२३ ऑगस्ट २००७ साली जपान चे पंतप्रधान शिनझो ऍबे भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात येण्यापूर्वी एका भारतीय न्यायाधिशांच्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. भारतीयांविषयी ओळख नसणाऱ्या भारतीय लोकांना जपान चा पंतप्रधान वेळ काढून एका विस्मरणात गेलेल्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वेळ काढतो हे बुचकळ्यात टाकणारं होतं. जपान च्या पंतप्रधानांनी सरळ कोलकत्ता गाठताना त्या न्यायाधिशांच्या मुलाची म्हणजेच प्रसांता पाल ह्यांची भेट घेतली. ह्या भेटीत प्रसांता पाल ह्यांनी आपल्या वडीलांचे ४ जुने फोटो जपान चे पंतप्रधान शिनझो ऍबे ह्यांना दिले. ते बघून शिनझो ऍबे काहीकाळ स्तब्ध झाले कारण ह्यातील दोन फोटोत प्रसांता पाल ह्यांच्या वडिलांसोबत शिनझो ऍबे ह्यांचे आजोबा नोबुसुके किशी हे होते. गोष्ट इकडे संपत नाही तर सुरु होते. त्या फोटोत नोबुसुके किशी सोबत होते भारतीय वकील डॉक्टर राधाबिनोद पाल.
१२ नोव्हेंबर १९४८ चा तो दिवस होता. दुसरं महायुद्ध संपल्यावर जिंकलेल्या राष्ट्रांनी जपान सरकार आणि तिथल्या नेत्यांविरुद्ध दुसऱ्या महायुद्धासाठी विरुद्ध आंतराष्ट्रीय खटला सुरु होता. International Military Tribunal for the Far East (IMTFE) ह्या माफर्त मित्र राष्ट्रांनी ११ आंतरराष्ट्रीय न्यायाधिशांची नेमणूक केली होती. ह्यातील १० वकील जवळपास मित्र राष्ट्रातील होते. ज्यात अमेरीका, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझिलंड वगरे देशांचा समावेश होता. ह्यातील एक न्यायधीश तरी आशिया खंडातील अश्या राष्ट्राचा असावा ज्याचं ह्यात काही हित नसेल. कारण त्या शिवाय हा खटला निष्पक्ष पद्धतीने चालवला गेला हे जगासमोर मांडता आलं नसतं. त्यासाठी आशिया खंडातील एकमेव असं राष्ट्र म्हणजेच भारत. भारतातून डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना ह्या खटल्यासाठी न्यायाधीश म्हणून निवडण्यात आलं.
डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांचा जन्म खरे तर पूर्व पाकीस्तान म्हणजेच ईस्ट बंगाल मध्ये १८८६ साली झाला. अतिशय गरीब परीस्थितीत जन्माला आलेल्या डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना शिक्षणापासून ही वंचित रहावं लागलं होतं. पण आपल्या हुशारीने त्यांनी शाळेत तर प्रवेश मिळवला आणि वकिली क्षेत्रात डॉक्टरकी ची पदवी मिळवली. टोकियो मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेली. तो काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा होता. नुकताच कुठे भारत जगाच्या नकाशावर आपलं अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करत होता. अश्या गरीब, मागासलेल्या देशातून नावासाठी नेमलेल्या वकीलाला प्रगत राष्ट्रांनी वेगळ्या साध्या हॉटेल मध्ये जागा दिली. पण डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांनी नुसतं कागदी घोडं बनून राहणं नाकारलं. जेव्हा ११ पैकी १० न्यायाधिशांनी जपान च्या ५५ लोकांना ज्यात खुद्द तत्कालीन पंतप्रधान टोजो पण समाविष्ट होते त्यांना दोषी ठरवलं तेव्हा एकच आवाज त्या टोकियो च्या कोर्टात गरजला. तो आवाज म्हणजेच डॉक्टर राधाबिनोद पाल.
टोकियो खटल्या मध्ये जपान च्या नेत्यांवर तीन प्रकारच्या केसेस लावण्यात आल्या होत्या. केस ए मध्ये असणाऱ्या गुन्हेगारांना युद्धाला सुरवात करण्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं व ह्यात कमीत कमी शिक्षेची तरतूद ही देहदंडाची होती. केस बी आणि केस सी मधील गुन्हेगारांना युद्धातील गुन्हे आणि माणुसकीच्या विरुद्ध कार्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. ह्या खटल्याचा निकाल काय लागणार ते सर्वांनीच गृहीत धरलं होतं. पण त्यांच्या ह्या मानसिकतेला छेद दिला तो डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांनी. आपल्या १२३५ पानांच्या युक्तिवादात त्यांनी निक्षून सांगितलं की जर जपानी लोक गुन्हेगार असतील तर हे युद्ध जपानवर लादण्यासाठी अमेरीका सुद्धा तितकीच जबाबदार आहे. जर जपान च्या लोकांना निर्दोष व्यक्तींच्या खुनासाठी जबाबदार धरण्यात आलं असेल तर जपान युद्धबंदी करत असताना सुद्धा २ लाख लोकांचे प्राण घेणाऱ्या अणुबॉम्ब स्फोटासाठी अमेरीकन राज्यकर्त्यांना दोषी ठरवलं जायला हवं. त्यांच्या ह्या युक्तीवादाला इतर न्यायाधिशांना डावलता आलं नाही. त्यामुळे केस ए मधील अनेक जपानी लोकांना केस बी आणि केस सी मध्ये टाकण्यात आलं. आपल्या सखोल अभ्यासाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी जपान ची बाजू निरपेक्षपणे उचलून धरली.
जेव्हा पूर्ण जग जपान ला दोषी मानत होतं तेव्हा एका भारतीय वकीलाने पूर्ण जगापुढे जपान ची बाजू घेताना भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला. जपान चे पंतप्रधान शिनझो ऍबे ह्यांचे आजोबा नोबुसुके किशी हे ही ह्या खटल्यात गुन्हेगार ठरवले गेले होते. नेहमीप्रमाणे आपल्याच लोकांची कदर न करणारे भारतीय काळाच्या ओघात त्यांना विसरून गेले. पण जपान त्यांना विसरला नाही. १९६६ साली जपानचे राजे हिरोहितो ह्यांनी जपान च्या नागरी पुरस्कार ' Order of the Sacred Treasure' ने त्यांचा गौरव केला गेला. १९६७ ला त्यांच्या मृत्यूनंतर टोकियो मध्ये त्यांचं स्मारक उभारलं गेलं. जवळपास ६० वर्षानंतर ही जपानचे पंतप्रधान आठवण ठेवून आपल्या आजोबांना,जपानी लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचवणाऱ्या डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांना विसरले नाहीत. २००७ साली खास वेळ काढून त्यांनी त्यांचे पुत्र प्रसांता पाल ह्यांची भेट घेतली आणि जपानच्या जनतेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांचे पुन्हा एकदा आभार मानले.
एक भारतीय न्यायाधीश जगातील १० न्यायाधिशांच्या युक्तीवादाला पुरून उरतो. आपल्या युक्तीवादाने पूर्ण खटल्याचं चित्र पालटतो आणि एक देश त्यांच्या युक्तीवादाला जगापुढे आजही अभिमानाने मांडतो. त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. पण ज्या देशातून ते आले त्या देशातील लोकांनाच त्यांच्या कार्याची माहिती नसते. आमच्या देशात दुसऱ्या देशाने सांगितल्यावर आपल्याच माणसांची जाणीव होते. अश्या देशातील लोकांन कडून डॉक्टर राधाबिनोद पाल ह्यांच कर्तृत्व माहिती असण्याची शक्यता नाही. एका भारतीय न्यायधिशाने आपल्या अभ्यासातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जी कामगिरी केली आहे त्याला शब्दात मांडता येणं अशक्य आहे. अश्या महान न्यायधिशांच्या स्मृतीस त्रिवार वंदन आणि डॉक्टर राधाबिनोद पाल तुम्ही नेहमीच भारत आणि जपान ह्या दोन्ही देशातील संबंधान मधील एक दुवा रहाल. पुन्हा एकदा तुमच्या स्मृतीला माझं वंदन आणि साष्टांग नमस्कार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!