कोल्हापूर : कलानगरी कोल्हापूरचे वैभव असलेला ‘जयप्रभा स्टुडिओ’ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. जयप्रभा स्टुडिओची मालकी गानकोकिळा लता मंगेशकर यांची असल्याचा निकाल न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यांच्या वतीने या स्टुडिओच्या जागेच्या विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या आणि वारसावास्तू स्थळात (हेरिटेज) समावेश असलेल्या या स्टुडिओचे विभाजन करू नये, स्टुडिओसमोरील जागेत कसल्याही प्रकारचे बांधकाम न करता तो जतन करावा, अशी मागणी चित्रपटप्रेमी करीत आहेत. यामुळे मंगेशकर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यावरून कायदेशीर बाजू मांडणारे दोन गट उभे राहिले आहेत.
कोल्हापूरला चित्रपटसृष्टीचे माहेर मानले जाते. कोल्हापुरात चित्रनगरी, जयप्रभा स्टुडिओ, शालिनी स्टुडिओ अशा तीन स्टुडिओच्या माध्यमातून चित्रपटाचे चित्रीकरण होत असल्याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात शालिनी सिनेटोनचे अस्तित्व संपुष्टात आले. चित्रनगरीला सध्या काहीसे बरे स्वरूप मिळाले असले तरी ती शहराबाहेर असून तेथे परिपूर्ण सुविधांबाबत ही मतभेद आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे पुनरुज्जीवन करून तेथे चित्रीकरण, चित्रपटविषयक उपक्रम सुरू केले जावे असे मागणी चित्रपट क्षेत्रातील अनेकांकडून केली जात आहे.
छत्रपती, भालजी आणि लतादीदी
जयप्रभा स्टुडिओचे महत्त्व ऐतिहासिक आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट निर्मिती करण्याची अट घालून जयप्रभा स्टुडिओ भालजी पेंढारकर यांना सुपूर्द केला होता. याच ठिकाणी अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती झाली. राज कपूर याच स्टुडिओमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरे गेले होते. १९४८मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जाळपोळ झाली. त्यामध्ये जयप्रभा स्टुडिओची वाताहत झाली. याच काळात भालजी पेंढारकर यांची आर्थिक स्थितीही बिकट झाली. तेव्हा लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ खरेदी केला. हा एक रीतसर व्यवहार असला तरी त्याला वेगवेगळ्या कंगोऱ्यातून पहिले गेले. पुढे, जयप्रभा स्टुडिओमधील दहा एकर जागेमध्ये टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या. नंतर २०१२ मध्ये जयप्रभा स्टुडिओतील उर्वरित सव्वा तीन एकर जागा विकसित करण्याचा प्रयत्न मंगेशकर यांच्या वतीने झाला. तेव्हा कोल्हापुरात त्याच्याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले. न्यायालयाने मंगेशकर यांच्या बाजूने निकाल देताना, जमिनीबाबत काय करायचे याचा निर्णय त्या घेऊ शकतात असे स्पष्ट केले होते, असे त्यांचे वकील महादेवराव आडगुळे यांनी सांगितले.
प्रस्तावावरून वादंग
हे प्रकरण मधल्या काळात शांत झाले होते. अलीकडे मंगेशकर यांचे वटमुखत्यार मेजर यादव यांनी कोल्हापूर महापालिकेकडे सव्वा तीन एकर जागेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. स्टुडिओची मूळची दगडी इमारत तशीच ठेवली जाणार आहे. तर समोरील मोकळी जागा विकसित करण्यास त्यांनी परवानगी मागितली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून या प्रस्तावावर काम सुरू आहे. दरम्यान जयप्रभा स्टुडिओमध्ये बांधकाम करण्यास अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालिका आणि नगरसेविका सुरेखा शहा यांनी विरोध केला होता. तसा ठरावही कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र, शहा यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता ‘जयप्रभा स्टुडिओचे विभाजन करण्याचा प्रस्ताव दाखल झाला असून त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे’ असे समजले. त्यावर पुन्हा एकदा शहा यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी जयप्रभा स्टुडिओमध्ये कसल्याही स्वरूपाचे बांधकाम होऊ नये. हा स्टुडिओ वारसाहक्क वास्तूमध्ये असल्याने बांधकाम केले जाऊ नये; अन्यथा या विरोधात जनआंदोलन करण्याबरोबरच न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
चर्चेने मार्ग काढावा!
या स्टुडिओची मालकी मंगेशकर यांची आहे. खाजगी जागेत बांधकाम करण्याचा अधिकार संबंधित व्यक्तींना असतो. त्यामुळे मंगेशकर यांनी बांधकाम केले तर त्यात गैर काय, असा मुद्दा मांडणारा एक वर्ग आहे. तर दुसऱ्या गटाने जयप्रभा हे चित्रपटसृष्टीचे वैभव म्हणूनच राहिले पाहिजे असा आग्रह धरला आहे. याबाबत कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ चित्रपट-दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा वाद चर्चेने मिटवण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, ‘कोल्हापुरात चित्रनगरी असली तरी ती दूरवर आहे. त्याला जोडूनच शासनाने मंगेशकर यांच्या प्रतिनिधींशी बोलून जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रपटविषयक संस्था आणि चित्रीकरणासंदर्भात काही करता येते का, याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. केवळ वाद घालून काही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा सामंजस्याने भूमिका घेतल्यास बरेच काही करता येणे शक्य आहे, असे जोशी यांनी सांगितले.
हेरिटेज समितीची परवानगी नाही
मंगेशकर यांचे प्रतिनिधी मेजर यादव यांनी जयप्रभा स्टुडिओचे विभाजन करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेकडे दिला आहे. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. महापालिकेने ही जागा आरक्षित केली असल्याचे सांगितले जाते. मात्र खाजगी जागेवर आरक्षण टाकण्याबाबत जाणकारांमध्ये मतभिन्नता आहे. जयप्रभा स्टुडिओचा समावेश ‘हेरिटेज’मध्ये आहे. त्यामुळे वास्तूच्या मूळच्या वैभवास धक्का न लागता त्याचे सौंदर्य अबाधित ठेवून फेरफार करण्यास परवानगी मिळू शकते. तथापि, जयप्रभा स्टुडिओबाबत हेरिटेज समितीने विभाजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी सांगितले.
स्टुडिओचे अस्तित्व टिकवणार : यड्रावकर
जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व टिकले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. केंद्रीय पातळीवर नवी दिल्लीतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ड्रामा’च्या धर्तीवर राज्यात अशी संस्था कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओमध्ये सुरू करण्याचा मानस आहे, असे राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
लोकसत्ता News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!