पाखऱ्या.... महाराष्ट्राचा मिल्खासिंग...!
महाराष्ट्राचा मिल्खा सिंग शेतमजूर म्हणून काम करतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव
डॉ सुभाष देसाई
30 सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक मिळवणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूला आज दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असावी ही आमच्या देशाची दुर्दैवी परिस्थिती आहे. वयाच्या 67 वर्षी सतत धावणारा हा महाराष्ट्राचा मिल्खासिंग एवढी पदके जिंकूनही गवंड्याच्या हाताखाली काम करतो, शेतमजूर म्हणून घाम गाळतो. तरीपण कोणी आमदार ,माजी मंत्री, पालकमंत्री ,शिक्षण संस्था प्रमुख जिल्हा परिषद सदस्य ,रोटरी क्लब ,लायन्स क्लब ,मामलेदार ,प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी या साऱ्यांच्या नजरेतूनही तो उपेक्षितच राहतो ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. या प्रतिभावंत खेळाडूला साधी शासनाची ज्येष्ठ नागरिक म्हणून सुद्धा ,कलाकार म्हणून सुद्धा अनेक खेलपाटे मारूनही मदत मिळत नाही .आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये भाग घेण्याची इच्छा असून आर्थिक दुर्बलतेमुळे आणि अशिक्षितपणामुळे तो वंचितच राहतो.
बजरंग महादेव चव्हाण वय ६७ हा गारगोटीतील खेडूत. याची जीवन कथा त्याच्याकडून ऐकताना मला असे वाटले की महात्मा फुलेंनी जे सांगितले ते खरे आहे. ते म्हणत अशिक्षितपणा हा जीवनातील साऱ्या अनर्थाचे मूळ आहे. जर बजरंग शिकला असता ,फाडफाड इंग्रजी बोलला असता, सूट पॅन्ट मध्ये वावरला असता तर त्याच्याकडे राजकीय नेत्यांनी निश्चितच लक्ष देऊन त्याचा उपयोग निवडणुकीच्या वेळी करून घेतला असता.
अशिक्षितपणामुळे स्पर्धेमध्ये भाग घेताना सुद्धा त्याला असंख्य गोष्टींच्याशी सामना करावा लागला 50/ 55 किलोचा हा शिडशिडीत ,काळा सावळा माणूस पाहून स्पर्धेच्या ठिकाणी त्याला बाजूलाही करण्यात आले पण त्यांने जिद्द सोडली नाही आणि स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्यावरच त्या ठिकाणी लोकांना कळले की हा खरोखर महाराष्ट्रातला मिल्खासिंग आहे आज पर्यंत त्यांने हरियाणा, बेंगलोर ,मंगलोर, नाशिक, पांजा, उत्तर प्रदेश, दिल्ली ,नाशिक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली आहे अशा दहा स्पर्धांमध्ये आजपर्यंत चमकला आहे.
त्याच्या जीवनात काही गमतीशीर प्रसंग आले. पंजाबला जेव्हा त्याने स्पर्धा जिंकली त्यावेळेला त्याला पंजाबी माणसाने विचारले तु हे कोणते बूट घातलेस ?त्यावेळेला मोडक्या थोडक्यात हिंदी भाषेमध्ये तो म्हणाला "ये हमारा वाडेका बूट है "त्या पंजाबीला समजेना हे कोणत्या कंपनीचे बुट आहे त्यावेळी दुसऱ्या महाराष्ट्रीयन माणसाने समजून सांगितले की" त्याच्या खेड्यामध्ये उसाच्या पाल्याला वाडे म्हणतात ते कापून जनावरांना आणण्यासाठी तो जे बूट वापरतो तेच हे बूट आहेत" हे ऐकल्यावर पंजाब मधल्या त्या दिलदार खेळाडूंने त्याच्यासाठी एक चांगले बूट विकत आणून भेट दिले
पंढरपूरच्या पांडुरंगाचा भक्त असल्यामुळे हा शाकाहारी आहे आणि त्यामुळे अनेक स्पर्धेच्या वेळेला त्याची पोटाचे हाल होतात अर्धवट उपाशीपोटी तो धावतो असे करूनही अलीकडे 42 व्या नॅशनल मास्टर्स ऍथलेट चॅम्पियनशिप खरगपूर येथे आयआयटी मिदनापूर कॉलेजच्या ग्राउंडवर झालेल्या स्पर्धेत 12 फेब्रुवारी 20 23 मध्ये बजरंग चव्हाण 800 मीटर मध्ये पहिला क्रमांक पंधराशे मीटर मध्ये पहिला क्रमांक 400 मीटर मध्ये दुसरा क्रमांक आणि 5000 मीटर मध्ये पहिला क्रमांक मिळवला याबद्दल त्याचे देशभर कौतुक होते पण असे म्हणतात की जिथे पिकते तिथे विकले जात नाही त्यामुळे आजही त्याला परदेशात निमंत्रण असून सुद्धा पैसे अभावी जाता येत नाही. त्याने कळकळीने साऱ्या श्रीमंत राजकीय पुढाऱ्यांचे दरवाजे ठोठावले , दुकानदार,
खोकेवाल्यांच्याकडे हात पसरले पण कोणी फुटकी कवडीही त्याच्या पदरात टाकली नाही त्यामुळे हा बिचारा आजही बांधकाम आणि शेतमजूर म्हणून राबवत असतो पण हे करत असताना आपल्या गावातली चार पोर लष्करामध्ये दाखल व्हावी यासाठी त्यांना मोफत धावण्याचे प्रशिक्षण देत असतो एवढी दानत त्याच्यामध्ये आहे
तो एखाद्या पाखरासारखा पळतो म्हणून त्याला पाखऱ्या या टोपण नावाने तालुका ओळखतो आणि त्याचप्रमाणे वारंवार त्याला स्पर्धेमध्ये भेटणारे देशातील अनेक खेळाडू त्याला पाखरा म्हणूनच बोलवतात हजारो किलोमीटर लांब काही अन्न पाणी नसताना एखादा चिमुकला पक्षी आकाशातून उडत उडत उडत जातो तो निसर्गाचा चमत्कार असतो तसाच आमचा गारगोटीतील सुपुत्र राष्ट्रीय स्तरावर धावतच आहे धावतच आहे याच्यावर छान डॉक्युमेंटरी होऊ शकते एखादी कादंबरी होईल , त्याचं सुंदर आत्मचरित्र होऊ शकेल.
एखाद्या साखर कारखान्याने त्याला गुणी खेळाडू म्हणून दत्तक घ्यावे त्याच्या पालनपोषणाचा भार सोसावा भुजरगड तालुक्याच्या तहसीलदार प्रांताधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे गुणाची कदर करणारे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावर साहेब यांनी बजरंग चव्हाण ला तो सुखाने चार घास खाऊ शकेल अशा एखाद्या योजनेचा लाभ द्यावा व त्याला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती करावीशी वाटते.
डॉ. सुभाष देसाई गारगोटी कोल्हापूर
९४२३०३९९२९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!