राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई, दि. १० मे ( दिनेश गोसावी): पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरडाळ मोफत वाटप केली जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत डाळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, कार्ड धारकाला १ किलो चणाडाळ किंवा तुरडाळ मोफत देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रती माह 16 हजार मेट्रिक टन चणाडाळ व तुरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!