पद्मश्री मिळवणारा अशिक्षित अष्टपैलू सागरी संशोधक... विनीत वर्तक ©
अवघे आठवी पर्यंतच तुटपुंज शिक्षण. नावाच्या मागे कोणतीही पदवी नसताना सागरी जीवशास्त्र, सागरी संशोधन, भूगोल, खगोलशास्त्र, सामाजिक विज्ञान, जहाज बांधणी, मासेमारी, फलोत्पादन सारख्या विषयातील तज्ञ म्हणून जगभर मान्यता मिळालेली आहे. ह्या शिवाय हिंदी, इंग्रजी, मल्याळम, अरेबिक, लॅटिन, फ्रेंच, रशियन, जर्मन, संस्कृत, तमिळ, पर्शियन, सिन्हालीसे आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व आणि हा प्रवास इकडेच थांबत नाही तर हिंद महासागरात आढळणाऱ्या एका दुर्मिळ माश्याच्या जातीचं चक्क नाव हे त्यांच्या कार्यांचा सन्मान म्हणून ठेवलं गेलं आहे. त्यांच कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांनी बांधलेली बोट आज चक्क ओमान च्या संग्रहालयात मोठ्या मान सन्मानाने जतन केली आहे. त्यांच्या ह्या उत्तुंग कार्याची दखल भारत सरकारने घेताना त्यांचा २०२१ सालच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. त्या संशोधकांच नाव आहे 'अली माणिकफ़न'. अर्थात हे नाव भारतीयांसाठी नवीन असेल कारण आपले हिरोच आणि ज्यांना आपण मोठी माणसं मानतो ते ठरवण्याचे आपले ठोकताळेच संपूर्ण चुकीचे आहेत. तर कोण आहेत हे अली माणिकफ़न? ज्यांच्यापुढे भलेभले लोकं नमस्कार करतात, ज्यांच्या कामाची आणि अभ्यासाची महती संपूर्ण जगात पोहचलेली आहे. ज्यांच्याकडे साधी मेट्रिक ची डिग्री नाही पण त्यांना कित्येक क्षेत्रातले मोठे लोक अली माणिकफ़न सर्वोच्च तज्ञ आहेत असं मानतात.
अली माणिकफ़न हे मूळचे मिनीकॉय ह्या लक्षद्वीप बेटावरचे. १६ मार्च १९३८ ला त्यांचा जन्म झाला त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी केरळ मध्ये पाठवलं. आठवी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांच मन शिक्षणात रमल नाही. ते शाळा सोडून पुन्हा लक्षद्वीप ला आले. तिकडे आल्यावर त्यांनी आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास सुरु केला आणि १९५६ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी क्लार्क म्हणून मिनीकॉय ह्या बेटावर नोकरी पत्कारली. त्यांचा सागरी संशोधन मधला अभ्यास त्यांना १९६० साली सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इकडे घेऊन आला. इकडे त्यांनी सागरी जिवशास्त्र संशोधक डॉक्टर सनाथपन जोन्स ह्यांच्यासोबत सागरी जिवांचं संशोधन करायला सुरवात केली. डॉक्टर जोन्स कोणतंही शिक्षण नसताना सागरी जीवांचा त्यांचा अभ्यास बघून अतिशय प्रभावित झाले. त्यांनी शोधलेल्या एका माशांच्या जातीला 'अबूडएफडूफ माणिकफ़न' असं नाव दिलं गेलं. डॉक्टर जोन्स ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधप्रबंधाचे अली माणिकफ़न हे सहाय्यक लेखक होते.
१९८१ साली आयरिश असणारा साहसी दर्यावदी टीम सेव्हरीन अली माणिकफ़न ह्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आला. त्याला १२०० वर्षापूर्वी ज्या पद्धतीने अरब लोक जहाजातून व्यापार करायचे तश्या पद्धतीचं जहाज पुन्हा बनवायचं होतं आणि त्यातून सागरी प्रवास करायचा होता. १२०० वर्षापूर्वीच जहाज त्याच पद्धतीने आज कोणी बांधून देऊ शकेल ह्याचा शोध घेतल्यावर सगळ्यात पुढे नाव आलं ते अली माणिकफ़न ह्यांच. अली माणिकफ़न ह्यांनी हे काम एक आव्हान म्हणून स्वीकारलं. ओमान इकडे जाऊन तब्बल एक वर्षभर लाकडाने आणि काथ्या ह्या दोराचा वापर करत २७ मीटर लांबीचे एक शिडाच जहाज उभं केलं. ज्यात एक खिळा सुद्धा वापरला गेला नव्हता त्याच नाव 'सोहर' असं ठेवण्यात आलं. साहसी दर्यावदी टीम सेव्हरीन ह्याने याच जहाजातून ओमान ते चीन असा ९६०० किलोमीटर चा प्रवास केला. आपल्या ह्या सफारीला त्याने 'सिंदबाद सफर' असं नाव दिलं. त्याच्या आणि अली माणिकफ़न ह्याच्या कार्याची ओमान सरकारने नोंद घेताना हे जहाज ओमान देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ओमान इकडे संग्रालयात आजही जपून ठेवलं आहे.
अली माणिकफ़न यांच कार्य इकडेच संपत नाही तर पाण्याच नियोजन, सागरी जीवशास्त्रात माणसाच्या हस्तक्षेपामुळे होणाऱ्या बदलांचा विपुल अभ्यास केलेला असून त्यांच ह्या विषयावरच ज्ञान हे जगात नावाजलेलं आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी एका नवीन चंद्राच्या प्रवासावर आधारित दिनदर्शिकेच निर्माण केलं. जगातील सगळ्या मुस्लिम धर्मातल्या लोकांनी एकच हिजरा दिनदर्शिका वापरावी ह्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अली माणिकफ़न सध्या वालूर, तिरुनेलीवेली, तामिळनाडू इकडे राहतात. तिकडे त्यांनी स्वतः १३ एकर जागा विकत घेऊन स्वतःची शेती फुलवली आहे. ते कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करत नाहीत न कोणत्या खतांचा. आपल्याला लागणारी संपूर्ण इलेक्ट्रिसिटी ते स्वतः पवनचक्यांद्वारे निर्माण करतात. ज्या पवनचक्यांची निर्मिती सुद्धा त्यांनी स्वतः केली आहे.
इतकं मोठं कार्य करूनसुद्धा ते एक साधं आयुष्य जगत आहेत. ना कुठला माज, ना कुठला गर्व पण वयाच्या ८२ वर्षी सुद्धा काहीतरी नवीन करण्याची धडपड त्यांची सुरु आहे. आज त्यांच्या तिन्ही मुली शिक्षिका आहेत तर मुलगा दर्यावर्दी आहे. कोणतही शिक्षण नसताना आपल्या अभ्यासाने, कर्तृत्वाने, जिद्दीने अष्टपैलू अशी कामगिर ी करून भारताचं नाव अटकेपार नेणाऱ्या अली माणिकफ़न यांचा गौरव भारत सरकारने २०२१ सालातला पद्मश्री सन्मानाने केला आहे. त्यांच्याबद्दल लिहायाला घेतलं तर पान कमी पडतील इतकं अष्टपैलू कर्तृत्व त्यांच आहे. अली माणिकफ़न यांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. त्याच बरोबर अतिशय योग्य कर्तृत्वान भारतीय हिरोंची निवड करण्यासाठी भारत सरकारचं अभिनंदन.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत अली माणिकफ़न आणि दुसऱ्या फोटोत त्यांनी शोधलेल्या माशाचा फोटो)
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://vartakvinit.blogspot.com/2021/01/blog-post_30.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!