भा.ज.पा.चे आमदार, खासदार आजही राजभवनावर.....
मुंबई : कोरोना स्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची तक्रार करण्यासाठी भा.ज.पा. नेत्यांनी आजही राजभवनावर हजेरी लावली. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी राजभवनावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भा.ज.पा.ची मागणी नाही, असे भा.ज.पा. नेत्यांनी जाहीर केले आहे. तरीही राज्यपालांकडे तक्रारीसाठी रोजचा कार्यक्रम कायम ठेवून भा.ज.पा.ने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कायम ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांकडे निवेदन द्यायला गेलेले नेते हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आहेत. या तीन नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन त्यांना कोरोनाच्या प्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने उग्ररूप धारण केलं असताना देशाच्या कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली असताना, राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत. मोलमजुरांचा प्रश्न असेल, कोरोना रुग्णांच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था, रेशन वाटप, व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रक्रिया याबाबतीत सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
दीपक भातुसें यांचे कडून वृत्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!