"कोल्हापुर लष्कर, रिसाला ते राजाराम रायफल्स"
लष्कर म्हणजे लाल डगला आणि करवीर पध्दतीची पगडी घालून किंवा पटका बांधून, लाल रंगाची खोळ घातलेली तलवार खांद्यावर टाकून छत्रपतींच्या पुढं पायी चालणाऱ्या असामी. लष्करात मुख्यत्वे वयानं वाढलेली आणि पेन्शनकडं झुकलेली मंडळी असत. त्यांना महिन्याला सहा रूपये पगार मिळे. छत्रपतींच्या रोजच्या लवाजम्यात त्यांचा समावेश नसायचा. त्यामुळं रोजची हजेरी झाली, की ही मंडळी भवानी मंडपात, नगारखान्यात दिवसभर बसून रहात. त्यामुळे यांना लष्करफड हे नाव पडलेलं होतं.
याउलट लाल डगला, गुडघ्यापर्यंत
येणारे बूट, डोक्यावर उंच पगडी वजा फेटा, कमरेला ब्रिटिश पध्दतीची तलवार आणि काही वेळा हातात पताका लावलेला भाला, असा पोषाख केलेले तगडे जवान रिसाल्यात असत. रिसाल्यातले घोडेही उत्तम असत.
हे घोडे सरकारातून दिले जात.
रिसाल्याचा पागा दोन-तीन ठिकाणी होत्या. शंभर ठाणा म्हणजे सध्याचे शाहू हायस्कूल असणारी इमारत, थोरल्या दवाखान्याच्या मागे आणि जुन्या राजवाड्यातल्या अंबाबाईच्या समोरची इमारत या ठिकाणी या पागा होत्या. त्यांना महिन्याला दहा रूपये पगार मिळे.
लवाजमा कोणत्याप्रकारचा आहे त्याप्रमाणे रिसाल्याचा गणवेश असे. पहिल्या दर्जाचा लवाजमा म्हणजे लाल डगला. दुसऱ्या दर्जासाठी पांढरा डगला आणि स्वार्या/ शिकारीच्या वेळी त्यांचा पोशाख खाकी असे. लाल डगल्यामुळे त्यांना लाल रिसाला म्हटलं जाई. जोधपूरच्या गंगा रिसाल्याला ज्याप्रमाणे लष्करात स्थान मिळाले त्याप्रमाणे कोल्हापूरच्या लाल रिसाल्यालाही स्थान मिळावे यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी फार प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नाही ; पण मुंबईच्या गव्हर्नरच्या अंगरक्षकांत मात्र त्यांचा समावेश झाला. 1845 मध्ये छत्रपती शिवाजी तिसरे उर्फ बाबासाहेब महाराज यांच्या कारकीर्दीत छत्रपती आणि राज्याच्या सुरक्षेसाठी ब्रिटिश नेतृत्वाखाली एका स्वतंत्र पलटणीची निर्मिती करण्यात आली. या पलटणीत 800 स्वार आणि 400 पायदळ होते. या पलटणीला 'Kolapore Local Infantry' असे नाव देण्यात आले. याचा गणवेश म्हणजे मेंदी रंगाचा डगला, ज्याला लाल रंगाची काॅलर असे.
यांच्या खांद्यावरच्या फितीवर, बेल्टवर आणि टोपीवर 'KLI' अशी अक्षरं असत.
अंतर्गत सुरक्षेसाठी हिची निर्मिती झाली असल्यानं हिचा समावेश पहिल्या महायुद्धात काळात लष्करात होऊ शकला नाही. 1939 मध्ये ही पलटण बरखास्त करून राजाराम रायफल्सची निर्मिती करण्याचे निश्चित झाले आणि 1941 मध्ये राजाराम रायफल्सची निर्मिती झाली. 1948 मध्ये राजाराम रायफल्सने
हैदराबादविरुध्दच्या लष्करी कारवाईत भाग घेतला होता. पुढच्या काळात राजाराम रायफल्सचेच रूपांतर 19 मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये होऊन ती आज भारतीय पायदळात उत्तम तुकड्यांपैकी एक आहे.
(दैनिक सकाळ मधील जुनं कोल्हापूरात आलेला यशोधन जोशी यांचा लेख)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!