ती झाली म्हणून सोलापूरला त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याबरोबर गेलो होतो. तिथे गेल्यावर आम्हा सगळ्यांचे सत्कार झाले. प्रत्येकाला रुमाल गुच्छ देण्यात आले घरी आल्यावर उघडून बघितल्यावर त्यात प्रत्येकी पाच रुमाल होते....
नॅपकिन बुके अर्थात *रुमाल गुच्छ* देऊन, नानाविध रंगाची, नजाकतीने आणि अतिशय सुबक पद्धतीने त्याची केलेली बांधणी, दिसायला अगदी पुष्पगुच्छासारखे दिसणारे हे रुमाल.
सोलापूर हे हातमाग, कपडे, चादरी यासाठी जगप्रसिद्ध.......
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी सुरुवातीला कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो त्याच्या आधी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जात असे सुरुवातीच्या काळात किमान रोज एक बुके नंतर स्मृतीचिन्ह एवढा भारंभार सगळा पसारा गोळा झाला की, मी गेल्या वीस वर्षात जमा झालेली चार पोती स्मृतिचिन्ह माझ्या श्रीगोंद्याच्या चांडगावच्या घरी नेऊन ठेवलीत. ठेवायला जागाच नाही.
या स्मृतीचिन्हांचा करायचं काय? किंवा मोठाले बुके अर्थात पुष्पगुच्छ याचे पुढे काय होतं?
लोक पुष्पगुच्छ देतात, तासाभराचे काम असते नंतर तो फेकून द्यावा लागतो. वास्तविक पुष्पगुच्छ किती मोठा द्यावा याचीसुद्धा अहमहमिका लागलेली असते, व्यासपीठावर लोकांच्या वीस पंचवीस जणांच्या घोळक्याला एकत्र गुंफणारा हार घालण्याच्या प्रथा आता काही नवीन राहिलेल्या नाहीत. पुढे या गोष्टीच काय होतं......
स्मृतिचिन्ह देण्याचं तर पेवचं फुटलय.
यापेक्षा वाईट आहे ते म्हणजे स्मृतिचिन्ह तयार कशाची केली जातात. बऱ्याचदा ही स्मृतिचिन्ह झाडांच्या बुंध्यापासून अर्थात पर्यावरणाचा ऱ्हास करून किंवा एखाद्या धातूचा वापर करून आणि अगदीच स्वस्त म्हणजे प्लास्टिक पासून किंवा कचकड्यापासून बनवलेले असतात. याचा पुढे काय उपयोग होतो?
स्मृतिचिन्ह पुढे काय? हा यक्षप्रश्न आहे घरात ठेवायला जागा नसते. खरच ही स्मृती देण्याची आवश्यकता आहे का? अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्मृतिचिन्ह देण्याचा सर्रास वापर होतो.
शालींच्या तर खूपच गमती जमती असतात. खूप शाली गोळा झाल्या म्हणून अनेकांना दिल्या. अनेक कार्यक्रमात पुन्हा पुन्हा वापरल्या. एकदा सहज मनात आलं की आपण या वारकऱ्यांना वाटू म्हणून उत्साहाने मी आणि दिनेश जाधव असं दोघं वाटायला गेलो. एक वारकरी म्हटला देऊन द्यायची तर चांगली तर द्यायची या तुम्ही दिलेल्या या शालीचा उपयोग लंगोट म्हणून सुद्धा होणार नाही.अंगावर आले. हल्ली लोक शाल सुद्धा दोन तुकडे करून देतात..... तिसरा एक विषय आहे आणि तो म्हणजे फेट्यांचा किंवा उपरणे हे सगळं कशासाठी तर केवळ फोटोत बर दिसावं म्हणून .
हे थांबवता येईल का? पर्याय शोधावे लागतील! मी राष्ट्रीय सेवा योजनेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कार्यक्रम समन्वयक असल्यापासून अनेक महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये रोपे देण्याचा प्रघात पाडला आहे. सुरुवातीला खूप छान चाललं होतं की रोप द्यायचं कमवा शिकाच्या विद्यार्थ्यांनी ते घ्यायचं आणि त्या व्यक्तीच्या नावाने स्मृती म्हणून जतन करायच. काही जण घरी नेतात काही जण तशीच ठेवतात या रोपांची खूपच हेळसांड होते ही रोपे वृक्षारोपण म्हणून किती ठिकाणी लावली जात असतील हा प्रश्नच आहे.?
इतर देशात विशेषत: युरोपियन देशांमधून अशा प्रकारचे चोचले पुरवले जात नाही. तिथे स्मृतिचिन्ह अर्थात सोव्हीनियर म्हणून अगदी छोटी एखादी तबकडी किंवा एखादा मग, चमचा अशा वस्तू दिल्या जातात. आपणच स्मृतिचिन्हचा आग्रह का धरतो? स्मृतीचिन्हावर काय असते? तर देणाऱ्यांचा पण फोटो असतो ज्याला द्यायचे त्याचं नाव असतं.... कधी कधी काहीच नसतं. काही वर्षांनी कुठले स्मृतीचिन्ह कोणी दिले काहीच आठवत नाही....
फेटे, शाली याबद्दल न बोललेले बरे. या कापडाचा ना धडूत म्हणून ना बाळूत म्हणून उपयोग होतो पाय पुसनी काय पण पोथार्यासाठी सुद्धा उपयोग होत नाही. ...
मी 2002 साली ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तिथे आंतरराष्ट्रीय परिषद होती जगभरातून 500 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आले होते एका मोठ्या सेमिनार हॉलमध्ये याचं अप्रतिम नेटके आयोजन केलं होतं. कसलाही गाजावाजा नाही. शांत स्वरातले संगीत. उद्घाटन रिबन कापून. सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे ऑस्ट्रेलियाचे मिनिस्टर आले होते.
नऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार होता पावणे नऊलाच सगळे आत बसले होते.आत बसा! कार्यक्रम सुरू होणारे! नाश्ता लवकर संपवा... असं कोणी कोणाला काहीच सांगत नव्हतं. शार्प नऊ म्हणजे नऊ म्हणजे नऊला कार्यक्रम सुरू झाला......!!!
त्यांना सहा मिनिटे भाषण करायला वेळ दिला होता सहाव्या मिनिटाच्या आज त्यांचे भाषण संपले होते.....
आपण कधी कधी किती गोष्टीवेल्हाळ... भाषण करतो. मागच्या आठवड्यात एका ठिकाणी माझ्या भाषणाच्या आधी एक जण बोलत होता... वास्तविक प्रास्ताविक होते प्रास्ताविक इतकं लांब इतकं लांबलं की माणसं कंटाळून गेली... शेवटी मी कसा बसा उभा राहिला.. परिचयाचे तर बोलायलाच नको.... एखाद्याने हल्ली परिचय मागितला की भीतीच वाटते ....आपण कितीही छोटा परिचय दिला ....तरी त्याला विशेषण किती लावावी त्याला काही मर्यादाच राहत नाहीत.. आणि माणसं विनाकारण झाडावर चढवून आपल्याला फुकाचे श्रेय देतात....
असो वेळ, वाचवायला हवा...
.......
बदलता येईल का? हे सगळं. यासाठी हा लेखन प्रपंच.
उपयोगी येणाऱ्या वस्तू, जसे नॅपकिन बुके, उत्तम कुंडीतील कॅक्टस 🌵, किंवा बोन्साय, स्नेहवस्र, टोपी उपयोगी वस्तू........ अगदी कंपोस्ट खताची बॅग, गांडूळ खताची बॅग , यादी खूप वाढवता येईल!!!!! गेला बाजार फळांची बास्केट, मागे एकदा डाळिंबाचे पॅक करून दिले होते ज्यांना दिले त्यांचे काही नाही पण त्यांच्या घरच्यांनी मला फोन करून सांगितले होते की सर धन्यवाद डाळींब दिल्याबद्दल....श्रीफळ तर देतोच आपण.... पुस्तके देतो.... पण हल्ली ती प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळण्याची प्रथा सुरू झाली आहे, तशीच दिली तर.....
..... लगेच नाही अमलात येणार, पण हळूहळू परिवर्तन शक्य आहे.
चला तर पर्यावरणाचा ऱ्हास वाचवूया....
ज्ञानसूत
डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, टी जे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
माजी सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
०४ मार्च २०२३..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!