चंद्रकांत दादा तुमचं काम किती तुम्ही बोलताय किती .....?
चंद्रकांत पाटील तुम्हाला नाही वाटत की तुम्ही जरा जास्तच बोलत आहात .
तुमच्या नशिबाने तुम्हाला गेल्या पाच साडे पाच वर्षात बरंच काही दिलंय . जे एक सामान्य राजकीय कार्यकर्त्याला संपूर्ण आयुष्य पक्षासाठी देऊन सुद्धा मिळत नाही .
साडे पाच वर्षांपूर्वी तुमच्या पक्षाला सत्ता मिळाली आणि अचानक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तुमचा उदय झाला . त्या अगोदर तुमच्या पक्षातील २/४ कार्यकर्ते सोडल्यास तुम्ही कोणालाही माहीत नव्हता . परंतु पडद्यामागून तुम्ही चंद्रकांतचे चंद्रकांतदादा कधी झालात हे समजलेच नाही . सगळी कृपा अमितभाईची ..
महाराष्ट्रात तुम्ही काही मोठे सामाजिक आंदोलन केले किंवा मोठ्या सभा गाजविल्या आहेत असे कधीही आमच्या सारख्या सामान्य माणसाला दिसलेच नाही . डायरेक्ट क्रमांक दोनचे मंत्री झाल्यावरच तुम्ही जनतेसमोर दिसलात .
अमितभाईमुळे आपण स्वतःला मोठे नेते समजू लागलात .सुरवातीला तुमचे बोलणे बऱ्यापैकी नम्र वाटायचे . हळूहळू त्यात घमेंडखोरपणा येऊ लागला . सत्तेची नशा तुमच्यामध्ये लवकर आणि झटपट दिसू लागली . तुम्ही शरद पवारांसारख्या नेत्यांबद्दल काहीही बरळू लागलात . त्यांच्या बारामतीत जाऊन त्यांनाच धमकाऊ लागलात . अगदी कालपरवापर्यंत तुम्ही खडसेच्या बाबतीत दिलेल्या मुलाखतीपर्यंत . सगळीकडे घमेंडखोर भाषा . इतकी कशी हिम्मत होते आपली . आपल्या पक्षातील लोकांनी संपूर्ण आयुष्य पक्षासाठी पणाला लावले त्यांच्याशी तरी थोडे वेगळ्या भाषेत बोला . तुम्ही त्यांना मुळापासूनच उखडून टाकण्याचाच प्रयत्न करताय . हे बरं नव्ह .
दादा, महाराष्ट्र सरकार कोरोना ला हाताळण्यात अयशस्वी ठरला आहे म्हणून तुम्ही निदर्शने , काळ्या रंगाचे कपडे वगैरे घालून काही तरी इव्हेन्ट करणार आहात म्हणे . तुमची इव्हेन्ट पार्टी असल्यामुळे ते तुम्ही नक्कीच करा . आपण एका प्रमुख पक्षाचे राज्यप्रमुख असल्याने आपल्याला तो अधिकार घटनेनेच दिला आहे . परंतु सध्या तो कोरोनो महोत्सव चालू आहे त्याचे काय ? कोरोनो महोत्सव तुमच्याच केंद्रातील पक्षाने आपल्या देशात चालू केला आहे त्याचे काय ? नरेंद्र मोदी साहेबांनी वेळीच त्याकडे लक्ष दिले असते तर भारतात ही अराजकता दिसून आलीच नसती . ते अहमदाबाद मध्ये ट्रम्प महाशयांबरोबर लाखोंच्या संख्येने इव्हेन्ट करीत बसले आणि इकडे संपुर्ण भारतात कोरोना महोत्सव सुरू झाला . असो . त्यावर लिहिणे म्हणजे पी . एच . डी . चा तो स्वतंत्र विषय होईल . त्यावर पुन्हा कधीतरी .
का हो , तुम्हाला सत्तेची चटक पाच वर्षात इतकी लागली की तुम्ही सत्ते शिवाय राहूच शकत नाही ? तुम्हाला येनकेन प्रकारे महाराष्ट्रातील सरकार उलथवूनच टाकावयाचे आहे का ? केंद्रातून तसे तुम्हाला काही आदेश प्राप्त झालेत का ? कोरोना महोत्सव राबवून तुम्हाला राज्यात राष्ट्रपती राजवट आणावयाची आहे का ? त्यानंतर राज्यपालांमार्फत तुम्हाला सत्ता ताब्यात घ्यायची आहे का ? इतका उतावीळपणा का चालला आहे तुमचा ? तुम्हाला वाटते की जनतेला काहीच कळत नाही का ? सगळेच अंधभक्त वाटतात का तुम्हाला ? अरे चाललंय काय ? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न राज्यात राष्ट्रपती राजवट आल्याने कोरोना महोत्सव बंद होणार आहे का ?
महाराष्ट्राचा विचार करता कधी नव्हे ते राज्यात चिनी संकट तुमच्या केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे आले आहे . ह्या संकटात राज्य सरकारला साथ देण्याऐवजी तुम्ही हे कोणत्या पद्धतीचे नीच राजकारण खेळताय ? पी . एम . केअर ला मदत करून हिशोब मात्र सी . एम . केअर ला विचारताय . म्हणजे असं झालं की शेजारणीला पगार देऊन जेवण बायकोकडे मागताय .
आपल्या महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक वारसा माहीत आहे का तुम्हाला ? कधी तसा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का ? अहो , अशा संकटात महाराष्ट्र सर्व राजकीय मतभेद विसरून , जातपात विसरून एक होत असतो . तुम्ही ह्या वैभवशाली इतिहासाचा यु . पी . बिहार का करीत आहात ? कशाला राज्याच्या इतिहासाला धक्का लावताय . साडे चार वर्षाने पुन्हा निवडणुका होणारच आहेत की . मग घ्या परत सत्ता ताब्यात . इतके कसे तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात ? आंधळे झालात ? तुमच्या ह्या घाणेरड्या राजकारणाबद्दल जनता तुम्हाला काय म्हणत असेल ह्याचा तुम्ही विचार करताय की नाही ? थोडी सुद्धा तुम्हाला भीती वाटत नाही का हो ?
तुम्ही गल्लीत गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करणार आहात काय ?
तुम्ही म्हणताय , लॉक डाऊन घोषित झाल्यापासून तुम्ही राज्य सरकारवर लक्ष ठेवून होता . तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही गप्प राहिलात . आता तुम्हाला समजले की , राज्य सरकार अपयशी ठरत चालले आहे .म्हणून तुम्ही काळे कपडे घालून निदर्शनाचा इव्हेन्ट करणार आहात .
तुम्ही केरळ राज्य आणि महाराष्ट्र राज्य ह्यांची तुलना करून केरळ राज्य किती चांगले म्हणून गुणगान गाताय . अहो केरळ राज्यात कम्युनिस्ट सरकार आहे . विसरलात की काय ? तुम्ही आपल्या महाराष्ट्राची गुजरातशी तुलना का नाही केली ? कारण तुम्हाला माहीत आहे की , गुजरातची आपल्यापेक्षा भयंकर वाईट अवस्था आहे . असो .
आमची महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की , अशा कोरोनाच्या काळात निदर्शने करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाही करा . त्यांच्यावर गुन्हे नोंदवा . सरकारने अत्यंत कडक भूमिका घ्यावी . पोलिसांना थोडे जास्त काम करावे लागेल .पण नाईलाज आहे . ह्या कोरोनो महोत्सवात सगळ्यात जास्त हाल आणि मनुष्यहानी पोलीस खात्याची झाली आहे . परंतु चंद्रकांतदादा तुम्हाला त्याचे काय ? पोलिसांसाठी तुमच्या पक्षाला कधी सहानुभूती वाटली आहे का ?
आणि हो तुम्ही त्या शिवसैनिकांच्या झटक्याबाबत विसरलात वाटतं . सध्या त्यांचे राज्य आहे म्हणून ते बिचारे गप्प आहेत . परंतु एकदा का त्यांची सटकली की , सरकार वगैरे गेलं उडत , ते तुमची पळताभुई करून सोडतील . त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका . कोणतेही आंदोलन करताना पुढे शिवसैनिक आहेत ह्याचा विचार दहा वेळा करीत चला . तुम्ही फक्त उद्धवजीना पाहत आहात त्यांच्या मागे असलेल्या प्रचंड शक्तिशाली शिवसैनिकाला पाहतच नाही . मागे तुम्ही कोल्हापूर मधून पुण्याला आलात . शिवसैनिक जर चिडले तर ते तुमचं पार्सल सरळ सुरतला पाठवतील .
असो, तुम्हाला एक फुकटचा पुणेरी सल्ला देतो . तुम्ही त्या देवेंद्र महाशयांच्या नादी काही लागू नका . ते तुमचा कधी विनोद, खडसे, मुंडे, बावनकुळे करून टाकतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही . कारण पंतांच्या पुढे कोणी गेलेलं त्यांना आवडत नाही . त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दुसरा कोणी चालत नाही . पंत नेहमी म्हणतात , मी काहीही करेन पण मी पुन्हा येईन , मी पुन्हा येईन . इतकं उघड गणित असताना तुम्ही कशाला ह्या उठाठेवी करताय ? कशाला मेहनत घेताय राव ? तुम्ही पाटील मेहनत करणार आणि मलई पंत खाणार . बघा बाबा ( दादा ) तुमचं काय ते .
जय महाराष्ट्र !!
ऍड . विश्वास काश्यप,
मुंबई .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!