सांगलीत फुटांनं पण राजापूरला इंचा- इंचानं का उतरतय पाणी?
सांगलीत फुटांनं पण राजापूरला इंचा- इंचानं का उतरतय पाणी?
सन 2005, 2006, 2019 या महापूराचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना वरील बाब चांगली लक्षात आली असेल.
सगळीकडचे रस्ते खुले होतात पण राजापूर (ता. शिरोळ) ला जाणारे रस्ते लवकर खुले होत नाहीत. या मागचं कारण काय असावं?
सांगलीत रोज फुटांनं पाणी उतरतय पण राजापूरला मात्र इंचा- इंचानं व सावकाश का पाणी उतरतं?
याची कारणे काय असावीत याविषयी मी वारंवार लिहिलं आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी लिहीत आहे.
🔹 राजापूरचे भौगोलिक स्थान
राजापूरला कृष्णा नदीवरील महाराष्ट्राचा शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्याची दारे उघडून उन्हाळ्यात (एप्रिल-मे मध्ये) पाणी कर्नाटकला सोडलं जातं.
राजापूर पासून कोयना सुमारे 125 किमी आणि आलमट्टी सुद्धा सुमारे 125 किमी अंतरावर आहे. म्हणजे राजापूर हे कोयना व आलमट्टीच्या मध्यावर आहे.
आलमट्टी धरणाची पाणीसाठवण क्षमता समुद्रसपाटी पासून 519 मीटर इतक्या उंचीपर्यंत आहे. राजापूरच्या धरणाची उंची समुद्र सपाटी पासून 519 मीटर आहे. म्हैसाळ धरणाचा पायथा 519 मीटर इतक्या उंचीवर आहे. याचा अर्थ एरवी आलमट्टी धरणात साठवलेले पाणी म्हैसाळ धरणाच्या पायथ्याला लागतात. आणि राजापूरचे धरण दोन्ही बाजूनी फेब्रुवारी अखेरपर्यंत काटोकाट भरलेले असते.
राजापूर-खिद्रापूर, राजापूरवाडी हा त्रिभुज प्रदेश आहे. कृष्णेला महाराष्ट्रात जेवढ्या म्हणून उपनद्या मिळतात त्या सर्वांचे पाणी या त्रिभुज प्रदेशात जमा होते. नरसोबावाडीला पंचगंगा भेटते आणि पुढे दानवाडला दूधगंगा भेटते. या सर्व उपनद्यांचे फ्रंट वॉटर आणि आलमट्टीचे बॅक वॉटर याची टक्कर या त्रिभुज प्रदेशात होते. म्हणून इथे महापुराची तीव्रता सर्वाधिक आढळते.
टीप: दानवाड नंतर घटप्रभा नदी थेट आलमट्टीच्या जलशयातच भेटते. पुढे कुडल संगमला मलप्रभा नदी भेटते.
राजापूर नंतर पुढे अंकली (कर्नाटक) इथे कृष्णा नदीवर प्रचंड भराव टाकून पूल बांधला आहे. पुढे हिप्परगीला मोठे धरण आहे. या दोन्हीचा परिणाम पाण्याच्या वेगावर होऊन साहजिक मागे पाण्याची फुग वाढते.
🔹 येडूर-खिद्रापूर सरोवर
अंकली- शिरगुप्पी दरम्यान भराव टाकून केलेल्या हायवेमुळे राजापूरच्या त्रिभुज प्रदेशात सरोवरसारखे पाणी साठते. याला मी येडूर - खिद्रापूर सरोवर असे नाव दिले आहे. या सरोवराच्या आऊटलेट फक्त अंकली पुलाची कमान आहे. आणि ती पाण्याच्या विस्ताराच्या मनाने खूप अरुंद आहे.
🔹 प्रवाहाची दिशा बदलते.
खिद्रापूर पर्यंत कृष्णा पाश्चिमाभिमुख वाहते. तिथे ती हेअर पिन टर्न घेऊन पूर्वाभिमुख वाहते. त्याचाही पाण्याच्या वेगावर परिणाम होतो.
शिवाय पूर उतरताना शेवटी- शेवटी आलमट्टीचा विसर्ग सुद्धा कमी होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पाण्याच्या गतीवर होतो.
राजापूरच्या समतल त्रिभुज प्रदेशात कृष्णेच्या फ्रंट आणि बॅक वॉटरची टक्कर होत असल्यामुळे इथे महापुराची तीव्रता वाढते आणि पूर हळूहळू ओसरतो हे सिद्ध होते.
🔹 2021 च्या महापुराची कारणे
यंदा कोल्हापूर आणि पश्चिमेकडील (हायवे पलीकडे) डोंगराळ भागात पुराची पाणी पातळी 2019 पेक्षा जास्त होती. राजापूरला पाणी पातळी 2005 पेक्षाही फुटभर जास्त होती. मात्र अंकली पूलापलीकडील अथणी तालुक्यातील गावात 2005 पेक्षा पाणी पातळी कमी आहे.
याचा अर्थ कोल्हापूरच्या महापुराला अतिवृष्टी हे मुख्य कारण आहे. शिवाय जागोजागी नदीच्या दुतर्फा भर टाकून केलेली विकास कामे सुद्धा पाण्याची फुग निर्माण करण्यास कारणीभूत आहेत हे स्पष्ट होते. अंकलीप्रमाणेच पुणे बंगळूर हायवेचा फटका कोल्हापूरला बसतो.
मात्र राजापूरला पाऊस नसतानाही पूर येणे आणि तो दीर्घ काळ राहणे यासाठी फ्रंट वॉटर इतकेच बॅक वॉटर सुद्धा कारणीभूत आहे. हे बॅक वॉटर आलमट्टीचेच असेल असे नाही. अंकली आणि हिप्परगीचा सुद्धा परिणाम असू शकतो. हे आजवरच्या अनेक अनुभवा वरून स्पष्ट झाले आहे.
आजसुद्धा अंकली आणि हिप्परगी पुलाच्या भरावाच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण केल्यास पूर्व आणि पश्चिमेकडील पाणी पातळीत 5 फुटाचे अंतर स्पष्ट दिसते. हे कशाचे द्योतक आहे?
🔹 महापुरावर उपाय
वरील सर्व विवेचनाचा विचार करता, महापूर कोकणात मुसळधार, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने येतो हे स्पष्ट होते.
महापूर नको असेल तर सध्या एकच उपाय सुचतो तो म्हणजे, "पावसाने भरपूर पण सावकाश व दीर्घकाळ पडत रहावे. टेस्ट मॅच खेळावी. वन डे किंवा ट्वेन्टी-ट्वेन्टी नको".
...✍️ साभार : श्री श्रीशैल मठपती सर
राजापूर ता. शिरोळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!