लोकशाही रुजविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची:ॲड.सचिन सातपुते
लोकशाही रुजविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची:ॲड.सचिन सातपुते
पत्रकारांसह कुटुंबाच्या सर्व आरोग्य चाचण्या मोफत:डॉ.विनायक पवार
सांगली(प्रतिनिधी:): नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् (एनयुजे) महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्याच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आटपाडी येथे एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष व एनयुजे इंडिया च्या सचिव शीतलताई करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक पवार यांनी 'पत्रकारांचे आरोग्य' व ॲड.सचिन सातपुते यांनी 'पत्रकार आणि कायदा' या विषयावर मार्गदर्शन केले.युनियनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ.भूमिकाताई बेरगळ,आटपाडीच्या सरपंच सौ.वृषालीताई पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर,युनियनचे जिल्हा संघटक देवानंद जावीर,तालुका कार्याध्यक्ष विक्रम भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. युनियनच्या आटपाडी तालुका कार्यकारणीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त खानापूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भोसले,युवानायक अनिल पाटील,युवानेते किरण पवार,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, भाजपाचे युवा नेते जयवंतराव सरगर, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष पुजारी,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कारंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांनी स्वागत व नाथनगरीचे संपादक भरत पाटील यांनी प्रस्ताविक केले. संघटक नरेंद्र दिक्षीत यांनी आभार मानले.वृत्तनिवेदिका कविता यादव यांनी सूत्रसंचालन केले.
तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते,उपाध्यक्ष पोपट वाघमारे यांच्यासह युनियनचे सभासद पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड.सातपुते म्हणाले, संविधान- लोकशाही रुजविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे.आपले संविधान तळागाळापर्यंत पोहोचवण्याची सर्वांची जबाबदारी आहे.आपण कायद्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. देश हा कायद्याने बांधलेला आहे.लोकशाहीच्या चार स्तंभातील चौथा घटक असणारा पत्रकार अंतिम न्याय देण्यासाठी सतत झटत असतो.त्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे.पत्रकारांना माहिती घेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही.पत्रकारांनी घटना व कायद्याच्या माध्यमातून लिखाण करावे.देशामध्ये चुकीचे विधान करणारांना पत्रकारांनी रोखले पाहिजे.पत्रकार हे खऱ्या अर्थाने संविधानाचे संरक्षण करतात.पत्रकारांनी कायद्याचा व घटनेचा अभ्यास केला पाहिजे. पत्रकारांमध्ये आर्थिक अस्थिरता आहे,शासनाने त्यांच्या नोंदी करून त्यांना प्रोत्साहन मानधन सुरू केले पाहिजे.आर्थिक स्थिरता असल्यानंतर पत्रकारांना समाजापुढे सत्य बाजू मांडण्यास बळ मिळेल. शासनाने त्याचा विचार करावा व लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार हा घटक बळकट करावा. यातून आपली लोकशाही बळकट होण्यास मदत होईल.
वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार म्हणाले, आटपाडी तालुक्याबरोबरच काही गरजू पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व आरोग्य चाचण्या मोफत करण्याची सुविधा दिघंची (ता.आटपाडी) येथील लॅबमधून उपलब्ध करून देत आहोत.पत्रकारांनी आपत्ती काळामध्ये चांगले काम केले आहे.माध्यमांद्वारे आरोग्यविषयक समाज प्रबोधन योग्य पद्धतीने होते.लोक त्यामध्ये समरस होतात. पत्रकारांनी आरोग्याच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे.त्यांच्यासाठी आरोग्य चाचण्या मोफत करण्याची सुविधा सुरु करीत आहोत.आपल्या भागातील पत्रकारांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.पत्रकारांनी महात्मा ज्योतिराव फुले व पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेच्या योजनांचाही लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव खटके म्हणाले, एनयुजे महाराष्ट्र ही युनियन अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली पत्रकारांचे संरक्षण,घरकुल,अधिस्वीकृती,आर्थिक सक्षमता, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,यासारख्या पत्रकारांच्या सर्व प्रश्नांवर मार्ग काढत आहे. पत्रकारांच्या हिताबरोबरच समाजोपयोगी उपक्रमाच्या चळवळींमध्येही अग्रेसर आहे.एनयुजे इंडियाच्या सचिवपदी नुकतीच त्यांची निवड झाल्यामुळे या कार्याला आणखी बळकटी मिळाली आहे. पत्रकारांनीही यामध्ये आपले योगदान देऊन युनियनच्या वतीने सुरू असलेल्या पत्रकारांच्या हक्कांच्या लढ्यात सामील व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.
सभापती डॉ.भूमिकाताई बेरगळ म्हणाल्या, समाजाचे खरे रूप दाखवण्याचे पत्रकारांचे काम कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पत्रकारांचा समावेश करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. पत्रकारांना आर्थिक स्थिरता लाभण्यासाठी शासनाकडे करावे लागणाऱ्या प्रयत्नात आम्ही सहभागी होऊ.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले, पत्रकार म्हणजे समाजाचे दर्पण आहे.समाजाचे चांगले-वाईट गुण असतात, पत्रकार ते पत्रकारितेतून दाखवतात. त्यांनी समाजाच्या उणिवा भरून काढाव्यात.
सरपंच सौ.वृषालीताई पाटील म्हणाल्या, पत्रकारांमध्ये ज्ञान,कौशल्य व दूरदृष्टी असते.बौद्धिक,सांस्कृतिक व सर्व गोष्टींचा विकास पत्रकारांशिवाय अशक्य आहे. समाजातील घटना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम ते करतात.आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्हाला सुवर्णसंधी निर्माण करता.या कार्याला चळवळीचे रूप मिळावे. ग्रामीण समुदाय एकत्र करण्याचे काम पत्रकार करत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसहभाग व समृद्ध गावाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांनी मदत करावी. पत्रकारांच्याही मदतीसाठी आम्ही तयार आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!