हरिबा बेनाडे यांच्या आईंची साने गुरुजींनी घेतलेली ही ह्रद्य भेट
आज परमपूज्य साने गुरुजी यांची जयंती... पंढरपूर मंदिर प्रवेश लढ्याच्या वेळी फिरताना ते निपाणी व परिसरात आले होते व त्यावेळी नानीबाई चिखली येथे ते आले होते.भारतमातेसाठी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा हरिबा बेनाडे यांचे हे गाव.. याच हरिबा बेनाडे यांच्या आईंची साने गुरुजींनी घेतलेली ही ह्रद्य भेट व तिचे लेखन चंद्रकांत पाटगावकर या थोर व्यक्तीने केले आहे. ते वाचनात आले,त्यांच्याच शब्दात जशाच्या तसा हा लेख,जरूर वाचा...
*********************
पांगिऱ्यानंतर निपाणीच्या पलिकडल्या चिखली गावी गुरुजींचा मुक्काम होणार होता. बेचाळीस होऊन गेले होते. त्या क्रांतीयुद्धांत चिखलीच्या हरी बेनाडेची आहुती पडली होती. घरात म्हाताऱ्या आईने हरीसाठी हाय खाल्ली तिचा आधार नाहीसा झाला होता. अशी कित्येक जीवने त्यावेळी स्वातंत्र्ययुद्धात उध्वस्त झाली होती. कित्येकांना रानोमाळ भटकणे भाग पडले होते. कित्येकांची मातापितरे उघड्यावर पडली होती. सतीसाध्वींची कपाळे फटफटीत पडली होती. मुलेबाळे पोरकी झाली होती. या साऱ्यांचे अश्रू कोण पुसणार? त्यांच्यासाठी मायेने अश्रू कोण गाळणार? गुरुजींचे आगमन चिखली गावात झाले. ढोल वाजवीत मिरवणूक चालली. वाटेत हरी बेनाडेचे घर आले. वाद्यांचा आवाज ऐकून हरीची म्हातारी आई चाचपडत दरवाज्यात आली. अशक्त झालेला देह कसाबसा सावरीत तिने हाक मारली – ‘हरीऽऽऽ! माझा हरी आला का?’ तिचे अधू डोळे हरीला शोधत होते. कुठे दिसणार आता हरी? हरीचा शोध त्या डोळ्यांना कधीतरी लागणार होता का?
हरी---!अरे हरी! तिने पुन:पुन्हा हाका मारल्या. अन् अचानक गुरुजी धावले. त्या मातेला त्यांनी घट्ट मिठी मारली. त्यांच्या नेत्रांतून अविरत अश्रूधारा वाहू लागल्या. ‘माझा हरी!--माझा हरी का रे तू? हर्षातिरेकाने म्हतारी ओरडली. ‘होय आई! मीच तुझा हरी!’ स्फुंदणाऱ्या कंठातून शब्द दाटून आले.म्हातारीच्या डोळ्यांतून धारा ओघळू लागल्या. त्या पवित्र अश्रूजलाचं सिंचन गुरुजींच्या मस्तकावर होऊ लागलं! करूण दृश्य पाहताना साऱ्यांची अंत:करणे थरारली. असंख्य डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या! एक ना दोन. असे कितीतरी प्रसंग. सारे अश्रूंनी भिजलेले. मंगल झालेले. पावन झालेले.
- प्रा. चन्द्रकांत शं. पाटगांवकर
( पंढरपूर मंदिर प्रवेश लढा )
संकलन:मधुकर भोसले,बस्तवडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!