मोक्षाचे गाजर अन धनावर नजर... : पुरुषोत्तम आवारे पाटील
पुरुषोत्तम आवारे पाटील : मोक्षाचे गाजर अन धनावर नजर ...
वयाची चाळीशी ओलांडली की अर्धवट व्यक्ती गपगुमान देवदेव करायला लागतो. ज्ञानाच्या बाबतीत समाजातील बहुतांश व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष इच्छा असूनही अर्धवट राहतात. लहानपणी सगळ्यांवर कुटुंबात सारखेच संस्कार केले जातात. पुढे ज्याला शिक्षण संधी मिळते आणि जगाच्या संपर्कांत येतो तेव्हा आपण किती खुळचट विचार करीत होतो याची जाणीव होते मग मुक्त विचारांच्या दिशेने झेप घेण्याची लालसा विविध विषयावरील वाचन करायला प्रवृत्त करते त्यातून विचार आणि मेंदू व्यापक व्हायला मदत होते. अश्या व्यक्ती चौफेर वाचन केल्यामुळे पुढच्या आयुष्यात सहसा कुणाच्या प्रभावात येत नाहीत. स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची प्रक्रिया विकसित होते. अशा व्यक्तीला रस्त्यावरचा गारुडी असो किंवा कुण्या पंथाचा महंत असो कुणीही चिकन्याचोपड्या गोष्टी सांगून फसवू शकत नाही. संधी अभावी असंख्य लोक या मार्गाने जाऊ शकत नाहीत तेच कुणाचेही सहज खाद्य बनतात.
माझ्या घरात वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्याचा परिणाम माझ्यावर होणे स्वाभाविक होते. वडिलांच्या तुलनेत आईचा ओढा कीर्तन,प्रवचन,भागवत ,सत्संगाकडे अधिक असल्याने दर एकादशीला जवळच्या भास्कर महाराज संस्थानवर वासुदेव महाराजांच्या कीर्तनाला आईसोबत माझी हजेरी असायची. पुढे त्यातूनच माझी रवानगी उन्हाळी अध्यात्म प्रशिक्षण शिबिरात झाली. सतत तीनवर्ष एकेक महिन्याचे हे शिबीर केल्यामुळे माझा अध्यात्माचा पाया पक्का होण्याला मदत झाली.
भगवतगीता,हरिपाठ,चांगदेव पासष्टी,ताटीचे अभंग ,ज्ञानेश्वरी ,नाथांची भारुडे या अभ्यास विश्वात रमल्यावर वारकरी संप्रदाय आणि त्यातील संतांचा अभ्यास झाल्यावर या बंडखोर संप्रदायाचा मी पक्का चाहता झालो. तुकारामांनी मेंदूचा ताबा घेतला आणि त्यांनीच बुद्धाचेही दर्शन अभंगातून घडविण्यास मदत केली. वारकरी संप्रदायाने समाजाला जो भक्तिमार्ग दिला त्यासारखा सिलॅबस आजवर कोणत्याही पंथात सापडू शकला नाही ,बाह्य स्वरूपाला भुलून तुम्ही कोणत्याही पंथात जाऊन बघा ,असे तिथे काहीही सापडणार नाही ज्याची उजळणी वारकरी संतांनी केली नाही.
कडक वारी,उपवास किंवा भक्तीचे अवडंबर मला कधीच जमले नसले तरी वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांबद्दल माझे '' भक्तिभान'' विकसित होण्यास तुकारामांची गाथा कारणीभूत असल्याचे मी मानतो कारण सगळे करून काहीही करू नको याचे स्वातंत्र्य हीच गाथा देते. पुढे साळूंखे सरांचा '' विद्रोही तुकाराम '' वाचल्यावर आपण पक्के तुकारामांचा नास्तिक बनलो आहोत याची मला जाणीव झाली. चाळीशीच्या पुढे झुकू लागल्यावर लाखोंचे देवदेव करणे नेमके काय असते हे समजून घेण्याचे भानही हाच संप्रदाय सगळ्यांना देतो. त्या पृष्ठभूमीवर अलीकडे उदयास आलेले शेकडो संप्रदाय आणि हजारो बुवा,बाबा,महंत,स्वामी,पिठाधीश्वर आणि कथित संत यांची मांदियाळी बघितली तर एकाच प्रश्न डोक्यात येतो की हे वारकरी संतांपेक्षा वेगळे काय सांगतात ? खोलात गेल्यावर कळते की नवे काहीच नाही ,बॉटल बदलतात ,भक्तीरस तोच असतो.
गेल्या महिन्यात मध्यप्रदेशातून देशभर ज्या बाबांची लाट देशात आली आहे त्यात तीन महाराज माध्यमातून सतत चर्चेत आहेत. छतरपूर जिल्ह्यातील गडा येथील बागेश्वर धामवाले ध्रीरेंद्र शास्त्री , दुसरे दतिया जिल्ह्यातील पंडोखर धामवाले बाबा आणि तिसरे सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम वाले कथावाचक प्रदीपशास्त्री मिश्रा या तिघांच्याही तीन वेगवेगळ्या तऱ्हा आहेत यापैकी पंडोखर आणि बागेश्वर धामवाले भविष्य सांगण्याचा व्यवसाय करतात मात्र त्याचा दोष स्वतःपर्यंत येणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतात. माझ्यात काहीही शक्ती नाही जे काही चमत्कार होतात ते देवाच्या कृपेने होण्याचा ते दावा करतात. उद्या कायद्याचा प्रश्न निर्माण झालाच तर स्वतः सहीसलामत कसे सुटून जात येईल याची अतिशय शिताफीने त्यांनी काळजी घेतली आहे. सोशल मीडियाचा उत्तम उपयोग करून त्यावर लाखी चाहते निर्माण करण्यात या दोघांनीही यश मिळवले आहे.
तिसरे पंडित प्रदीप मिश्रा स्वतः कोणत्याही चमत्काराचा दावा करीत नाहीत मात्र भगवान शंकराच्या कथेचा आणि चमत्कारांचा खुबीने प्रवचनात,कथेत वापर करीत लाखो लोकांच्या मेंदूत चमत्कार भरण्यात यशस्वी झाले आहेत. वरील तिन्ही महाराजांचा एक मुद्दा सामान आहे तो म्हणजे तिघेही कथावाचक आहेत. रामकथा,श्रीकृष्ण कथा आणि शिवकथा यांची धार्मिक ढाल पुढे करून लाखो भाविकांच्या मेंदूत त्यांना हवे ते टाकण्यास सध्यातरी त्यांच्याइतके यश कुणालाही मिळू शकले नाही. प्रदीपशास्त्री यांचे सादरीकरण,आवाज आणि व्यासपीठावर वावरण्याचा अभिनय इतका प्रभावी असतो की एकदा कथेला बसलेला श्रोता त्यांच्या प्रेमात पडेल. भारतीय भाविक देवांच्या कथा ,चमत्कार आणि लीलांनी एवढे भारावून गेलेले आहेत की आताच्या काळातही तोच आभास निर्माण करून त्यांचे मानवी रोबो तयार होऊ शकतात याची या सगळ्या महाराजांना पक्की खात्री पटलेली आहे.
प्रदीपशास्त्री शिवकथा पुराणात केवळ जुन्या कथा सांगत नाहीत तर आताच्या काळात सुखी, धनवान, निरोगी, आनंदी कसे व्हावे याचे तोडगे सांगतात. भगवान शंकराच्या पिंडीवर स्त्रीने दररोज एक लोटा जल टाकले की कोणतीही समस्या हल होते. अश्या स्त्रीच्या जीवनात काहीही समस्या, संकट येऊच शकत नाही असे ते सांगतात. अभ्यासात मन लागत नसेल किंवा अभ्यास झाला नसेल तर काळजी नका करू,बेलाच्या पानाला सहद लावून ती पाने पिंडीला चिकटवा तुम्हाला परीक्षेत उत्तम यश मिळेल असाही दावा मिश्राजी सहज करतात. रुद्राक्षाची महती तर काय सांगावी ?जगातील सगळ्या प्रश्नावर जणू रुद्राक्ष हेच रामबाण औषध असल्यासारखे ते दवे करतात. युट्युबवर याबाबत शेकडो व्हिडीओ तुम्हाला बघायला मिळतील.भाविक त्यांचे हे फंडे ऐकून एवढे प्रभावित झाले आहेत की लाखोंच्या संख्येने त्यांनी सिहोरला गर्दी करून स्वतःचे मरण ओढवून घेतले आहे.
एवढे लोक अश्या सगळ्या बाबांच्या मागे कामधंदा सोडून का लागताहेत ? याचा खोलात जाऊन विचार केल्यास प्रत्येकाला मोक्षाची आस लागली आहे. हिंदुधर्मात मोक्षप्राप्ती हेच अंतिम ध्येय असल्याचे मानले जाते. दानपुण्य आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊन इथे प्रत्येकाला थेट स्वर्गात स्वतःसाठी जागा बुक करायची आहे. नरकाचे भीतीदायक चित्रण पोथ्या पुराणांनी दाखवले आहे त्या मार्गाने कुणालाही जायचे नाही . मोक्षाचे गाजर अन सुखाची लालसा यामुळे ही लाखो पाऊले या मार्गाने वळताना दिसत आहेत. हिंदुधर्मात शेकडो पंथ आणि तेवढेच तत्वज्ञान आहेत मात्र आईबापाची सेवा हीच मोक्षाची प्राप्ती असल्याचे विशुद्ध तत्वज्ञान केवळ वारकरी संप्रदाय देते याचा विसर आभासाच्या मागे लागलेल्या लोकांना पडला आहे. तात्कालिक बुवा बाबांचे हे जेकाही पीक फोफावले आहे त्याला वारकरी संप्रदायावर बसलेला विस्मरणाच्या थर कारणीभूत आहे.
संतज्ञानेश्वर,तुकोबा,नामदेव,गोरोबा,चोखा,जनाई यांचा मूळ गाभा सांगण्यात आजचे वारकरी कमी पडले आहेत म्हणून इतरांना संधी मिळाली आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!