सध्या आम्ही करवीर निवासनी अंबाबाई च्या इतिहासावर अभ्यास करत आहोत. या अभ्यासात अनेक भारी गोष्टी नव्याने समजत आहेत. त्या सविस्तरपणे पुढे मांडल्या जातीलच ; पण आज प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी लिहलेला #अंबाबाईचा नायटा# हा लेख पुन्हा वाचण्यात आला. सन १९२१ मधे कोल्हापूरच्या काही तरुणांनी अंबाबाई मंदिरात जाऊन स्वतः देवीची पूजा केली होती या वेळी तत्कालीन ब्रम्हवृंदीनीं इंग्रज सरकारकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या व केसरीकारांपासून सर्व ब्राम्हणी वर्तमान पञांनी अंबाबाई बाटली म्हणून एकच गहजब केला होता. या भिक्षेकरी वरडा वरडी (हा ओरडा ओरडीला खास कोल्हापुरी प्रती शब्द आहे.) मुळे राजर्षी शाहू महाराजांनीही या तरुणांच्यावर कार्यवाही करण्याचे नाटक बेमालूम पणे वठवले होते. पण पुढे राजर्षींनी आपल्या राज्यात सर्व सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे सर्व लोकांना खुली राहतील अशा कायद्याची कठोर अमंलबजावणी केली. आणि ज्यानी अंबाबाई देवीची पूजा केली होती त्या तरुणांना आपल्या नोकरीत सामावून घेऊन या धाडसाबद्दल बक्षिसही दिले होते. पण जेंव्हा ही घटना घडली तेंव्हा फक्त प्रबोधनकार ठाकरेंची लेखणीच या मराठा तरुणांच्या बाजूने चमकली होती. त्यावेळी प्रबोधनकारांनी लिहलेला हा लेख ! ।
#अंबाबाईचा नायटा
नायटा केव्हांही झाला तरी वाईटच त्यांतल्या त्यांत अंबाबाईचा नायटा म्हणे फारच वाईट . कोल्हापुरची इतिहासप्रसिद्ध अंबाबाई अनेक, शतकांचा आपला बौद्धपणा टाकून कोल्हापुरी चळवळ्यांच्या चळवळीत आपल्या चिडचिडणाऱ्या नायट्याची चुरचुरीत फोडणी घालण्यासाठी आता जागृत झाली आहे. हे अंबाबाईचें | देवस्थान मोठे जागृत खरें | काही दिवसांपूर्वी दोन तीन मराठे जातीच्या मुलांनी गाभाऱ्यांत जाऊन या जागृत अंबाबाईची भिक्षुकाच्या मध्यस्ती- शिवाय पूजा केली. या गोष्टीमुळे भिक्षुक पुजाऱ्यांनी ' अंबाबाई विटाळली असा भयंकर कोलाहल केला. मराठा ! ब्राह्मणेतर ! आणि त्यांच्या पोरांनी या मिक्षुकशाहीच्या तुरुंगांतल्या शुद्ध अंबाबाईची स्वतः पूजा करून तिला अशुद्ध करावी! कोल्हापुरापासून पुण्यापर्यंत एकच हाहाःकार उडाला. राष्ट्रीय केसरीकारसुद्धां अंबाबाईच्या या विटाळाला मानून आपल्या मामुली विवेकभ्रष्टतेच्या हुंदक्यांत मोठमोठ्याने हेल काढून रडू लागले. भिक्षुकशाहीच्या कंपूत एवढ्या जबरदस्त निराशेच्या धरणीकंपाचे धक्के बसू लागले की ज्या इंग्रज सरकारला त्यांनी ' सैतानी ' ठरविले आहे , त्यांचे बूट चाटण्यासाठी भिक्षुकी जिव्हा तारायंत्रांतून भराभर लांबलचक झाल्या. इंग्रज सरकार जर ' अन्यायी , अत्याचारी व सैतानी ' आहे तर त्यांच्या गव्हर्नराकडे किंवा रोसिदंट प्रतिनिधी- कडे अंबाबाईच्या नायट्याची दाद मागण्यासाठी ' राष्ट्रीय ' प्राण्यांनी लगट करावी , हा शुद्ध बेशरमपणा असला तरी तो आजपर्यंतच्या त्यांच्या चारि- पावन त्र्याला साजेशोभेसाच आहे . आह्मांला फार आशा होतो की या अंबाबाईच्या नायट्याच्या बाबतीत करवीरकर छत्रपति काही मुत्सद्दगिरी दाखवितील. परंतु ज्या मराठा समाजाचे ते ' जन्मसिद्ध ' नायक आहेत , ज्या समाजाचा राजकीय सामाजिक व विशेषतः धार्मिक दर्जा उन्नतावस्थेला बंडांत नेण्याचे कर्तव्यकंकण महाराजांनी उघडउघड आपल्या हातीं चढविले आहे आणि ज्यानी क्षात्रजगद्गुरूच्या एका नवीनच पीठाला निर्माण करण्याची धडाडी व मनोधैर्य प्रत्यक्ष दाखविले आहे, त्या छत्रपती सरकारने आपल्या पोलीसखात्याकडे अंबाबाईचा हा नायटा बरा करण्याची कामगिरी सोपविलेली पाहून फार वाईट वाटते. वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या अनेक पत्रव्यवहारावरून आतां असें समजते की या कोल्हापुरी पोलीसांनी नुकतीच तेथील हायस्कुलांतून काही मराठे जातीचे विद्यार्थी अंबाबाईच्या नायट्याच्या संशयाने पकडून नेले आहेत. ही गोष्ट जर खरी असेल तर ती अस्पृश्योद्धार करण्याच्या कामीं सक्रीय मनोधैर्य दाखविणाऱ्या छत्रपति सरकारच्या चारित्र्यालाः कलंकीत करणारी आहे. ही राजनीति नव्हे , समाजनीति नव्हे व धर्मनीति तर नव्हेच नव्हे.
मुख्य वादाचा प्रश्न एवढाच की अंबाबाई ही हिन्दुधर्माची एक देवता आहे ; तिचे देऊळ जैनांनी बांधलेले असो नाही तर बौद्धांनी खोदलेले असो, तें हिन्दु देवतेचे हिन्दु देऊळ आहे. अर्थात् हिन्दु म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला - मग ती ब्राह्मण असो, क्षत्रिय वैश्य शूद्र असो , ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मणेतरेतर असो - त्या देवतेची पूजा अर्चा स्वतः करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार ज्या देवळांत मान्य केला जात नाही , जेथले देव व देवता या भिक्षुकी जेलरांच्या तुरुंगवासांत खितपत पडल्या आहेत , ज्यांचे पूजन मराठ्यां सारख्या उच्चवर्णीय क्षत्रीयांसहि करता येत नाही, जेथें दुराग्रही जाति न भेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे महाद्वारावर ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहे, असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा उनाडटप्पूचे पांजरापोळ मानायला काही हरकत नाही ; आणि असल्या या भिक्षुकी तुरुंगांत पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैलफर्लांग दशक दगड धोंड्यांपेक्षा फाजील महत्वहि कोणी देऊ नये. ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही , ती अंबाबाई आम्हां दीन दुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय !
( इथून पूढेही ऐक वाक्य आहे पण मला स्वतः लाच थोडे जहाल वाटल्यामुळे येथे देत नाही जिज्ञासुनी ते प्रबोधनकारांच्या मूळ लेखातच वाचावे. आज श्री अंबाबाई मंदिर पारंपारिक पुजारी हटवण्याचा कायदा झाला आहे तो राज्याच्या सार्वभौम सभागृहात मंजूर होऊन दोन वर्ष उलटली आहेत पण आजून या कायद्याची अमंल बजावणी झाली नाहीय. आज प्रबोधनकारांचे नातू राज्याचे मुख्यमंत्री आहेत या करवीर निवासीनी अंबाबाईला भिक्षुकी जोखडात ते निश्चितच मुक्त करतील अशा अपेक्षेसह )
जय महाराष्ट्र !!!
इंद्रजित सावंत,
२१/६/२०२०, कोल्हापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!