आप सब ने मिलकर बनाया है #घडी को!
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही तरूण कार्यकर्त्यांशी आज 'गुगल मीट'वर संवाद साधत होतो. तेव्हा, त्यांच्याशी जे बोलणं झालं तेः
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर, भाजपचा कट्टर समर्थक असलेल्या एका पत्रकार मित्रानं मला सांगितलं होतंः "बॉस, मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, पण हे राष्ट्रवादीवाले सरकार हायजॅक करणार आणि अंतर्गत यादवीनं हे अनैसर्गिक सरकार कोसळणार!"
त्याच मित्राचा आज मला फोन आला. तो सांगत होताः "माझा अंदाज चुकला यार. हे सगळे फारच शहाणपणाने सरकार चालवत आहेत." (त्या मित्राला समजलंय, ते अजून देवेंद्रांना आणि चंपांना समजले नाही, हा भाग वेगळा.)
कोरोनाविरुद्धची आपली लढाई आता आपण जिंकण्याच्या मार्गावर आहोत. गुणाकार करण्याचा स्वभाव आहे कोरोनाचा, पण आपण वजाबाकी करत आहोत. आकडेवारी तरी असं सांगतेय. आणखी बरीच वाट चालायची आहे.
पण, एक लक्षात घेतलं पाहिजे… या सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रोल हा अनपेक्षितरित्या अत्यंत जबाबदारीचा आहे. मुळात, हे सरकार आघाडीचे आहे, असे वाटूच नये, असे हे सरकार काम करत आहे. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि कॉंग्रेसचेही सरकार चालवताना कधी जमले नाही. सरकार कोसळण्याची वेळ आली… ते आज मात्र एकसंधपणे, एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम करताहेत.
खरे म्हणजे, आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे. राजेश एखाद्या व्रतस्थ कार्यकर्त्याप्रमाणे कोरोनाविरुद्ध झुंजताहेत. राजेश मुळात अभ्यासू, बुद्धिमान, पर्फेक्शनिस्ट आहेत. चमकोगिरी त्यांच्या स्वभावात नाही. अत्यंत सेन्सिबल पद्धतीने राजेश या आव्हानावर मात करत आहेत. आरोग्य यंत्रणेची प्रकृती फार बरी नाही. तरीही प्राणपणाने आरोग्यमंत्री झुंजताहेत. त्यांची आई रुग्णालयात आहे. पण, कौटुंबिक प्रश्न बाजूला ठेवून ते या लढाईत उतरले आहेत.
कोरोनाशी झुंजताना महत्त्वाचा लढा आहे तो गृह मंत्रालयाचा. अनिल देशमुख आपला सरंजामी बाज बाजूला ठेवून सेनापतीप्रमाणे खिंड लढवत आहेत.
अन्न आणि नागरी पुरवठा हा आणखी महत्त्वाचा विभाग. छगन भुजबळ धीरोदात्तपणे त्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. सामाजिक संघटनांशी बोलत आहेत. समजून घेत आहेत. असंघटित क्षेत्रासाठी आश्वासक निर्णय घेत आहेत.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. अजितदादांच्या वर्तनात त्यांच्या प्रसिद्ध दादागिरीचा अंशही नाही. केंद्राने राज्याची एवढी कोंडी केली आहे. राज्याला निधी मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे. तरीही अजित शांतपणे मार्ग काढत आहेत. थोरल्या भावाप्रमाणे इतर मंत्र्यांना आणि यंत्रणेला दिशा देत आहेत.
हे सारे मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत.
खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या घराला वॉर रुमचं रुप आलं आहे. तिकडे रोहित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत.
तेही अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत.
हे सारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत.
पण, या लढाईचा चेहरा आणि नेता उद्धव ठाकरे हा आहे.
आज अवघा महाराष्ट्र, अवघा देश उद्धव यांच्या कौतुकात आकंठ बुडालेला असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हे तडफेने आणि निष्ठेने काम करणारे, पडद्यामागचे कलावंत आहेत.
याच राज्याने असे मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी पाहिलेले आहेत, की जे स्वतःच्या प्रेमात होते. त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल, अशा नेत्यांना कसे संपवायचे याची 'मोडस ऑपरेंडी' त्यांनी विकसित केली होती. इथे मात्र कोणी कोणाला संपवत नाही. सगळे मिळून सरकार उभे करत आहेत. या संकटावर मात करत आहेत. सगळे मिळून मुख्यमंत्र्यांना बळ देत आहेत आणि मुख्यमंत्रीही संयतपणे, सर्वांना सोबत घेऊन हे युद्ध जिंकू पाहात आहेत.
या संकटाच्या वेळीही महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता, सरकारच्या विरोधात कारस्थाने कशी केली जात आहेत आणि ती कोण करत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मी कौतुक करण्याचा प्रसंग खूप दिवसांनी आला आहे. मला खात्री आहेः माझे हे निवेदन ऐकून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतीलः
"हम सब ने मिलकर बनाया है 'घडी' को!"
एनी वे, तुम्हा कार्यकर्त्यांचं खरंच अभिनंदन.
अरे, पैसे खाण्यात, गळ्यातली सोन्याची चेन मिरवण्यात, स्कॉर्पिओत बसून माज करण्यात कसला आनंद आहे, मित्रांनो? आनंद तर रडणा-याचे अश्रू पुसण्यात आहे. आनंद तुमच्या गाडीच्या लाल दिव्यात नाही. झोपडीत तेवणा-या दिव्यात आहे. कालचा माज आज कसा उतरतो, बघत आहात ना! कालचा दिवा कसा विझतो, पाहात आहात ना! काल जे सत्तेत बसून माज करत होते, आज गल्लीतली पोरंसोरंही त्यांची टवाळी करताहेत.
पण, यशवंतराव चव्हाणांना मात्र महाराष्ट्र आजही आठवतोय. भाई उद्धवराव पाटील, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, मृणाल गोरे, मधू दंडवते, शरद जोशी यांचा वारसा महाराष्ट्र आजही सांगतोय.
दूर कशाला, तुमच्या नेत्याकडं पाहिलं तरी तुम्हाला कळेल, शून्यातून त्यानं विश्व निर्माण केलं, ते कशाच्या बळावर!
आज तुमचा पक्ष योग्य रस्त्यावर आहे आणि महाराष्ट्र या संकटावर मात करतो आहे! संकट आज ना उद्या संपेल, पण हा रस्ता कधीच विसरू नका.
- संजय आवटे
Sunjay aawate
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!