#बिब्बा/बिबवा
पूर्वीच्या गावगाड्यातील प्रत्येक घरा-घरात आढळणारा हा औषधी गुणधर्म असलेला बिब्बा घरातील गाडग्या-मडक्यात हमखास पहायला मिळत असे. आज्जीबाईच्या बटव्यात तर याला मानाचे स्थान होते. असा हा बिब्बा अलीकडच्या काळात बऱ्याच जणांच्या खिजगणतीतही नसावा. याचे आश्चर्य वाटते.
कोकण पट्ट्यातील डोंगररांगा आणि मला माहित असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर तसेच कराड तालुक्यातील दक्षिण भागातील डोंगररांगा आणि इतर पडीक मोकळ्या रानात या बिब्ब्याची झाडे पहावयास मिळतात.
जंगल संपत्ती असल्याने आदिवासी किंवा स्थानिक लोकांना बिबव्याची फळे चार पैश्याचा आधार देऊन जातात. साधारण बिबव्याच्या झाडाची फळे ही दिवाळीच्या वेळेला पिकायला सुरुवात होते. काजूसारखी येणारी पिवळसर केशरी बोंडे असलेल्या फळाचे काळसर बिब्बे काढून त्या फळाच्या माळा तयार करून ते खुंटीला वाळवण्यासाठी अडकवून ठेवतात. मग अश्या वाळलेल्या फळांच्या माळा जवळपासच्या आठवडी बाजारात किंवा शहरात विकावयास येतात. चवीला तुरट आणि रुचकर असणारे हे फळ पिष्ठमय असते. कच्चे पिवळसर फळ खाल्ले तर घश्यात खवखव सुरू होते. त्यामुळे पिकल्यानंतरच खाणे योग्य होते.
माझा आणि या बिब्ब्याचा खूप जवळचा संबंध आहे. पूर्वी दिवस उगवायला डोक्यावर पाट्या घेऊन गळयात धोतर किंवा लुगड्याचा धडपा बांधून त्यात झोपलेल्या तान्हया बाळाला पाठीवर टाकून सुया-पोती विकणाऱ्या नऊवारी लुगड्याला 'दंड' घालून कासुटा घातलेल्या कोकणी बायका, " ये काकू ? ये मावश्ये ? " अश्या मोठमोठ्याने हळ्या मारत वेशीतून वाड्या-वस्त्यांवर प्रवेश करायच्या, तेव्हा प्रथम त्यांचे स्वागत हे पाळीव कुत्री करायची. मग त्या बायकांच्या हळ्या आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा कालवा ऐकून सगळ्या आळीची पोरं-पोरी जागी व्हायची, आणि डोळे चोळतच कालव्याच्या दिशेने पळत सुटायची. " ओ, आमच्या आयनं बोलावलंय? ओ आमच्या आळीला चला? ओ आमच्या अंगणात बसा? ओ आमच्या सोप्यात बसा? " म्हणून त्या बायकांच्या विनवण्या करत असायची. त्या बायकांच्या टोपलीत सुई, दाबन, तोडे, वाळे, मनगट्या, लबरी कडे, वगैरे वगैरे साहित्याबरोबरच या बिब्याचा ही मुख्यता समावेश असायचा.
तर अश्या या कोकणी बायकाकडून आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्याकी त्यात चार-पाच बिब्यांचा ही समावेश असायचा. मग त्या बायकांना कालवण असेल तर कालवण नसेल तर चटणी भाकरी देऊन पाठवले जाई. असे ही बिब्बे शेतकऱ्यांना कधी आणि केव्हा लागतील याचा नेम नसायचा. म्हणून ते बिब्बे करंड्यात, बारक्या गाडग्यात किंवा घराबाहेर असणारया भिंतीच्या देवळीत सुरक्षित ठेवले जात. याचे ही कारण असे की लहान मुलांच्या हाती हा बिब्बा चुकून लागू नये. कारण चुकून बिब्बा लहान मुलाने तोंडात घातला तर बिब्ब्याच्या तेलाने त्या मुलाचे तोंड उतू जाते. त्यालाच 'बिब्बा उतला' असे म्हटले जायचे.
असा हा बिब्बा पूर्वी खूप उपयोगी होता. जनावरांना एखाद्याची नजर लागू नये . तसेच जनावराला 'बाहेरवाश्याचे' होऊ नये म्हणून, बैलांच्या गळ्यातील कंडयात तसेच गाई, म्हैस, शेळी व्यायला झाली म्हणजे तिच्या गळ्यातील कंडयात हा बिब्बा मानाने विराजमान व्हायचा.
पूर्वी आजच्या सारख्या प्रत्येकाच्या पायात चपला नसायच्या. घरातील कर्ती माणसं सोडली तर बाकीच्या सदस्यांना चपला ह्या दुर्मिळच असायच्या. एकतर लोकांना रानामाळात, काट्याकुटयात अनवाणी पायाने भटकावे लागत. अशावेळी नजर चुकीने एखाद्याचा बाभळीच्या फांजरीवर पाय पडून पायात काटा मोडला तर ती वयक्ती दिडपायावर चालायची. जवळ कोणी बाई माणूस असेल तर तिच्या हातातील बांगड्यामध्ये असणारी पिन घेऊन किंवा बाभळी, बोरीच्या काट्यानेच काटा टोकरुन काढला जायचा. परंतु एखादा काटा खोलवर घुसून मोडला असेल तर तो या वरील उपचारांना दाद द्यायचा नाही. मग टोकरलेल्या जागेवर रुईचा चीक लावून संध्याकाळ व्हायची वाट पहावी लागे.
दिवस मावळताना घरी जाऊन हातातले काम बाजूला टाकून तो काटा सुईच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला जाई. किंवा एखाद्या जाणकार वयक्तीकडून तो काटा काढला जाई. मग काटा काढलेल्या जागी बिब्बा घेऊन त्याला वाकळेच्या सुईने किंवा दाबनाने टोकरून त्यात दाबन खुपसून ते पेटत्या दिव्यावर धरले जाई. जोपर्यंत बिब्ब्यातून चरचर असा आवाज घरत तेल गळत नाही, तोवर बिब्बा त्या दिव्याच्या ज्योतीवर धरला जाई. एकदा का बिब्ब्यातून गरम गरम तेल गळायला लागले की लगेच तो बिब्बा काटा काढलेल्या जागी पटकन दाबून धरला जाई. यालाच चरका किंवा चटका देने म्हणतात. चरका दिल्याबरोबर पायात काटा मोडलेली वयक्ती "आयो" म्हणून जी बॉंब ठोकायची, ती सगळ्या आळीला त्याचा पत्ता लागायचा. एवढी कळ बिब्ब्याचा चटका दिल्यावर त्या वयक्तीला सोसावी लागायची...! चटका दिल्यावर त्या ठिकाणी पाणी किंवा 'पु' होत नसे. पण एक व्हायचे एकदा का असा चरका दिला की दिड पायावर चालणारी वयक्ती सकाळी उठून दोन पायावर चालू लागे...! आणि आपले रोजचे काम त्याच जोमाने करे...!
पावसाळ्यात पायाला चिखल्या पडल्या, भेगा पडल्या, सांधे दुखणे, अर्ध शिशी यावर बिब्बा घालणे हा जालीम उपाय होता.
आनंदराव रामचंद्र पवार (औंध)
जैतापूर-सातारा
मो.नं.9881791877
फेसबुक सातारा वरून साभार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!