टिपू, शिवाजी महाराज आणि भारतीय शासक.
भारतीय उपखंडात ( भारत देश अस्तित्वात आला १९४७ साली , तोवर संस्थान आणि मोठी राज्य , मांडलिक राज्ये, जहागीरदार ह्यांच्या सत्ता असलेला हा प्रदेश देश म्हणून अधिकृतरीत्या शासकीय कामकाजाच्या निकषावर कधीही सलग आणि एकसंध नव्हता ) होणारे सगळे संघर्ष राजकीय सत्तेसाठी होते ज्यात हिंदू आणि मुस्लीम दोन्ही राजे किंवा सत्ताधीश होते.
हिंदू किंवा मुस्लीम त्या काळच्या प्रचलित स्थितीनुसार कमी अधिक सश्रद्ध होते , धार्मिक होते.
दुसऱ्या धर्माचा आदर राखण हे त्यांची राजकीय गरज होती कारण ज्यांच्यावर राज्य करायचं आणि ज्यांच्या मदतीने राज्य करायचं अशी जनता आणि सरदार दोन्हीही हिंदू मुस्लीम होते.हिंदू राजाचे मुस्लीम सरदार आणि मुस्लीम राजाचे हिंदू सरदार सर्वसामान्य बाब होती.
आपल्याच सरदारांनी आपल्या विरोधात धार्मिक कारणाने बंड करू नये म्हणून ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या धर्माच्या उपासनेची सवलत होती.
काही राजे जास्त कट्टर आणि धार्मिक होते ज्याची किंमत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोजलीही.
टिपू जसा इंग्रजांच्या विरोधात लढला तसाच मराठे आणि निजामाच्या विरोधातही लढला.
इंग्रज परकीय आहेत म्हणून त्यांच्याविरोधात लढणारा तो देशप्रेमी असली सरधोपट मांडणी काय कामाची ? मग इंग्रजांच्या सोबतीने टिपूशी लढणारे मराठे आणि निजाम कोण ? देशद्रोही ?
२००-२५० वर्षापूर्वी अस्तित्वात नसलेल्या देशाच्या संदर्भात आपल्या देशप्रेमाच्या आणि देशद्रोही असण्याच्या आजच्या फुटपट्ट्या घेऊन मोजमाप काढण हीच मोठी चूक आहे.
राजकीय गरज म्हणून आपल्या राज्यातल्या धार्मिक स्थळांना संरक्षण देणारा , दिवाबत्तीची सोय करून देणारा , जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून राजाच्या धर्माच्या विपरीत जनतेचा धर्म असला तरीही सक्तीचे धर्मांतर न करवणारा राजा आणि धर्म आणि राज्यसत्ता जमेल तेवढी वेगवेगळी ठेवून राज्य करणारा राजा चांगला म्हणावा , होय फक्त चांगला , लगेच त्याला पुरोगामी , धर्मनिरपेक्ष असली लेबल लावू नयेत.
ह्या निकषावर कंपनी सरकारची संपूर्ण सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी म्हणजेच १८५७ पूर्वी कोणकोणते राजे कसा राज्यकारभार करत होते हे समजून घेतल पाहिजे.
आणि मग ह्या असल्या समजून न घेण्याच्या वृत्तीने सगळा घोळ होतोय.
आणि फक्त टिपू सुलतान काय म्हणून ? यादी बरीच मोठी आहे.
मलिक अंबर , ज्याने खडकी गाव वसवलं त्याला पुढे औरंगाबाद नाव आलय ज्याने अहमदनगर शहरात खापरी नळ योजना आणून पाचशे वर्षापूर्वी नळाने पाणी दिल.
अहमदनगरचा निजामशहा ज्याने शहर वसवून किल्ला बांधला.
आदिलशहा आहेच ज्याने शहाजीराजांना फर्जंद असा किताब दिला.
गोवळकोंडा आणि कुतुबशहा जो शिवाजी महाराजांचा मित्र होता.
नगरपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेला शहाशरीफ दर्गा जिथ नवस बोलून मुलांची नाव शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली मालोजीराजे भोसलेंनी.
इब्राहीमखान आठवतोय का ? पानिपतात मराठ्यांचा तोफखाना सांभाळून अब्दालीची चाकरी नाकारून मरण पत्करणारा ?
बर जाऊ द्या , हे सगळे मुसलमान होते , त्यामुळे हे नालायक असणार हेच गृहीत धरायला पाहिजे ना ?
फार जास्तीची उदाहरण देत नाही.
पुण्यावर गाढवांचा नांगर फिरवणारा मुरार जगदेव आठवतो का ?
शहाजी राजांना अटक करणारे मुधोळ चे बाजी घोरपडे आठवतात का ?
दिलेरखानाला सोबत घेऊन शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पराभव करणारे मिर्झा राजे जयसिंग ?
आता हे हिंदू होते म्हटल्यावर ते चांगलेच म्हणावे लागतील ना ?
मग पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवण ,तेही ते पुण भोसल्यांची जहागीर असताना हे चांगल कि वाईट ?
मग शहाजी राजांची अटक आणि शिवाजी महाराजांचा पराभव ह्या चांगल्या गोष्टी म्हणाव्यात का ?
काहीतरी समर्थन शोधलं पाहिजे ना ?
राजा, जहागीरदार , वतनदार ,सुभेदार म्हणून राज्यकारभार करताना जे निकष लावायचे ते एकसारखे लावले तर चांगला राजा म्हणून जी पाच पन्नास पानाची यादी होईल त्यात हिंदू आणि मुसलमान असे दोन्ही असतील आणि नालायकांच्या यादीतही दोन्ही सापडतील.
आपला प्रॉब्लेम असा आहे कि आपल्याला आधी यादी करायची आहे आणि मग जे चांगले त्यात सगळे हिंदू टाकायचे आणि जे नालायक होते त्यात मुसलमान टाकायचे.
इतिहास असा सिलेक्टिव्ह नसतो हि अक्कल लवकरात लवकर येवो आणि झालेली सगळी युद्ध लढाया ह्या सत्ता आणि संपत्ती साठी झालेल्या होत्या ,त्याला त्याही वेळेस हुशार असलेल्या राज्यकर्त्यांनी धर्माचा ,अस्मितेचा मुलामा दिलेला होता एवढच.
#आनंद _शितोळे
#भारताचा_इतिहास
#धर्माची_दुकानदारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!