सरकारी बडव्याची पंढरपुरी आंघोळ -ज्ञानेश महाराव
(संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)
लग्नात मुंज उरकतात, तसे काहीजण आंघोळीत लघवी उरकतात.' याच सूत्रानुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडात मुतणारा गोपाळ बडवे हा मे २००५ मध्ये पकडला गेला. तसा आता 'विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान'च्या शासकीय व्यवस्थापन समितीचा कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी विठ्ठलाच्या विधिवत स्नानात स्वतःची आंघोळ उरकताना कॅमेरा-बंद झालाय. हा वारकऱ्यांत संताप निर्माण करणारा 'व्हिडिओ' सध्या 'सोशल मीडिया'तून 'व्हायरल' झालाय. त्याचं असं झालं, भट- ब्राह्मणांनी आपली पोटं भरण्यासाठी जी खुळं निर्माण केली, त्यात 'प्रक्षाळ पूजा' हा एक विधी आहे.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांना हिंदू धर्मशास्त्रानुसार 'चातुर्मास' म्हणतात. 'आषाढी एकादशी'ला 'देवशयनी एकादशी' म्हणतात. कारण या दिवशी देव झोपतात; ते 'कार्तिकी एकादशी'ला उठतात. या खुळचटपणाबद्दल 'हिंदुहृदयसम्राट नंबर-१' वि. दा. सावरकर म्हणतात, 'ज्यांचे देव झोपतात, त्यांचा धर्मही झोपतो!' तो शास्त्रशुद्धरीत्या झोपवल्यामुळे भूदेवांचे म्हणजे भट-भिक्षुकांचे फावले आहे. असो. ब्राह्मणी खुळचटानुसार, विठ्ठल हा विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले जाते. पण "विठोबा बहुजनांचा देव आहे," हा दावा सिद्ध करण्यासाठी आणि 'विष्णू म्हणत विठ्ठलाला कुणी झोपवू नये', यासाठी पंढरीची आषाढी-कार्तिकीची वारी सुरू झाली का ? हा तपासून बघण्याचा विषय आहे.
आषाढी- कार्तिकी वारीत पंढरपुरात भाविक-वारकऱ्यांची अलोट गर्दी जमते. त्यांना विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घडावे, यासाठी मंदिर २२-२४ तास खुले असते. या काळात देवाला उठवणारी 'काकड आरती', झोपवणारी 'शेजारती' याचप्रमाणे संध्याकाळची 'धुपारती' व 'नित्यपूजा' होत नाहीत. वारी संपली की, मंदिराची स्वच्छता आणि देवाचा शिणवटा दूर करण्यासाठी जो 'जलाभिषेक' होतो, त्याला 'प्रक्षाळ पूजा' म्हणतात. ती आषाढी-कार्तिकी एकादशीनंतर दहा दिवसांनी म्हणजे पंचमीला केली जाते. यासाठी 'प्रक्षाळ पूजे'च्या आदल्या रात्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या मागे लावलेले लोड काढून मूर्तींना तेल लावलं जातं. 'प्रक्षाळ पूजे'च्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणी यांच्यासह मंदिरातील सर्व देव-देवतांच्या मूर्तींना लिंबू-साखर लावली जाते. याला 'वैदिक साबण' म्हणावे. त्यानंतर पहिले पाणी, दुसरे पाणी, पोशाख-अलंकार, औषधी काढ्याचा नैवेद्य असे विधी होत, 'प्रक्षाळ पूजा' पार पाडली जाते. या लुटुपुटुच्या खेळातून देवाचा शिणवटा नक्कीच दूर होत नाही. पण तुळस, ओवा, गवती चहा, बडीशेप, जायफळ, काळी मिरी, गूळ वगैरेंच्या 'औषधी' काढ्याने बडवे-उत्पात मंडळींच्या कित्येक पिढ्यांचे 'कोठे' फुकटात साफ झाले आहेत.
आता 'विठ्ठल- रुक्मिणी' भोवतीच्या सेवेकऱ्यांत सर्व जातीचे लोक आहेत. त्यांनी पूजा-विधीची थोतांड माजविण्याऐवजी, त्यातला फोलपणा दाखवत त्याचे उच्चाटन केले पाहिजे. पण तेही आता सरकारी नोकर असल्याने त्यांनी साहेबाला खूश करण्यासाठी विठ्ठलाच्या यंदाच्या 'प्रक्षाळ पूजे'त (१० जुलै) विठ्ठल जोशी यांनाही आंघोळ घातली. विठ्ठल जोशी यांचं मूळ नाव सुनील जोशी आहे. ते पंढरपूरचे 'प्रांत' आहेत. तालुका पातळीवरच्या महसूल खात्याच्या दंडाधिकार्यांना 'प्रांत' म्हणतात. पंढरपूरचे 'प्रांत' हे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या सदस्य समितीचे 'कार्यकारी अधिकारी' असतात. मंदिराचे व्यवस्थापन हे नियमानुसार व्हावे आणि भाविकांच्या तक्रारींचे निवारण व्हावे एवढीच त्यांची जबाबदारी असते. ही जबाबदारी भाविक बनवून पार पाडणे अपेक्षित नसते. 'प्रक्षाळ पूजे'त चांदीच्या कलशातून विठ्ठल मूर्तीवर जलाभिषेक होतो. मूर्तीवरून खाली पडणारं पाणी पुजारी-बडवे मंडळी गोळा करतात आणि बाहेर जाऊन त्या पाण्याने स्नान करून 'पवित्र' होतात.
तथापि, यंदाच्या 'प्रक्षाळ पूजे'ला विठ्ठलाच्या पुजाऱ्यांनी पाण्याने भरलेला एक कलश विठ्ठलावर आणि एक कलश विठ्ठल जोशींवर ओतून प्रक्षाळ पूजा केली. विठ्ठल जोशीची पाठही रगडून स्वच्छ केली. यात नियोजन आहे. कारण विठ्ठल जोशी प्रक्षाळ पूजेसाठी सोवळ्यात-उघडे आलेले दिसतात. २५ वर्षांपूर्वी मी 'बडवेगिरी' वरचा रिपोर्ट 'चित्रलेखा'त लिहिला होता. त्यात 'भागवताचार्य' वा. ना. उत्पात म्हणाले होते, 'जातीचे बडवे हटवून काही होणार नाही. त्यांच्याऐवजी सरकारी बडवे येतील!' हे त्यांचे म्हणणे विठ्ठल जोशी यांनी जातीनिशी खरे करून दाखवलंय. तसेच, गर्दी करण्यास बंदी असतानाही, ती बंदी मोडणारा आषाढी एकादशी नंतरचा काल्याचा कार्यक्रम होऊ दिला; तसेच जोशीबुवा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या मदन महाराज हरिदास यांना खांद्यावर घेऊन नाचलेही! अशा सरकारी बडव्यांची हकालपट्टी केवळ मंदिर समितीच्या 'कार्यकारी अधिकारी' पदावरूनच नाही, तर सरकारी सेवेतून झाली पाहिजे.
हे चित्रलेखा च्या 27 जुलै 2020 च्या अंकातील संपादकीय आहे.
-ज्ञानेश महाराव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!