जगातील सर्वाधिक बघितला गेलेला फोटो...
जगातील सर्वाधिक बघितला गेलेला फोटो कोणता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ? जर पडला असेल, तर शक्यता आहे तो फोटो तुम्ही सुद्धा बघितला असेल, तो फोटो आहे मायक्रोसॉफ्ट च्या Windows XP चा डिफॉल्ट वॉलपेपर, 'Bliss'..
हिरव्यागार गवताच्या गालिच्याने नटलेली छोटीशी टेकडी, पार्श्वभूमीला निळेभोर आकाश व यातून डोकावणाऱ्या उन्हाचा कवडसा अशी निसर्गाची उधळण असलेला हा फोटो मायक्रोसॉफ्ट ने Windows XP या आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम चा डिफॉल्ट वॉलपेपर म्हणून निवडला होता ज्याला नंतर Bliss म्हणून अफाट प्रसिद्धी मिळाली, मायक्रोसॉफ्ट Windows XP च्या जवळपास प्रत्येक युजर ला हा वॉलपेपर माहित आहे आणि म्हणूनच या फोटोला जगात सर्वात अधिक बघितला गेलेला फोटो असे म्हणतात, अनेकांचा अजून हि असा समज आहे कि हा वॉलपेपर म्हणजे एक कृत्रिम ‘डिजिटल आर्ट’ आहे, पण असे अजिबात नाहीये, हा एक खराखुरा अनएडिटेड फोटो आहे आणि हा फोटो टिपला होता, तो म्हणजे अमेरिकेतील नापा व्हॅलीमध्ये राहणाऱ्या *'चार्ल्स ओ'रियर'* या फोटोग्राफर ने..
जानेवारी 1996 मध्ये, ‘नॅशनल जिओग्राफिक’ साठी फोटोग्राफी करणारा चार्ल्स आपल्या मैत्रिणीला भेटायला कॅलिफोर्नियातील सोनोमा हायवे वरून चाललेला असताना त्याला वाटेत सभोवतालच्या द्राक्ष्य मळ्यातील हि छोटीशी टेकडी नजरेस पडली, नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यामुळे टवटवीत झालेले गवत, निळे आकाश व त्यातून डोकावणारी सूर्याची किरणे हे अत्यंत मनोहारी दृश्य बघून ते टिपण्याचा मोह चार्ल्स ला आवरता आला नाही व त्याने गाडी थांबवून आपल्या Mamiya RZ67 या मिडीयम फॉरमॅट फिल्म कॅमेऱ्यात हा फोटो टिपला तेंव्हा त्याला किंचित सुद्धा कल्पना नव्हती कि हा फोटो पुढे जाऊन इतिहास घडवणार आहे..
काढलेला फोटो डेव्हलप व प्रिंट होऊन आल्यानंतर चार्ल्स ने सहज म्हणून तो, स्टॉक फोटो पुरवणाऱ्या एका मध्यस्त एजन्सीकडे विकीसाठी दिला आणि अचानक सन 2000 मध्ये त्याला मायक्रोसॊफ्ट च्या ऑफिस मधून फोन आला कि हा फोटो त्यांना विकत हवा आहे, असे म्हणतात कि मायक्रोसॊफ्ट ने तब्बल एक लाख डॉलर्स रक्कम (आजच्या महागाई निर्देशंकानुसार सुमारे 1 कोटी 14 लाख रुपये) एव्हढी अवाढव्य रक्कम मोजून हा फोटो व त्याचे हक्क 'चार्ल्स ओ'रियर' काढून विकत घेतले व याचा वापर आपल्या Windows XP च्या डिफॉल्ट वॉलपेपर साठी केला..
अंगातील कला व त्याचा केलेला योग्य उपयोग हे किती फलदायी ठरू शकते याचे चार्ल्स ओ'रियर चा Bliss फोटो एक सर्वोत्तम उदाहरण ठरावे..
© शकील शेख, सातारा.
Mob. - 9822187905
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!