" मी सर्वोत्तम आहे का ? "
( Am I the best ? )
आम्ही महाविद्यालयात शिकताना आमचे बहुतेक प्राध्यापक (काही सन्माननीय अपवाद सोडता) त्याच त्या 'नोट्स' वापरत आम्हाला शिकवायचे. परिणाम असा व्हायचा की परीक्षेतील आमची उत्तरे एकसारखी असायची. मी मग विचार केला की आपली उत्तरे वेगळी आणि अधिक चांगली कशी होतील ? मार्ग सापडला. वाचनालयात जाऊन देशी - परदेशी लेखकांची पुस्तके मी वाचायला सुरुवात केली. माझा दृष्टीकोन सुधारला, उत्तरे अधिक चांगली येऊ लागली नि स्पर्धकांपेक्षा गुणही अधिक मिळू लागले. काही दिवसांनी काही चाणाक्ष स्पर्धकांना माझी ही युक्ती कळली. आता मला 'वेगळेपणा'साठी आणखी वेगळा विचार करणे आवश्यक होते. माझी चित्रकला उत्तम होती. प्रत्येक उत्तराला साजेशा माझ्या आकृत्या, आलेख, तक्ते इत्यादी गोष्टी मी आता उत्तराचा भाग म्हणून दाखवू लागलो. यात कल्पकतेचा मी पुरेपूर वापर करायचो. स्पर्धकांना या गोष्टींचा स्रोत मिळणे अशक्यच होते ! माझी उत्तरे आता 'सर्वोत्तम' ठरू लागली. नंतरच्या व्यावसायिक आयुष्यातही मला ही चित्रकला खूप उपयोगी ठरली. पदव्युत्तर व वित्त विशेषज्ञाच्या परीक्षांमध्ये मी आता माझे स्वतःचे विचार व कल्पनाही लिहू लागलो. या "कल्पक विचारसरणी" (Innovative Thinking)चा मला प्रचंड उपयोग होऊ लागला. व्यवस्थापकीय व उद्योजकीय सल्लागार म्हणून अशिलाच्या (Client) समस्यांना कल्पक व उपयोगी उत्तरे शोधण्याच्या माझ्या कौशल्याचा प्रारंभ हा महाविद्यालयीन काळातच झाला होता. अर्थात ऊर्मी होती - "मी सर्वोत्तम असलो पाहिजे !"
आपण सर्वोत्तम असण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी या सातत्याने कराव्या लागतात. जर्मनीच्या म्युनिक शहराला आम्ही भेट दिली तेव्हा तिथे कळलं की वीस किलोमीटर अंतरावर एका छोट्या गावात उत्तम पेन मिळतात. मी आहे 'पेन चाहता'. तात्काळ त्या गावी जाऊन एक वेगळं पण उत्तम पेन मी खरीदलं. विक्रेत्याने ते स्वतः बनवलेलं होतं. त्याला मी त्याच्या या 'उत्तमपणा' बद्दल विचारलं तेव्हा त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम राहण्यासाठी तो सतत "बेंचमार्किंग" म्हणजे अन्य उत्तम पेनांसोबत तुलना करायचा. विविध कल्पनांवर जीव तोडून काम करायचा. त्याचा हा उत्तम असण्याचा नाद त्याने आपल्या मुलांमध्येही रूजवलाय. सर्वोत्तम म्हणजे उत्तमात उत्तम. यासाठी असिमीत ध्यास असावा लागतो. व्यावसायिक अंगाने ती एक जीवनशैलीच असावी लागते.
सर्वोत्तम होण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या उत्तम गोष्टींच्या मर्यादा वा दोषही शोधले पाहिजेत. उदाहरणार्थ, 'गरीबी'च्या सर्व व्याख्या, 'राष्ट्रा'च्या सर्व व्याख्या किंवा 'देशाच्या सर्वांगीण विकासाचा निर्देशांक' याची व्याख्या, इत्यादी संकल्पना मला दोषयुक्त अथवा तोकड्या वाटल्या. या व्याख्या परीपूर्ण करण्याचे आव्हान मी मनोमनी स्विकारले. म्हणजे "सर्वोत्तमा"कडे जाण्याचा मार्ग हा आव्हानांमधून जातो नि म्हणून तो खडतर असतो. ही मार्गक्रमणा करताना स्वतःच्या गुणवत्तेवर संपूर्ण विश्वास ठेवायला हवा. गुणवत्तेतच कमतरता असेल तर ती भरून काढायला हवी. बरेच वरीष्ठ कार्पोरेट अधिकारी वयाच्या पन्नाशीतही नवी गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी विनासंकोच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थांमध्ये हजेरी लावतात. त्यांना अर्थात पुढील कारकिर्दीतही सर्वोत्तम रहाण्याचा ध्यास असतो. हे झालं व्यक्तीगत पातळीवर. संस्थात्मक पातळीवर "सर्वोत्तम" असण्यासाठी 'नेटवर्किंग' करावं लागतं. टाटांचा ट्रक हा सर्वोत्तम असतो कारण त्यांचे पुरवठादारही सर्वोत्तम असतात. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की संपूर्ण ट्रक काही टाटा बनवत नाहीत. ते त्यातील इंजिन व चेसिस असे सर्वाधिक महत्त्वाचे भाग बनवतात. म्हणजे साधारणपणे ८०% भाग ते सर्वोत्तम पुरवठादारांकडून घेतात. या पुरवठादारांचं मुल्यांकन सदोदितपणे सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय बेंचमार्किंगनुसार केलं जातं.
सर्वोत्तम होण्याची व असण्याची एक महत्वाची आवश्यकता असते ती स्वतःच्या कौशल्यांना, धारणांना, तत्वांना व ज्ञानाला काळानुसार वृद्धिंगत करीत रहाणे. या प्रक्रियेत टाकाऊ भागांना भावनांमध्ये न अडकता विवेकाने काढून टाकावे लागते. कोणतेही शास्र, तत्वज्ञान व कौशल्य अंतहीनपणे सर्वोत्तम राहू शकत नाही. जपानी व्यवस्थापन - कौशल्य काळाच्या ओघात मागे पडलं. बऱ्याच मापदंडांवर अमेरिका आज सर्वोत्तम नाही.चीनचा आर्थिक ढाचा सर्वोत्तम नाही. इस्राएलचा 'सामाजिक राजकारणा'चा ढाचा तर दुषित झालाय. आमच्या येथील बऱ्याच सार्वजनिक पद्धती, संस्था व प्रणाली या सर्वोत्तम नाहीत. अशी उदाहरणे बरीच देता येतील. काही वर्षांपूर्वीच जागतिक परिमाणांवर सर्वोत्तम असणारी 'जनरल इलेक्ट्रिक' ही कंपनी आज उत्तमसुद्धा नाहीय. तात्पर्य असा की सर्वोत्तम रहाण्यासाठी अव्याहत तपश्चर्या करावी लागते. "आमचे बापजादे सर्वोत्तम होते म्हणून आम्ही सर्वोत्तम आहोत" हा दंभ जगाच्या पाठीवर हास्यास्पद ठरतो. 'आम्ही सर्वोत्तम आहोत' आणि 'आम्ही सर्वोत्तम होऊ शकतो' या दोन विधानांमधील मोठा फरक आम्हास कळायला हवा. काही महाभाग नेहमी एक मजेशीर विधान करीत असतात - " आम्ही शर्यतीत भाग घेतला असता तर नक्कीच पहिले आलो असतो !". या विधानाने फक्त मनोरंजन होते.
सर्वोत्तम लेखक होण्यासाठी सर्व परिमाणांवर सारख्याच गुणांनी सर्वोत्तम असण्याची गरज नसते. भाषिक बिनचूकपणापेक्षा वैचारिक सामर्थ्य महत्वाचे. उत्तम ज्वारीची भाकरी आणि चविष्ट पिठलं बनवणाऱ्या सुगरणीने हे पदार्थ चांदीच्या ताटात वाढण्याची गरज नसते. बहुतेक फाईव स्टार हॉटेल्समध्ये काही अपवाद सोडता सर्वोत्तम अशी चव मला गेल्या सदोतीस वर्षांत कधीच अनुभवास आली नाही. नाक्यावरच्या चहाची चव कोणत्याही भारदस्त हॉटेलात मिळणार नाही. निष्कर्ष असा की तुमच्या विशिष्ट अशा कौशल्यातील (Core Competence) सर्वोत्तमता तुम्ही वाढवत रहायला हवी आणि काळासोबत काही नव्या प्रक्रियाही जोडायला हव्यात. उदाहरणार्थ, उत्तम भाकरी व पिठल्याची नीट जाहिरात केल्याशिवाय तुमच्या खाणावळीत गिर्हाईक येणार कसा ? तुम्ही सर्वोत्तम आहात हे जगाला कळायला हवे ना !
'जगन्मान्यता' मिळण्यासाठी जगाने ठरविलेल्या कसोट्यांना सामोरं जावंच लागतं. "मी सर्वोत्तमच आहे. तुम्ही माना अगर मानू नका. तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही." अशी आत्मप्रौढीची भाषा ही शेवटी बालिशच ठरते. प्रत्येक देशामधील असे काही समाज, पंथ, उद्योगसमूह, नेते व विचारवंत अशी अहंकारी भाषा करीत काळाच्या ओघात निष्प्रभ ठरत गेलेत. यास्तव कोणताही न्यूनगंड न बाळगता आम्ही परिमाणांनाही नियमितपणे तपासून गरज असल्यास त्यांना आव्हान दिले पाहिजे. म्हणूनच अभिजनांनी अधोरेखित केलेली परिमाणे न घाबरता बहुजनांनी तपासली पाहिजेत. याच धारणेनुसार आम्ही आमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे ग्रंथ, परंपरा, व्यक्तीमत्वे व त्यांचे उत्तमतेचे निकष हे अहंकार वा संकोच न बाळगता तपासले पाहिजेत. "सर्वोत्तम" होण्याची व रहाण्याची अवघड पण उदात्त प्रक्रियासुद्धा सर्वोत्तमच असली पाहिजे. आणि या प्रक्रियेचा पहिला टप्पा हा स्वतःला प्रामाणिकपणे तपासण्याचा असतो, हे आम्ही विसरता कामा नये !
------- डॉ. गिरीश जाखोटिया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!