महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर सील
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा १५ जूनपर्यंत सील
बंगळूर : शेजारील राज्यांतून कोरोनाचा वेगाने संसर्ग वाढत असल्याने रोगाची तीव्रता अधिक असलेल्या महाराष्ट्रासह गुजरात, तमिळनाडू, मध्यप्रदेश आणि राजस्थानसाठी असणारी विमानसेवा तूर्तास रद्द असणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडूच्या सीमा याआधीच बंद केल्या आहेत. पुढील पंधरा दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत विविध निर्णय घेण्यात आले. याविषयीची माहिती संसदीय व्यवहार आणि कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. परराज्यांतून अधिक प्रमाणात स्थलांतरित लोक कर्नाटकात प्रवेश करत आहेत. त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना राज्यात प्रवेश दिला जाणार असल्याचे माधुस्वामी यांनी सांगितले.
शेतकरी, असंघटित कामगारांच्या हितरक्षणासाठी 2,173 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज घोषित करण्यात आले आहे. याद्वारे रब्बी हंगामात मका उत्पादन घेतलेल्यांना प्रत्येकी पाच हजारांची मदत दिली जाणार होती. आता खरीप हंगामातील उत्पादकांनाही मदत दिली जाणार आहे. सलून, ऑटो, टॅक्सीचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थसाह्य दिले जाणार आहे. या मदतीचा लाभ घेण्यासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कर्नाटक कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला 1500 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी हमी, 23 जून रोजी राज्य विधान परिषदेच्या पाच सरकारनियुक्त जागांसाठी नावांची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना देणे, मानसोपचार रुग्णालयाचे नाव मानसिक आरोग्य संस्था, कुष्ठरोग रुग्णालयालाचे नाव सांसर्गिक संस्था असे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मंत्री माधुस्वामी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!