गोवऱ्यांची फुले जेंव्हा बीजक होतात...
माजी विद्यार्थी संमेलनासाठी एकत्र जमलेलो असताना आपसूक माझ्या गुरूंनी मला त्यांचे स्व-लिखित लिहिलेलं "गोवऱ्या आणि फुले" हे आत्मचरित्र मला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भेट दिले. ज्यांनी मला पत्रकार होण्याची प्रेरणा दिली. त्यांनीच मला यासाठी समीक्षण लिहिण्याची सांगितले. जणू मच्छिंद्रनाथांनी गोरक्षास सोन्याच्या विटेवरून ताडले.
चंद्रकांत माळवदे सर मला हे इंग्रजी शिकवायला होते. त्यांना मी नेहमीच हसतमुख बघत आलेलो आहे. त्यात सकाळचे ते पत्रकार. त्यांचे लिखाण मी वाचत आलेलो आहे. त्यांचे लाघवी बोलणे, त्यांचा पेहराव, त्यांचे एकंदरीत चलन-वलन मला आर्थिक सुबत्ता असलेल्या चित्पावन ब्राम्हणासारखेच वाटायचे.
त्यांच्याकडे गेलेला कोणीही मोकळ्या हातांनी परत आलेला आहे, असे कधीच झाले नाही. हे मी जाणून होतो. माझ्या वडिलांचे निधन मी बारावीत असतानाच झाले आणि त्याही प्रसंगात मी बारावी पास झालो. मग पुढे काय हा प्रश्न माझ्याकडे आवसून उभा होता. पुढचे शिक्षण कसे घ्यायचे ? फी भरण्याची परिस्थिती नव्हती. अशावेळी माझ्यासमोर दत्त म्हणून फक्त माळवदे सरच आठवले. मी सरांना भेटलो. माझी परिस्थिती सांगितली. सरांनी लगेच मला घेऊन दुसऱ्या दिवशी कोल्हापूर गाठले. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचे सर्वे-सर्वा देसाई साहेबांना सांगून माझा BAला प्रवेश निश्चित केला. कोणताही एक रुपया न खर्च करता. मला विश्वासच बसत नव्हता. पण माळवदे सरांनी केले. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे.
अशा सरांना त्यांच्या आयुष्यात कित्येक संकटाना तोंड द्यावे लागले आहे. हे मला त्यांचे आत्मचरित्र वाचल्या नंतर समजून आले आहे. प्रचंड मन मारून आयुष्य जगणं हे खरचं जबरदस्त आहे.
चंद्रकांत म्हणजे चंद्र... ज्योतिष शास्त्रानुसार मनावर अधिराज्य गाजवणारा ग्रह. चंचल... कलेचा भोक्ता. शब्दांना प्रेरणा देणारा चंद्र... आयुष्याला मोटिव्हेट करणारा चंद्र... आणि आयुष्यात अनेकांना मोटिव्हेट करणारे चंद्रकांत माळवदे सर... दोन्ही एकाच राशीचे...!
सर आपले आत्मचरीत्र वाचले आणि मला साने गुरुजी आठवले. आयुष्यात घडलेल्या घटना आणि मनावर खोल जखमा करून गेलेले प्रसंग कधीच विसरले जाऊ शकत नाहीत. आपण त्या कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरीही त्या विसरता येऊ शकत नाही. परिस्थिती प्रतिकूल असताना जवळ-जवळचे आपण ज्यांना म्हणतो तीच मंडळी आपल्या सोबत कसे वागतात... हे सगळंच शब्दबद्ध करता येऊ शकत नाही. कारण प्रत्येक भावनेला शब्द आपलेसे करू शकत नाहीत. म्हणून भावना नेहमीच वरचढ ठरतात.
"सगळच सगळ सांगता आले असते जर पुस्तकातील शब्दांना...तर कामच काही उरले नसते नयनातील आसवांना....नाही सर...ती घटना आणि तो शब्द तुमचा जुळतच नाही...भावनांचा पाट तो तुम्हीं संपूर्ण मोकळा केलाच नाही..."
लेखक होता येतं...पण आपबिती लिहिताना मन-मेंदू-हात थरथरतात आणि जर तो जिवंतपणीचा मोक्ष असेल तर मग... विचारूच नका. निर्माल्य झालेल्या फुलांना समाधान एवढं तरी असते की ती देवाच्या चरणावर वाहिलेली असतात. पण प्रेतावरच्या फुलांना ह्याचे ही सोयर-सूतक नसते. ताजी असली तरीही ती निर्माल्यच असतात. तसेच काहीसे आहे.
सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान, नाती-गोती संभाळून भान ठेवून आत्मचरित्र लिहिली जातात. याला कोणीच अपवाद नाही. तुम्हीं ही त्याच वारीतील वारकरी. पण विशेष एकच वाटते... उदास मनातही दुर्दम्य आशावाद आपण जपलात आणि माळवदे कुटुंबाच्या नव्या पिढीला तुम्हीं त्याची झळ ही पोहचू दिली नाही. किंबहुना तुमचे आत्मचरित्र वाचण्यापूर्वी त्यांना तुमच्या पूर्व आयुष्यातील दाहक- उदासीनता त्यांना ज्ञात ही नसेल.
आपण आयुष्यात खूप सोसले आहे. भूक ही निसर्गातील अतीव आणि अंतिम शासक आहे. जी माणसांना कोणतेही काम करण्यासाठी विवश करू शकते. घडणे की बिघडणे हे याच शक्तीवर अवलंबून असते. मनाचा हिय्या करुन जगणे आणि त्याच्यात यशस्वी होणे. हे एक अग्निदिव्यच आहे. पण आयुष्याच्या घडण्या-बिघडण्याच्या वळणावर स्व:नियंत्रित होऊन, स्वत:च्या बेरंग आयुष्यात सप्तरंग भरण्याचे महत्तम कार्य हे फारच कमी लोकांना करता येते. जमते. ते तुम्हाला करता आल. इथवरच न थांबता आपण अनेकांच्या आयुष्यात आनंदही पेरला आहे. हे विशेष जाणवलं.
तुम्हीं स्वतःचा जीवनमळा तरी फुलवला आहेच पण इतरांचा ही जीवनमळा फुलविणारे सावता माळी आहात. गुरूपदाची जबाबदारी फार मोठी. ती तुम्हीं लिलया पेलली आहे. स्वतंत्र संग्रामात जशी साने गुरुजींनी पार पाडली होती तशीच. शिक्षकी पेशाला न्याय देण्याचं... पुण्याचं काम आपण केले आहे. मी याची देही - याची डोळा त्याचा साक्षीदार आहे. एक काळ होता ज्यावेळी साने गुरुजींच्या चित्रपटाने समाजात सकारात्मक विचार पेरला होता. तशाच पद्धतीने "गोवऱ्या आणि फुलं" दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित केला तर खऱ्या अर्थाने "गोवऱ्या आणि फुले" सार्थकी लागतील.
आपण याला खूप समर्पक असे नाव दिले आहे. "गोवऱ्या आणि फुले". विज्ञान आपल्याला शिकविते की फुले ही बीज तयार करतात. त्या बिजका पासून नवं सृष्टीला अंकुर फुटतात आणि सृष्टीचे निरंतर अनंत काळ चलन-वलन सुरू राहते. ह्या बीजाला सुरक्षित आणि संरक्षीत ठेवायचे काम ही गोवऱ्यांची राख करत असते. ही आपली कृषी संस्कृती आहे. आपले कृषी संस्कार आहेत... ज्यायोगे बीजावर गोवऱ्यांच्या राखेचे संस्करण होऊन नवं चेतना उदयास येते... त्याच प्रमाणे गोवऱ्यांची फुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चांगला माणूस बनून राहण्याची शिकवण देते. त्यामुळे ही गोवऱ्यांची फुले फलास आणनेचे असल्यास...आपल्या आत्मचारित्रास फक्त पुस्तकात बध्द करण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून चंद्रकांत माळवदे या शिक्षकाची बायोपिक म्हणून आजच्या काळात प्रसारित होणे गरजेचे आहे. कारण ही काळाची गरज आहे.
उत्तम शिक्षक उत्तम राष्ट्र निर्मिती करतो. साने गुरुजींचा चित्रपट येऊन बराच काळ लोटला आहे. मूल्य शिक्षणाचा जागर करणारा पोवाडा भारत वर्षात साने गुरुजींच्या नंतर कोणी केलाच नाही. तो जागर ही गोवऱ्यांची फुले करतील निःसंशय...! हा माझा विश्वास आहे.
अत्यंत कमी खर्चात छान बहुपयोगी... चांगल्या बांधणीचे पुस्तक प्रकाशन करून आपण मराठी साहित्य विश्वात साखर पेरणीच केली आहे.
कटू प्रसंग आठवणीतून जात नसतात...आणि त्या प्रत्येक प्रसंगाला वाचा असतेच असे नाही. त्यामुळे कथाविस्तारांची आवरता घेतली आहे, हे समजून येते. शिक्षकी पेशाला वाहून घेतल्या नंतरचे अनेक प्रसंग...राजकारण... आणि समर्पण याचा विस्तार अजून हवा होता. पत्रकारिता करताना होणारी दगदग... व मोहाचे प्रसंग याचे विवेचन म्हणावे तितके आलेलं नाही. अर्धांगिनीसाठी एखादा पाठ असायला हरकत नव्हती. बाकी तुमचे आत्मचरित्र नव पिढीला प्रेरणा देणारे आहे. विशेषत: व्हॉट्स ऍप युनिव्हर्सिटीतील पिढीला नव दिशा देणारे ठरू शकते.
ह्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपट निर्मिती झाली पाहिजे. त्याचे संवाद लेखन आपणच चांगल्या प्रकारे करू शकाल अशी आशा आहे.
हे समीक्षण लिहिताना मी आपल्या नात्याला कुठे ही मध्ये आणलेले नाही. मच्छिंद्रनाथानी गोरक्षास जी दिली शिकवण त्याला जगण्याचा मी फक्त प्रयत्न केला आहे.
आशीर्वाद असावा....
--- संपादक अमरसिंह राजे ८२० ८९४ ८८९६
पुस्तक : गोवऱ्या आणि फुले
लेखक : चंद्रकांत माळवदे
' गुरुकृपा ' २९, सूर्यवंशी कॉलनी, मुरगूड ता. कागल, कोल्हापूर ९४२०९०१४६४
प्रकाशक : रुपी पब्लिकेशन्स प्रा. लि. गडहिंग्लज (९८२२६५१३७७)
मूल्य : २००₹
ISBN : 978-93-94710-10-8
#bookreview #chandrkantmalwavde #amarsinhraje #murgud
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!