सेक्स विझलेली लग्नं! अर्थात, सेक्सलेस मॅरेजेस...
-------------------------------------------------------------------
- डॉ प्रदीप पाटील.
बलदंड शरीराचा इंग्रजी सिनेमातील हिरो अरनॉल्ड श्वारझेनेगर आपल्याला 'टर्मिनेटर' सिनेमात भावला होता.. त्याचे पिळदार स्नायू आणि ताकद म्हणजे आपल्यातला खरा पुरुष वाटतो.. त्याची बायको मारिया श्रीव्हर ही त्याच्यावर जाम फिदा असेल असा आपला कयास असणार..
पण तो संपूर्ण बरोबर नाहीय !
'शक्यच नाही' असे तुम्हाला वाटेल..
पण होय खुद्द अर्नोल्डच म्हणाला होता...
"आमचे मॅरेज 'सेक्सलेस' होते. म्हणजे आम्हा दोघांतला सेक्समधील इंटरेस्ट संपला होता."
अरनॉल्ड असे म्हणतो तर मग सामान्य पुरुषांचे काय असेल?
नंतर तो आणि श्रीव्हर वेगळे झाले, हा भाग वेगळा.. असो..
लग्नानंतर काही काळानंतर आमच्यातील सेक्स संपला असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी ही फक्त पुरुषांची ओरड होती. (कारण स्त्रिया फारशा बोलू शकायच्या नाहीत).. घरोघरी पुरूषांना आपली बायको थंड वाटत असे, आता मात्र स्त्रियांनाही पुरुषांत दम नाही असे वाटू लागले आहे.
लैंगिक संबंधांची इच्छाच होत नाही असे काही घडू लागलेय.
सुस्थितीत असलेल्या अनेक जोडप्यात हीच समस्या आहे. समाजात व कामाच्या ठिकाणी वावरताना दोघेही असे दाखवून देत आहेत की आम्ही खूप छान राहतो.. आम्ही आयडियल कपल आहोत... दोघेही नोकरी करत आहोत... पैशांचा सवालच नाही... पण तरीही आज वयाच्या तिशीत, लग्नानंतरच्या आठ वर्षांनी, त्यांच्यातला सेक्स विझलाय !!
"असं नाहीये की आमच्यातील एकमेकांविषयीच्या भावना मेल्यात. पण लैंगिक आकर्षण मात्र निश्चितच कमी झालंय. मग आम्ही दोघेही सेक्स व्हावा म्हणून खूप प्रयत्न करतो. पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चाललीय. त्यामुळे आम्ही आमच्या कामात स्वतःला बुडवून टाकले आहे." असं एक उच्चशिक्षित स्त्री म्हणते. " एक क्षण असा आला की आम्ही आता वेगळे व्हावे. डायव्होर्स घ्यावा.. असे आम्हास वाटू लागते. मी माहेरी जाऊन राहू लागले. पण घरच्यांनी मला परत पाठविले. मग दोघांनी कौन्सेलरला जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला. "
अशा हजारो केसेस आहेत ज्या गोंधळलेल्या आहेत.
आपल्या संस्कृतीत लग्न हीच एक गोष्ट सेक्ससाठीची पहिली आणि अंतिम परवानगी आहे असे तत्वज्ञान (अनेक कारणांनी) रुजले आहे. त्यामुळे लग्नात वेगळेपण होणे शक्यच होत नाही.
यापण वेगळं पाऊल उचललं तर समाजात नावे ठेवली जातील म्हणून बहुतांश जण हे सेक्सलेस मॅरेज कंटिन्यू करतात, तर काही जण/जणी आर्थिक कारणांसाठी आपले लग्न खेचत राहतात.
माझ्याकडे कौंसेलिंग साठी आलेली एक स्त्री सांगत होती, "पंधरा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यातून बाहेर पडण्याचे ठरवत राहिले पण पडू शकले नाही कारण बाहेर पडल्यावर जायचे कुठे हा प्रश्न होता! अगदी सुरुवातीचे काही महिने चांगले गेले पण नंतर नंतर आमच्यातला सेक्स कमी कमी होत गेला. प्रत्येक वेळी मी सुरुवात करायचे पण तो ढिम्म असायचा. मी मग त्याच्यावर चिडत असे. त्याच्या कुटुंबावर त्रागा करीत असे. (कारण त्याचे आई-वडील आमच्या घरीच राहत). म्हणुन मग आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. पण तेथेही काही फरक पडला नाही. मग मला वाटले की आपणास मूल झाल्यावर फरक पडेल. म्हणून मी निर्लज्जपणे त्याला सेक्स करायला भाग पाडीत असे. पण मला दिवस गेल्यावर ही त्याने माझी विशेष अशी कोणतीही काळजी घेतली नाही. म्हणजे माझे लग्न फक्त 'सेक्सलेस'च नव्हते, तर ते भावनाहीन (इमोशनलेस) देखील होते. त्याच्या भावना मला फक्त तेव्हाच जाणवल्या जेव्हा मी त्याला सांगितले की मी आता त्याला सोडून जात आहे. त्या वेळी मला अतिशय लाजिरवाणे वाटले आणि मेल्याहून मेल्यासारखे झाले..."
याचा अर्थ असा आहे की, असे अनेक जण आहेत की ते लग्नात सुखी असल्याचे नाटक करीत आहेत. कारण समाजाला काय वाटेल याचा ते प्रथम विचार करतात. शिवाय समाजात 'घटस्फोट' हा शब्द घाबरविणारा आहे आणि तो वाईटही समजला जातो. त्यामुळे त्याच्या वाट्याला जाण्यास ताकदच उरत नाही.
आताच्या काळात मात्र खूपच बदल घडू लागले आहेत. तिथे आजकाल असा विसंवाद निर्माण झाला की एकमेकांना बाय-बाय केले जात आहे. याचं प्रमाण अत्यल्प असलं तरी, अनेक जण या बाबतीत बोल्ड झाले आहेत. याबाबतीत विशेष गोष्ट ही आहे की स्त्रिया देखील या बाबतीत पुढाकार घेत आहेत. त्या थेट व स्पष्टपणे सांगत आहेत की माझ्या नवऱ्यात लैंगिक असामर्थ्य आहे. जेव्हा त्यांना सल्ला देण्यात येतो तेव्हा पुरुषास पटवून देणे महाकठीण काम बनते.
सेक्सलेस मॅरेजेसची संख्या दहा वर्षांत पूर्वीपेक्षा सहा पटीने वाढली आहे.
#१. मुलं लवकर झोपत नाहीत,
#२. एकांत मिळत नाहीत,
#३. वेळ मिळत नाही, आणि
#४. आम्ही खूप दमतो..
ही चार कारणं त्यासाठी अग्रगण्य आहेत..
कुठल्याही भावनिक किंवा शारीरिक कारणापेक्षा ८० टक्के जोडप्यांना 'वेळच नसतो' म्हणून सेक्स होत नाही असे दिसून येत आहे. आणि उरलेल्या दहा ते पंधरा टक्के जोडप्यात शारीरिक व मानसिक विकार आढळून येत आहेत. व्यसने, जाडेपणा, मधुमेह अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. असो..
प्रत्येकाच्या सेक्स विषयीच्या कल्पना देखील वेगवेगळ्या आढळतात. सेक्स म्हणजे काही पाच मिनिटांचा व्यवहार नव्हे, तो त्याहूनही जास्त आहे. इतर गरजांसारखेच त्याचेही महत्त्व आहे. आहार, निद्रा, व्यायाम आणि स्वच्छता या महत्त्वाच्या गोष्टी सारखीच त्याची गरज आहे. पण अनेक जोडप्यांना सेक्स आता कंटाळवाणा आणि एकसुरी होत चाललाय असे वाटू लागलंय आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे.
सेक्समधील अनुराग किंवा ज्याला इंग्रजीत रोमांस म्हणतात तो आता अनेक जोडप्यात हद्दपार झालेला आहे. त्याची कारणे स्त्रियांमध्ये वेगळी व पुरुषांत वेगळी आहेत.
स्त्रियांना सेक्स विषयीचे ज्ञान अपुरे किंवा तुटपुंजे असते किंवा कधीकधी अजिबातच नसते , तर तिकडे पुरुषांचे ज्ञान हे पोर्नोग्राफीवरून उसने घेतलेले असते ज्याला काही अर्थच नसतो. त्यामुळे अनेक पुरुष सेक्स च्या बाबतीत विचित्रपणे वागतात आणि मग स्त्रिया त्यांचा द्वेष करीत राहतात.
सेक्सलेस मॅरेज मुळे भावनांचा कोंडमारा होतो. विचार विकृती व्हायला सुरुवात होते. त्यातून अनेक मानसिक रोग उद्भवू शकतात. टोकाची निराशाग्रस्तता, अचानक रागाचा स्फोट होणे, मंत्रचळेपणा (OCD) हे विकार अशा वेळी निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे तर काही वेळा भीतीग्रस्तता किंवा फोबियाहि होतो. म्हणजे रिकाम्या जागी जाण्यास किंवा अंधार्या ठिकाणी जाण्यास घाबरणे, छातीत धडधडणे इत्यादी घडू लागते.
खरे तर सेक्स मांड्यांमध्ये नसतो. मेंदू शरीर संबंधाचे सर्वात मोठे इंद्रिय होय. कारण सेक्सची इच्छा, सेक्सची जाणीव, सेक्सची गरज, आणि सेक्स उपभोगणे, हे सारे मेंदूतून येते. मेंदूतूनच सुरुवात व अंत होतो. आणि सर्व लैंगिक कृतीवर मेंदूचे नियंत्रण असते. त्यामुळे आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या दृष्टिकोनावर लैंगिक संबंधातला 'आनंद' अवलंबून असतो. म्हणूनच आपल्या विचारांत बदल घडविण्यासाठी समुपदेशन करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
यासाठी नवरा व बायको ने सर्वप्रथम उत्तम मित्र बनले पाहिजे. मैत्रीत जे घडते व चालते ते ते सर्व त्यांनी करीत राहिले पाहिजे. मैत्रीतून एकमेकांत विश्वास निर्माण होतो व आत्मविश्वासही जागविला जातो. आपले नाते 'खात्रीचे' आहे असे पटले की मग एकमेकांचे सूर जुळण्यास सुरुवात होते. मग नंतर चुंबन-मिठ्या यांची सुरुवात हवी. याच बरोबर त्यांनी दिवसातून किमान एकदा तरी एकमेकांबद्दल चांगले बोलायला हवे. सर्वसाधारणपणे एकमेकांवर टीकाच जास्त केली जाते. जर चांगले आणि उत्तेजित होणारे बोलत राहिले तर खूप सुंदर अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो आणि सेक्ससाठी पूर्वतयारी होते.
विषाद विकृती किंवा डिप्रेशन या मानसिक रोगात सेक्सची इच्छा नाहीशी होते त्याच बरोबर इतरही कारणे आहेतच. आपल्या जोडीदारास सतत घालून पाडून बोलणे, त्याच्यावर सतत संशय घेत राहणे, त्याच्या चुका सतत त्याला दाखवीत राहणे, किंवा आपल्याच कामात बुडून जाणे, जोडीदाराकडे दुर्लक्ष करणे, एकमेकांत नीट संवाद नसणे, एकमेकांवर विश्वास नसणे, कधीकधी अतिकाळजी असणे, आर्थिक दृष्ट्या संकटात असणे, एकमेकांबद्दल गैरसमज असणे, मुलांचा अडथळा असणे, ही सर्व कारणे सेक्स संबंधावर परिणाम करतात.
कामाच्या वेळा जोडीदारात एक नसल्या, वेगवेगळ्या असल्या, की त्याचा सेक्सवर परिणाम होतो. मुले वाढविणे व मुले जन्मास घालवणे या कारणात जर स्त्री गुंतून पडली तर तिचा सेक्समधील इंटरेस्ट मंदावतो. त्याचा ताण सहन न झाल्याने जोडप्यात कटुता येऊ शकते.
विवाहबाह्य संबंधात गुंतलेले जोडीदाराशी सेक्स करीत नाहीत मात्र या ठिकाणी जोडीदाराकडून सेक्स मिळत नसेल तर विवाहबाह्य संबंधात जाणेही घडते. दोन्ही ठिकाणी आपल्या जोडीदाराबरोबरचे लैंगिक संबंध थांबविले जातात. पोर्नोग्राफीचे व्यसन लागलेल्या जोडीदारात अजिबात रस वाटेनासा होतो.
सेक्स विषयी घृणा किंवा विरस निर्माण होण्यात वय, पूर्वायुष्यातील अत्याचाराच्या घटना, जोडीदाराचा सेक्सविषयीचा न जुळणारा दृष्टीकोण किंवा पार्टनर आता खूपच बोअर वाटू लागणे, ही कारणे खूप महत्त्वाची आहेत. लैंगिक रोग हे एक कारण आहेच. यात अनेक विकार येतात. संभोग करताना त्रास होणे, लिंगात ताठरता न येणे, लैंगिक स्पर्शाची जाणीव न होणे, समागमाचा उत्कर्षबिंदू गाठता न येणे, आजारासाठी घ्याव्या लागणाऱ्या काही औषधांचा दुष्परिणाम होणे, हे विकार आहेत.
काहीजण धार्मिक व आध्यात्मिक कारणासाठी संबंध ठेवत नाहीत. काही जण काव्य-कल्पनेच्या आहारी जाउन संभोगाशिवाय प्रेम या संकल्पनेने संबंध ठेवण्यास नकार देतात. काही जणांना सेक्स करणे अनैतिक वाटते. त्यात कोणताही आदर्श नसतो असे विचित्र मत त्यांच्या डोक्यात तयार असते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतः सेक्स करत नाहीतच पण इतरांच्या लैंगिक संबंधांना नावे ठेवण्यात आघाडीवर असतात.
जोडीदाराबरोबर जर पटत नसेल किंवा जोडीदार आपलं ऐकत नसेल तर त्याला 'धडा शिकविण्यासाठी' किंवा त्याच्यावर 'दबाव आणण्यासाठी' सेक्सचा 'हत्यार' म्हणून वापर करण्यात येतो. पण त्यामुळं परिस्थिती आणखीनच चिघळते.. यास मानसशास्त्रात "पॉलिटिक्स ऑफ सेक्स" किंवा लैंगिक संबंधांचे राजकारण म्हणतात.
अशा रीतीने जर लग्नसंबंधात संकट आले असेल तर त्यासाठी उपाय अर्थातच समुपदेशक किंवा कौन्सिलर कडून करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. वैद्यकीय कारणांसाठी मनोविकृतीतज्ञ व सेक्साॅलाॅजिस्टकडे जाणे अनिवार्य आहे. प्रत्येक कारणासाठी वेगळा उपाय असतो.
लैंगिक संबंधाशिवाय लग्न (सेक्सलेस मॅरेज) चालू असेल तर त्यात आपण का राहावे व का राहू नये, याचा विचार करणे महत्वाचे आहे. कारण अशी लग्ने नुसते ओढत नेण्यात अर्थ नसतो. शारीरिक संबंधासाठीचे लायसन्स म्हणूनच तर लग्न केले जाते, अन्यथा आज समाजात लग्नाशिवाय एकत्र राहता आले असते. समाजात लग्नाशिवाय असलेल्या शारीरिक संबंधांना मान्यता नाही. त्यामुळे लग्नानंतर जर शारीरिक संबंध नसले, 'तरीही लग्न तुटले नाही पाहिजे' असे समाजाने म्हणणे आता बदलायला हवे. कारण एक प्रकारे ही एक 'सामाजिक जबरदस्ती'च होय आणि तसे असेल तर लग्नसंस्था फार काळ टिकणार नाही....!
Th: BP
CC/VKCV
साभार : फेसबुक Copy Paste......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!