मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown 4) 31 मे पर्यंत वाढवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Lockdown Extension) आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे.
लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.
लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!