बांबू लागवडीचे नियोजन करावे-पालकमंत्री कडू
अकोला,दि.4(जिमाका)- बांबू हे आर्थिक उत्पन्न देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी ही उपयुक्त असे पीक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी बांबू लागवडीचे नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
रोजगार हमी योजनेतून शासकीय जमिनींवर बांबू रोपांची लागवडीचे नियोजन करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपवनसंरक्षक के.अर्जुना आदी तसेच सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील इ क्लास जमिनीची माहिती संकलित करावी. गावनिहाय या जमिनींवर पर्यावरण संवर्धन तसेच त्या त्या गावातील युवक युवतींना रोजगार मिळावा या हेतूने तेथे बांबू लागवडीची शक्यता पडताळण्यात यावी. यात दिव्यांग व्यक्तिंना प्राधान्य द्यावे. तसेच शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर बांबू लागवडीस चालना द्यावी. जेणे करून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा,तसेच पर्यावरण संरक्षण व्हावे, पावसाचे पाणी अडविण्यासाठीही त्याचा उपयोग होईल,अशी सूचनाही त्यांनी केली. येत्या पावसाळ्यात हे अभियान राबविता यावे यासाठी रोपांची उपलब्धता करण्याबाबतही त्यांनी वनविभागास सुचना केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!