रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्सहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल्लाहु अलैहि व सल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणुन रमजान महिना ओळखला जातो.
इस्लामिक महीने चान्द्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत (स्वर्ग ) चे दार उघडले जातात व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सुचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे. त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत त्यांनी त्यापासुन लांब थांबावे.
या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
१. रोजा, २. नमाज, तराविहची विशेष नमाज, ३. शबे कद्रची रात्र ४. कुरआन ५. जकातुल फित्र
१. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज असते. असे पुर्ण महिनाभर ३० दिवस चालते.
रोजा या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्ष चाणाऱ्या मशीनला, गाडीला वर्षातुन एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणे करून गाडीचे, मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. यामुळे शरीराची अन्न प्रक्रिया आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची उर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिक रित्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जान करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवन न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जान श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूनाची भावना या रोजामुळे निर्माण होते याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पल्यात पडून बऱ्याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.
रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न उदभवु शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत कमी सात वर्ष, अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे
२. तराविह (रात्रीची विशेष नमाज) :मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजर ची नमाज, दुपारी जोहर ची नमाज, दुपारी असर ची नमाज (सुर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीब ची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज आहेत.
नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाज मध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहू अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातुन पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविह ची विशेष अशी नमाज पुर्ण महिनाभर होते. विविध मस्जिदीत या तराविहची विशेष नमाज मधे रोज कुरआणाचे पठण केले जाते.
३. शब-ऐ-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले.
"आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे."
(दिव्य कुरआन 97:1)
या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजीच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते किंबहुना इतर दिवसांच्या 1000 महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
"कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे."
(दिव्य कुरआन 97:3)
या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्व आहे जो कोणी खऱ्या भक्ति भावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुंह्यांची माफी मिळते परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.
४. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्व श्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या वर अल्लाहकडुन उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
"रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.
(दिव्य कुरआन 2:185)
जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्याय मध्ये करण्यात आली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
कुराण हा पवित्र ग्रंथ असुन ता कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाह ने स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे - साडे चौदाशे वर्ष लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही. आणि ईन्शाअल्लाह कयामत पर्यंत होणारही नाही.
"उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत."
(दिव्य कुरआन 15:9)
५.जकातुल फित्र (दानधर्म) - हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत, सघन आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे 2.5 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या त्योहारामध्ये सामील होता यावे.
थोडक्यात, जर एखाद्या व्यक्ती चे एकुण उत्पन्न ( Gold +Silver ornaments + Plots + bank money + Agricultural income) हे एकुन 20 लाख बनत असल्यास त्यास 2.5% प्रमाणे Rs.50,000 हे जकात देणे बंधनकारक आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटूंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकातुल फित्रचे महत्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकातुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाचे वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
वरील सर्वावरून आपल्या असे लक्षात येते की, रमजान आज रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविह ची विशेष नमाज, शब-ऐ-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआण, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे.
जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खऱ्या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, , जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांन सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
महिनाभराच्या उपवासानंतर चंद्र दर्शन होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिद मध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फितर ची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजीनंतर ऐकामेकांना अलिंगण (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.
विनंती :- मित्रहो आपला देश विविधतेने नटलेला आहे. आपली मिश्र संस्कृती जगभरातील लोकांच्या भारताविषयी कुतूहलाचा केंद्र आहे आणि ते जपणे आपले कर्तव्य आहे. ही माहिती आपणापर्यंत पोहचवण्याचा हाच मूळ उद्देश आहे जेणेकरून आपण सर्वांनी एकमेकांच्या आचार विचार आणि धार्मिक शिकवणी समजून घ्याव्यात ज्यामुळे आपापसात प्रेम, बंधुभाव निर्माण होऊन आपला देश असाच जागातील लोकांच्या कुतूहलाचे केंद्र बनून राहावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!