सलाम जहॉंगीर.....
छत्रपतींचा भगवा धारण करणारा आणि राजर्षिंचा सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचा विचार घेऊन गेली ७-८ वर्षे गणेश चतुर्थी दिवशी गणेशमूर्तीसह भक्तांना त्यांच्या घरी आपल्या रिक्षाने स्वखर्चाने विनामोबदला मोफत पोहोच करण्याची सेवा देणारे कोल्हापूर मधील धर्माने मुस्लीम असणारे रिक्षाचालक श्री. जहाँगीर उस्मान नाकाडे हे कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांचे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे असे वाटते. हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.
कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा आपण पाहिली तर इथे हिंदूधर्मीय अत्यंत उत्साहाने मुस्लीमांचा मोहरम सण साजरा करतात तर कोरोनाच्या आपत्तीत मुस्लीम शिवाजी बिग्रेड आणि बैतुलमाल कमिटी इत्यादी सारख्या संघटनांच्या माध्यमातून सर्व धर्मियांना सामाजिक सेवा देतात आणि जात,धर्म व पंथ न पाहता मणेर मसजिद येथील मुस्लीम कार्यकर्ते गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलींडर पुरवतात.
हे केवळ कोल्हापुरातच घडते. याला कारण एकमेव म्हणजे राजर्षि शाहूं महाराजांनी इथे रुजवलेला जातीय व धार्मिक सलोख्याचा पुरोगामी विचार.
या भारलेल्या विचारानेच सामाजिक कार्यास जहाँगीर सारखे रिक्षाचालक तयार होतात की, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे पण ते मनाने खूप श्रीमंत आहेत, म्हणूनच त्यांचे उदाहरण आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
कोरोनाच्या काळात रिक्षा व्यवसाय बंद झाल्यावर जहांगीरने कोणाकडेही हात न पसरता खोलखंडोबा परिसरात आपल्या घरीच चिकन विक्रीचा व्यवसाय सुरु केला व ऑर्डर प्रमाणे घरपोच चिकन देण्याची सेवा त्याने सुरु केली.
अशा या खुदाच्या अवलिया बंदयाचे अभिनंदन व त्रिवार सलाम !
श्री. उदय शिंदे, रंकाळा स्टँड.
श्री. जितेंद्रजीत हराळे-भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!