खडकेवाड्यातील जय हिंद वाला मारुती..!
परवाच खडकेवाडा(ता.कागल) येथे आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय पी.एम.किल्लेदार अण्णा व अरविंद किल्लेदार सर यांच्याकडे गेलो होतो.तासभर गप्पा झाल्यावर मी निघायचे म्हणून बाहेर पडलो. दारात येताच अभ्यासू पीएम अण्णांनी मला त्यांच्याच घरालगत उत्तरेला मुख असलेल्या मारुतीरायाचे छोटेसे मंदिर दाखवले.आणखी अण्णांनी लागलीच सांगितले , 'दादा, जरा बारकाईने पहा या मूर्तीच्या तळात दोन्ही बाजूला काय अक्षरे आहेत..? व ही अक्षरे पेंट केलेली नाहीत तर ती त्याचवेळी ती मूर्तीच्या निर्मितीत बनवली आहेत.!' मी पाहिले तर ती अक्षरे (शब्द) होती 'जय हिंद'..! मला कमालच वाटली. कारण हनुमंत रायाजवळ शब्द असतात पण ते कोणते श्रीराम,जय श्रीराम,राम कृष्ण हरि अशी असतात पण इथे तर राष्ट्रीय अस्मिता जडलेली 'जय हिंद' ही अक्षरे..! अण्णांशी याबाबत चर्चा करताना जी माहिती समजली ती ऐकून कौतुक वाटले.
त्यांनी सांगितले की किमान 100 वर्षापेक्षा जुनी ही मूर्ती आहे.त्यावेळी देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता व त्यावेळी स्वातंत्र्याचा लढा तिव्रतरने होता. तर त्यावेळी या लढ्याची चेतना जागवणे व ऊर्जा देण्यासाठी म्हणून अशी संधी मिळेल त्यावेळी व तिथे तिथे अशी अस्मिता जागवली जायची.मला या बाबीच कौतुक वाटलं.मारुती ही बलोपासनेची देवता, आदर्श भक्त,अचाट पराक्रमी.. याचीच प्रेरणा राष्ट्रभक्ती मध्ये जागवण्याचा हा 100 वर्षांपूर्वीचा प्रयोग किती महत्वाचा होता पहा..!
या गावचे ग्रामदैवत भैरवनाथ..त्याचे मंदिर पण खडकेवाडा व चिखली गावच्या वेशीवर आहे.याही मंदिरात 1942 च्या लढ्यातील क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका होत असत.ज्यात हुतात्मा हरिबा बेनाडे, मल्लू चौगुले,तुकाराम भारमल,शंकरराव इंगळे, करवीरय्या स्वामी,माधवराव कुलकर्णी, रत्नाप्पांना कुंभार आदी क्रांतिवीरांचा समावेश असे.याच गावामध्ये विनोबा भावे यांची देखील पावले भूदान चळवळीच्या वेळी लागली आहेत.अशा या गावातील हा जय हिंद वाला मारुती अंतकरणात घर करून गेला.
मधुकर भोसले
प्रतिनिधी दै.पुढारी
9423278276
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!