ऑनलाइन अभ्यासासाठी त्यांनी डोंगरावर बांधली झोपडी...! उद्धवा अजब तुझे सरकार...
आॅनलाईन अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी व तरुणांची धडपड... अखेर डोंगरावर बांधली झोपडी
राधानगरी: तालुक्यातील हेळेवाडी-वाकीघोल या गावातील विद्यार्थी व तरुणांना आॅनलाईन अभ्यास करण्यासाठी इंटरनेट सेवा मिळत नसल्याने इंटरनेटच्या शोधासाठी येथील तरुणांनी गेल्या वर्षीपासून धडपड सुरू केली.
हेळेवाडी गावापासून १०-१२ किमीवर गावठाणवाडी येथे बीएसएनएलचा टॉवर आहे पण याचा या गावातील नागरिकांना उपयोग होत नाही. साधे 2g इंटरनेटसाठी गावातून बाहेर यावे लागते. तेथे 3g, 4g वरुन आॅनलाईन अभ्यास तर दुरची गोष्ट.
लाॅकडाऊनमुळे गेल्या वर्षीपासून शाळा, कॉलेज, आॅफिस बंद आहेत पण आॅनलाईन क्लासेस आणि Work from Home सुरु आहे अशा वेळी येथील तरुणांच्या समोर अडचण होती ती इंटरनेटची? पण करायचे तरी काय असा प्रश्न गावातील विद्यार्थी व तरुणांच्या मनात घर करून होता.
गावातील काही मुले जनावरे चारण्यासाठी गावापासून १-२ किमी अंतरावर डोंगराजवळील गायरान जमीनीवर आले असता त्यांच्या लक्षात आले की त्या ठिकाणी जीवो आणि एअरटेलचे नेटवर्क चांगल्या प्रमाणात येत आहे, मग येथील विद्यार्थ्यी व तरुणांनी गावातील नागरिकांची मदत घेऊन त्या ठिकाणी एक झोपडी बांधली. आता या झोपडीत बसुन विद्यार्थी आॅनलाईन अभ्यास करतात तर नोकरदार आपल्या आॅफिसची कामे करतात. फक्त नेटवर्क नसल्याने या तरुणांना गावापासून १-२ किमी लांब येऊन झोपडीत बसावे लागत आहे.
डिजिटल इंडियाच्या जमान्यात गावात साधी 2g इंटरनेट सेवा मिळत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नोकरदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेली कित्येक वर्षे वाकीघोल मधील अनेक वाड्यावस्त्यांतील हा इंटरनेटचा प्रश्न प्रलंबित आहे, अनेक वेळा निवेदनही दिलेत, आवाज उठवला तरी याची ठोस दखल कोणी घेत नसल्याने वाकीघोल मधील विध्यार्थी, तरुण, नोकरदार आणि येथील नागरिकांच्या मनात नाराजीचा सूर आहे.
गेल्या वर्षी केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्याने डोंगरावर जाऊन अभ्यास करावा लागत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नाली सुतारचा खडतर प्रवासाची कहाणी माध्यमांनी दाखवली, त्याची दखल घेत थेट प्रधानमंत्री कार्यालयाने भारतनेट योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील स्वप्नाली च्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात हायस्पीड फायबर इंटरनेट कनेक्शन जोडून देण्यात आले होते.... असेच काही वाकीघोलमध्ये घडावे अशी इच्छा येथील विद्यार्थ्यांसह तरुणांची व्यक्त केली आहे.
सर्व प्रसारमाध्यमांनी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि वाकिघोल मधील विद्यार्थ्यी, तरुण, नोकरदार आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वाकीघोल ग्रामीण विकास समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
- सुनिल कांबळे, आडोली (वाकीघोल)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!